गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 3 डिसेंबर 2016 (12:28 IST)

JIOच्या जाहिरातीसाठी PM मोदी यांचे छायाचित्र वापरल्याने कंपनीवर लागणार आहे मात्र 500 रुपयांचा दंड

रिलायंस जिओच्या जाहिरातीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वापरल्याप्रकरणी कंपनीला ५०० रूपयांचा दंड होण्याची शक्यता आहे. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता स्वत:च्या जाहिरातीसाठी बोधचिन्हे आणि नावांचा गैरवापर टाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यातंर्गत ही कारवाई करण्यात येणार आहे. 
 
 माहिती व प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी गुरूवारी संसदेत मोदी यांचे फोटो वापरण्याची परवानगी दिली नसल्याची माहिती दिली होती. यासंबंधी समाजवादी पक्षाचे खासदार नीरज शेखर यांनी राज्यसभेत प्रश्न विचारला. त्यावर  राज्यमंत्री राठोड यांनी लेखी उत्तर देताना ‘जिओ’च्या जाहिरातीत पंतप्रधान मोदींचा फोटो वापरण्याची परवानगी पीएमओ कार्यालयाकडून देण्यात आली नाही, अशी माहिती दिली. 
 
मंत्रालयाची मीडिया शाखा असलेल्या ‘डीएव्हीपी’कडून सरकारच्या धोरणाशी संबंधित सर्व जाहिरातींना विविध प्रसारमाध्यमांतून प्रसारित करण्यात येतात. मात्र, केवळ सरकारी जाहिरातींचाच त्यात समावेश असतो. कोणत्याही प्रकारच्या खासगी संस्थांच्या जाहिराती प्रसारित करण्याचे काम ही मीडिया संस्था करत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राठोड यांच्या माहितीनंतर शेखर यांनी जिओविरुद्ध कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर याबाबतचा कायदा अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या अखत्यारित आहे, असे उत्तर राठोड यांनी दिले.
 
दरम्यान, मोदी हे आमचेही पंतप्रधान आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहिले आहे आणि मीही त्यामुळे प्रेरित झालो आहे. आम्ही या भारतीय नेत्याचे स्वप्न, भारत आणि भारतीयांना आमची सेवा समर्पित करत आहोत आणि त्यात काही राजकीय नाही, अशी प्रतिक्रिया उद्योजक मुकेश अंबानी यांनी दिली आहे.