शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

आता रेल्वेचे तिकीटही घरपोच मिळणार

लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर आहे. प्रवाशांना घरबसल्या ऑनलाइन तिकीट बुक करता येणार आहे. त्यानंतर ते प्रवाशांना घरपोच मिळणार आहे. तिकीट घरपोच मिळाल्यानंतर त्याचे पैसे देता येतील. सहा शहरांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा आयआरसीटीसी ने केली आहे. मात्र, ही सुविधा मिळवणार्‍या प्रवाशांना अतिरिक्त शुल्कही भरावे लागणार आहे.
आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, जे प्रवासी रेल्वेचे तिकीट ऑनलाइन बुक करतात. मात्र, ऑनलाइन पेमेंट करत नाही अशांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वेचे तिकीट बुक केल्यानंतर सं‍बंधित प्रवाशांना ते घरपोच दिले जाणार आहे. त्यानंतर त्यांच्याकडून तिकिटाचे पैसे घेतले जाणार आहेत.
 
ही सुविधा देतानाच आयआरसीटीसी ने काही अटीही ठेवल्या आहेत. या संपूर्ण प्रक्रियेला सिबिलशी जोडण्यात आले आहे. आयआरसीटीसीची फसवणूक केल्यास संबंधितावर कारवाई करता येणार आहे.
 
आयआरसीटीसी च्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकदा रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यावेळी पॅनकार्ड आणि आधारकार्डही सादर करावा लागणार आहे. त्यानंतर कधीही आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर अथवा मोबाइल अॅपवरून तिकीट बुक करता येणार आहे. किमान पाच दिवस आधी तिकिटाची एकूण रक्कम पाच हजारांपेक्षा कमी असेल तर त्यासाठी 90 रूपये जादा अथवा सेवाशुल्कही द्यावा लागेल. पाच हजराहून अधिक रक्कम असेल तर शुल्क स्वरूपात 120 रूपये अथवा सेवा शुल्क द्यावा लागेल.