शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By वेबदुनिया|

उन्हाळ्यात आपण काय करू शकतो ?

१. उन्हाळ्यात गरम पाण्याने आंघोळ नकोशी वाटते. परंतु एकदम थंडगार पाणीदेखील अंगावर नको वाटतं. अशावेळी 'काटा मोड' पाणी तयार करायला अनेकजण अगदी थोडं गरम पाणी तापवतात किवा मग पाईपमधील पाणी गरम होण्याची वाट पाहात उशिरा आंघोळ करतात. मग भाजकं पाणी मिळतं. त्यात परत थंड पाणी टाकतात. पाण्याचं आधीच दुर्भिक्ष, त्यात अशी ऊर्जेची आणि पाण्याची नासाडी! त्यापेक्षा अगदी सोपा उपाय आहे. घरी सोलर वॉटर हिटर नाही ना? मग अगदी सरळ पाण्याची गच्च भरलेली बादली सकाळी सकाळी उन्हात ठेवायची. अगदी नैसर्गिक 'ऊन-ऊन' पाणी तयार होतं! पाण्याची पण बचत होते ऊर्जेची देखील!

२. अनेकांना उन्हाळ्यात दुपारी ११-१२ वाजेपर्यंत घराची / कार्यालयाची दारं-खिडक्या उघडे ठेवण्याची सवय असते. यामुळे घर तापतं आणि मग ते थंड होण्याला अधिक ऊर्जा लागते. यापेक्षा सकाळी लवकर दारं-खिडक्या बंद करून घर थंड करायला सुरुवात केली पाहिजे. हीच गोष्ट हिवाळ्यात देखील आहे. संध्याकाळी लवकर दारं-खिडक्या बंद केल्यास घर उबदार राहतं. हिटरची आवश्यकता भासत नाही.

३. शॉवरच्या पाण्याने आंघोळ किती आल्हाददायक वाटते? सोयीची देखील वाटते. परंतु यामुळे दहा लिटर्स पाणी हकनाक वाया जातं. त्यामुळे आठवड्यातून एकदाच शॉवरच्या पाण्याचा आनंद घ्या. बाकी दिवशी कटाक्षाने बादली भरा.

४. प्रसाधनगृहात नळाची तोटी पूर्णपणे उघडण्याऐवजी नळाच्या पाण्याचा प्रवाह आपण संथ (धीमा) ठेवून पाण्याचा वापर कमी करू शकतो.