शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By वेबदुनिया|

होळीचा रंग कसा काढाल?

'कलरफूल फेस्टिवल' म्हणजे होळी! रंग-तरंग आणि उमंग यांचे महान पर्व म्हणून आपण होळी मोठ्या हर्षोल्हासा‍त साजरी करत असतो. होळीचे सप्तरंग खेळायला प्रत्येकाला आवडतात. रंग खेळायला मज्जा येते मात्र तोच रंग काढताना नाकी नऊ आल्याशिवाय राहत नाही. याच धाकाने बहुतांश लोक होळीच्या रंगापासून स्वत:ला जपतात. मात्र ''बुरा न मानो होली है,'' म्हणून त्यांच्या अंगावर कोणी रंग टाकून जातोच. रंग खेळून झाल्यानंतर तो रंग काढायचा कसा? असा प्रश्न आपल्याला पडला असेलच. यासाठी तुमच्यासाठी काही खास टिप्स... 

* आजकाल केमिकलयुक्त रंग होळीसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जात असतात. त्याचा आपल्या त्वचेवर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे रंग खेळून झाल्यानंतर लगेचच रंग धुवून टाकला पाहिजे. रंग जास्त वेळ त्वचेवर राहिल्यास त्याचे साईड इफेक्टस् होण्‍याची शक्यता नाकारता येत नाही.

* कपडे तसेच डोक्यावरी‍ल कोरडा रंग आधी चांगला झटकून घ्या. नंतर एका मुलायम कपड्याने आपल्या चेहर्‍यावरील तसेच त्वचेवरील रंग काढावा.

* रंग हलक्या हाताने काढावा अन्यथा जोरात रगडून काढल्याने त्वचेचे सालटे निघतात व त्वचा आग ही मारते.

* बेसन पीठात लींबूचा रस मिसळून रंग काढावा. खोबरेल तेल अथवा दही त्वचेवर लावून रंग हळूवार काढता येतो.

* रंग काढण्यासाठी रॉकेल, केमिकल, डिटर्जेंट अथवा कपडे धुण्याचा साबण उपयोगात आणू नका.

* केसांमध्ये असलेला कोरडा रंग आधी चांगल्या प्रकारे झटकून घ्या त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवावेत. बेसन, दही अथवा आवळा पावडरने डोके धुतल्यास रंग लवकर निघतो. आवळा पावडर रात्रीच पाण्यात भिजवून ठेवावी. त्यानंतर केसांना शॉम्पू करावा.

* डोळ्यात रंग गेल्यास आधी पाण्‍याने ते स्वच्छ करावेत. डोळ्याची आग थांबत नसेल तर एका वाटीत पाणी घेऊन त्यात डोळ्यांची उघड झाप करावी. थोड्या वेळानंतर डोळ्यांमध्ये गुलाब जल टाकावे. याशिवाय आय ड्रॉपचाही वापर आपण करू शकता.

* रंग खेळून झाल्यानंतर तुम्ही फेशियल, मॅनिक्योर व पॅडीक्योर देखील करू शकतात.