शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. ब्लॉग-कॉर्नर
Written By वेबदुनिया|

जातिवंत पुणेकराचा ब्लॉग

PRPR
महाजालावर ब्राऊझरच्या खिडक्यांमधून इकडच्या तिकडच्या ब्लॉगमध्ये डोकावत असताना एके ठिकाणी वेगमर्यादापुरुषोत्तम आणि व्यक्तिमत्व ! असे शीर्षक वाचून थोडासा वाचकाळलो. (ठेचकाळलोच्या धर्तीवर) वाचले आणि त्याखालील नोंद वाचू लागलो. आणि पहिल्याच वाक्याला लेखकू शंभर टक्के पुण्यनगरीतले आहेत, याची खात्री पटली. आणि पुढे वाचता वाचता त्यांच्यातला जातीवंत पुणेकर अगदी वाक्यावाक्यातून उराउरी भेटत गेला. उपहास, उपरोध, तिरकसपणा (ज्याला काही लोक खडूस असेही म्हणतात.) ठायी ठायी जाणवत होता. अशा या जातीवंत पुणेकराचा राहूल फाटक नामे ब्लॉग ओलांडून पुढे जाऊ नका. आणि वाचल्यानंतर `हंसण्यास लाजो नका.`

तर लेखकाचे नाव राहूल फाटक हे वर आलेच. वास्तविक राहूल मुळचा मुंबईकर. मुंबईतच `पला-बडा` झालेला राहूल आता पुण्यात स्थायिक झाल्यानंतर जातिवंत पुणेकराचे गुणही त्याला चिकटले नसते तरच नवल. तर अशा या राहूलचा ब्लॉग म्हणजे एका वेगळ्या प्रकारच्या वाचनाची पर्वणी देणारा आहे. रोजच्या जीवनात दुर्मिळ झालेला विनोद उपहासाच्या, उपरोधाच्या माध्यमातून राहूलच्या नोंदींमधून मिळतो आणि मनाला प्रसन्न, तजेलदार अनुभव देतो. गांभीर्याची, चिंतेची, काळजीची काजळी झटकून त्यांच्याकडे हसऱ्या नजरेने पहायला शिकवतो. राहूलच्या नोंदी तुम्हाला जालावर भटकणाऱ्या अनेक ई-मेलमधून मिळाल्या असतीलच. (खाली आयशॉट उरफ राफा (सहावी 'ड') असे लिवले असेल तर तो येक राहूल फाटक वोळखावा.) `पावूस` हा त्याचा `निबंद` खूप गाजला. अक्षरशः भन्नाट लिहिलंय बेट्यानं. वाचून हसू नाय आलं तर नक्कीच त्याला हसता येत नसणार. विषय काढलाच तर थोडं हसून घ्या.

``पावूस हा माजा आतिशयच आवडीचा रुतु आहे. पावूसामुळेच शेतात आंबेमोर भात व कणकेचे पिठ पिकते म्हणुनच आपण सगळे जेवू शकतो. पाउसाळ्यात मुख्यतवे गळीत हंगाम असतो. पाउसाळ्यात जास्त करून पावूस पडतो, हिवाळ्यात थन्डी पडते व उन्हाळ्यात ऊन पडते. त्यामुळे वरशभर कुठला ना कुठला रुतु पडिक असतो. 'रिमजिम पडती श्रावण गारा' हे गाणे आतिशय रोमहर्शक आहे. आमचा रेडियो गेल्या वरशी भिजल्याने बिघडला आहे त्यामुळे गाणे नीट ऐकू नाही आले तरीही आतिशयच आवडले.``

कन्फ्यूजन तो हे अटर हाही त्याचाच एक भन्नाट लेख. राहूलला अनेक प्रश्न पडले आहेत. त्याची त्याला कधीच उत्तरे मिळालेली नाहीत. त्यातले काही प्रश्न तुमच्यासाठी तुम्हाला त्याची उत्तरे मिळाली तर जरूर राहूलला कळवा.

``सीट कव्हर घट्ट बसलेली एम ८० कुणी पाहिली आहे का ? (डीलर ने तरी ?)

ब-याचदा बायका रस्त्याने चालताना, लहान मुलाना ट्रॅफिकच्या बाजूला ठेवून आपण स्वत: अजागळपणे भलतीकडेच बघत का जात असतात ?

'पाणी आडवा पाणी जिरवा' ! पण कुठे अडवा आणि कुठे जिरवा ? ह्या असल्या वाह्यात संदिग्ध पाट्या लिहिणा-याना लिहिण्यापासून अडवले पाहिजे मग तरी त्यांची 'जिरेल' का ?``

पुण्यातील रिक्षावाल्यांवर राहुलचा विशेष अभ्यास आहे. त्यांच्या सवयी त्यानं अगदी बारकाईनं टिपल्या आहेत. त्याच्यावर येता का जाऊ हा लिहिलेला लेख म्हणजे धमाल आहे. रिक्षावाल्यांच्या भाषेसह त्याने जो काही मजा आणलाय तो म्हणजे यंव रे यंव.

पुण्यातील खड्ड्यांनी राहूलमधील लेखकाला लिहिण्यातली `खोली` दिली. त्याचा उपहास, उपरोध या ठिकाणी कळस गाठतो. त्याचा खड्डे में रहनें दो खड्डा ना बुझाओ याला निव्वळ अप्रतिम एवढंच म्हणता येईल. यात उंबरकर आणि झुंबरकर यांच्यातील संवाद, खासदार श्री. क.ल. माडीकर आणि पत्रकार बंधू भगिनी यांच्यात रंगलेला कलगीतुरा, महापालिका आयुक्तांची पत्रकार परिषद आणि शेणोलीकर काका ह्यानी एका ट्राफिक हवालदाराची घेतलेली मुलाखत हे महाजालावर हिंडणाऱ्यांनी वाचल्याशिवाय पुढे सरकू नये. हसून हसून पोट नाय दुखलं तर नाव सांगणार नाय, असं लिहिण्याचाही इथे मोह होतोय.

पुण्यातील एकूण वाहतूक व्यवस्थेवरचा डायवर कोन हाय हा लेखही भन्नाट. उद्भवेल्या परिस्थितीवर लागू पडणारे हिंदी शिणुमाचे डायलॉकही मजा आणतात.

या व्यतिरिक्त उलटं जगा, आज, समुद्र, लिखाण ए गंमत ही त्याची वेगळ्या विषयावरची स्फूटसुद्धा वाचनीय आहेत. संगीत व चित्रपटाच्याविभागात रेड ऑन एन्टिबी या चित्रपटावर लिहिलेला लेख नक्की वाचावा. इस्त्रायलच्या विमानाचे युगांडात अपहरण झाले. त्यातील प्रवाशांची इस्त्रायलच्या कमांडोजने तेथे जाऊन सुटका केली ही कथावस्तू असणाऱ्या या चित्रपटाचे जे विश्लेषण राहूलने केलंय ते पटते. त्यातली सौंदर्यस्थळं, मर्मस्थळं त्यानं उलगडून दाखवली आहेत. याच विभागातील चल धन्नो हा लेखही वाचनीय आहे. तोच अनुभव यादों की बारात हा आर. डी. बर्मनवरचा लेख देतो

राहूलमध्ये एक चांगला कथाकारही लपला आहे. त्याची सोनेरी पाणी ही कथा वाचल्यावर याची अनुभूती पटते. लिहिण्याची शैली ते कथावस्तू हे सगळं त्याने छान तोललंय. त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा बाळगायला हरकत नाही.

या ब्लॉगचे वैशिष्ट्य म्हणजे तो चित्रमयही आहे. राहूलने फोटोशॉपवर काढलेली एकेक भन्नाट चित्र येथे पहायला मिळतात. त्यातील सत्तामधील रवीन टंडनचे मुख फार छान जमले आहे. इतर निसर्गचित्रेही पाहण्यासारखी आहेत. पण वैयक्तिदृष्ट्या मला आवडले ते फेसाळ पाणी या नावाचे चित्र. पाण्याच्या लाटा, अर्धस्फूट सावल्या अतिशय बारकाईने रेखाटल्या आहेत. राहूलमधला चित्रकार येथे प्रकर्षाने जाणवतो.

म्हणूनच हा ब्लॉग वाचल्यानंतर आणि त्याची गुणवत्ता तपासायच्या पातळीपर्यंत येऊन ठेपलं की त्याच्याच शब्दांत सांगायचं झालं तर...

तमाम गवाहोंको मद्दै नजर रखते हुए ये अदालत इस नतिजेपे पहुची है की..

....ये ब्लॉग नक्की वाचो. उसको अजिबात मत चुकावो.

आता मायमराठीत...... हा ब्लॉग नक्की वाचा. अजिबात चुकवू नका. (आपल्या भाषेत किती छान वाटलं नै?)

ब्लॉगचे नाव- राहूल फाटक
ब्लॉगर- राहूल फाटक
ब्लॉगचा पत्ता- http://rahulphatak.blogspot.com/

वेबदुनियाचे नवीन सदर ब्लॉग कॉर्नर