गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2011
Written By वेबदुनिया|

आज 'शुभमंगल' करण्यापूर्वी 'सावधान'!

- रजनीश राणे

ND
बरोबर एक हजार वर्षांनंतर सन 2011च्या 11व्या महिन्यातील 11 तारखेला 11 वाजून 11 मिनिटे आणि 11 सेकंदाला 1 हा अंक 12 वेळा येणार आहे. म्हणूनच बोहल्यावर चढू इच्‍छिणार्‍या तमाम तरुण-तरुणींसाठी हा मुहूर्त 'अविस्मरणीय' ठरणार आहे. पण या मुहूर्तावर 'चतुर्भुज' होण्याची योजना आखणे म्हणजे निव्वळ 'मॅड' पणाचे एक 'फॅड' आहे, यावर सर्वच ज्योतिष पंडितांचे एकमत आहे. आजचा दिवस शुभविवाहासाठी तर अनुकूल नाहीच पण इतर शुभ कार्यांसाठीही 11-11चा मुहूर्त गाठणे तितकेसे लाभदायक ठरणार नाही, असा सल्ला ज्योतिष अभ्यासकांनी दिला आहे.

11ची 'बारा' खडी म्हणजे कॅलेंडरमुळे झालेली एक गंमत आहे. या मुहूर्ताला कोणताही शास्त्रीय आधार नाही, असे ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी 2012 मध्ये असाच 12-12चा मुहूर्त मांडला जाईल. पण सन 2013 मध्ये काय? कारण कॅलेंडरमध्ये 13वा महिनाच नाही. साहजिकच 2012नंतर मुहूर्ताची ही गंमत आपोआपच नष्ट होईल, असे सांगून सोमण म्हणाले या महिन्यात विवाहाचे मुहूर्त 18 तारखेपासून सुरू होत आहेत. 11 तारखेला मुहूर्तच नाही.

ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनीही 11-11चा मुहूर्त म्हणजे 'मॅड' पणाचे 'फॅड' आहे, असे सांगितले. पंचागांनुसार या दिवशी विवाहाचे मुहूर्तच नाहीत. 12 ,14, 21, 22 हे दिवस विवाहेस उपयुक्त आहे, असेही ते म्हणाले. दाते आणि रूईकर ही दोन पंचांगे समस्त ज्योतिष अभ्यासकांची आधारवड मानली जातात. या पंचांगांमध्येही 11-11चा मुहूर्तच नसल्याचे अभ्यासकांच्या भाषेत आजच दिवस 'भाकड'च ठरणार आहे. पण काही कुडमुड्या ज्योतिषांनी गृह-राशी-नक्षत्राची तोडमोड करून 'काढीव' मुहूर्त काढून दिला असेल, तर तो बहुतांशी लाभदायक ठरणार नाही, असा वैधानिक इशाराही ज्येष्ठांनी दिला आहे. या काढीच मुहूर्ताला ग्रह-राशीचा कोणताच आधार नसतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. तेव्हा 11-11च्या मुहूर्तावर 'शुभमंगल' करण्यापूर्वी 'सावधान' असलेले बरे, नाही का?