शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. बाबा आमटे
Written By वेबदुनिया|

श्रम - सरितेच्या तीरावर

- बाबा आमटे

वाल्मिकीच्या करुणेच्या काठाने वाटचाल करीत
निर्वेदाचे टोक गाठले.
कालिदासाने गिरिशिखरांवर वाकलेली शृंगार - मेघांची दाटी पाहिली
भूपालांच्या विजयवाहिनीसह युद्धघोष करीत
वीररसांच्या भाटांचे बेभान तांडेही निघाले
भाबड्या भक्तीचे पानमळेही अमाप फुलले
पण श्रम - सरितेच्या तीरावर आपल्या गीतांचे कलश भरण्यासाठी
कोणीच कसे आले नाही?
सांदीपनीच्या आश्रमात सुगंधाचे अद्भुत फुललेले ज्याने पाहिले
त्याला स्वेद - रसाची पुसट जाण असल्याची नोंद मात्र आहे.

निळ्या नदीच्या किनार्‍यावरील वाळूच्या अफाट सपाटीवर
पाषाणांचे उत्तुंग त्रिकोन उभारता उभारता
लक्षावधी छात्या रक्तबंबाळ झाल्या
मरणासाठी बादशाही बिळे बांधता बांधता
असंख्य जीवनांचा अंत झाला
ज्यांनी चिरे मस्तकावर वाहिले
ते चिर्‍यांच्या फटीफटीतून निःशब्द चिनले गेले
पण मृत्यूच्या वस्तीतही आपल्या वासनांची लक्तरे वाहून नेणारे
त्या बिळात अजून कायम आहेत!

चौदा प्रेमांचा चोथा करणार्‍या समआटाचे तकलूपी अश्रू
ज्यांनी पत्^थरांतून चिरंतन केले
त्यांच्या आटलेल्या रक्ताची दखल
दरबारी भाटांनी घेतल्याचे ऐकिवात नाही!
बिगारीत बांधलेले मनोरे छातीवर जे घेऊन कोसळले
त्यांचे मृत्यू लेख अजून इतिहासाने वाचलेले नाहीत!
कलेचे वस्त्र बिनदिक्कत फेडणार्‍या
आणि प्रतिभेच्या हाटात रसांचा घाऊक सौदा करणार्‍या
भूपालांचा आणि सुलतानांचा काळ संपला!
आणि जिची वाट पाहिली जात होती ती पहाट
आज उंबरठ्यावर आहे
श्रमपालांच्या युगांतील स्वेद - रसांच्या साधनेसाठी
प्रज्ञेच्या पुत्रांनी आता सज्ज व्हावे!

संथ नाजुक पावलासह हिंदकळणारे
रसांचे टंच घट उत्तररात्रीच वाहून झाले
आता हवी आहे
मस्तकावर पाट्या वाहणार्‍या स्वेदगंधcया डगमगत्या चालीची
धुळीत लिहिलेली कविता
स्वेद - रसाने न्हालेल्या ओलेतीचे
माथा झुकवणारे चित्र आणि मन उंचावाणारे शिल्प आता हवे आहे
भूमिकन्यांचे वार्‍याचा वेग पिऊन धावणारे गाणे
त्याला शब्द देणारा कालिदास आता हवा आहे

भुईचे हिरवे हास्य फुलविण्यासाठी
नांगराच्या फाळांनी तिला कुरवाळणारा
स्वर्गातल्या अश्रूंची कोसळणारी झड
भरलेल्या डोळ्यांनी पाहणारा
असे संपन्^न जीवन बेहोषपणे जगणारा तो हलधर
त्याच्या मस्तीची स्तोत्^रे गाणारे वाल्मिकी आता हवे आहेत!
आणि तो नौकेवरून आशेचे जाळे फेकणारे कोळी
समुद्राचे उसासे त्याला अजाणताच जाणवतात
त्या ओळखीला तारांची थरथर देणारे तानसेन आता हवे आहेत

भूमीच्या गर्भातून काळे सोने वर काढणारे श्रम - पुत्र
त्यांच्या सर्वांगावर काळीच झळाळी उधळलेली
भूगर्भातल्या गर्मीने भाजलेले
आणि ओझे वाहून मोडण्याच्या सीमेपर्यंत वाकलेले
त्यांच्या कण्यांचे मणके
त्यांना ताठ करण्यासाठी प्रतिभेच्या पुत्रांनी आता सज्ज व्हावे
षोडशींच्या शरीरावरील रेशमी वस्त्रांची सळ्सळणारी वळणे पाहून
आता फक्त चांदण्यांचा चावटपणा त्यांना आठवू नये
अथवा उकळत्या पाण्यात शिजणार्‍या
कोषातील किड्यांची प्रेते आठवून
केवळ त्यांची अहिंसा व्याकूळ होऊ नये
तर आसामच्या अरण्यातील ते अर्श्सनग्न मजूर आठवून
त्यांच्या रक्तात उकळीही उठावी!
आणि मुलास अफू पाजून कोश गोळा करण्यास निघणार्‍या
मजुरणींचे आटलेले डोळे आठवून
त्या ज्वालारंगी वस्त्रांनी त्यांचेही डोळे जळावे
काश्मिरी कलाबतूंचे गालिचे पाहून
काश्मिरी माणसाच्या देहावरील
ठिगळांची कलाकुसरही त्यांना आठवावी
आणि मग त्यांच्यासाठी गालिच्याची ती मखमल कातेरी व्हावी!

खपणार्‍यांच्या तपोभूमीवर
श्रम - रसाचे सुगंधी गुत्ते
झिंगलेल्यांनी आता गजबजून जावेत
त्याची चटक लागली तर
जगणे हरवून बसलेली कलेवरेही तेथे गर्दी करतील
प्रज्ञेच्या पुत्रांनी तेथे स्वप्नांना अर्थ शब्द द्यावेत
श्रमाचे पुत्र त्या शब्दांना अर्थ देतील
स्वेद - रसाच्या मद्यशालेत त्या स्वप्नांना आकार येईल
स्वेद - रसाची ही मद्यशाला अल्पावधीत आटून जाईल
अथवा खपणार्‍यांच्या तपोभूमीवर
स्वप्नेच बंदिस्त होतील
म्हणून असे बिचकू नका
कारण, जीवनाचे मेघ नेहमीच तुडुंब असतात
आणि प्रज्ञा - पुत्रांच्या स्वप्नांनी बंदिस्तपणा स्वीकारल्याचा
इतिहास नाही!

संग्रह : ज्वाला आणि फुले