गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 9 मे 2017 (11:22 IST)

स्टेट बॅंकेकडून 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात

स्टेट बॅंकेने 30 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाच्या दरात पाव टक्‍क्‍यापर्यंत कपात केली आहे. तो कर्जाचा दर आता 8.35 टक्‍क्‍यांवर आला आहे. आता या बॅंकेचा कर्जाचा व्याजदर सर्वात कमी राहणार असून त्यामुळे इतर बॅंकानाही कर्जाच्या व्याजदरात कपात करावी लागणार आहे. नवे दर आजपासून लागू होणार आहेत.
 
सरकारच्या परवडणाऱ्या घरांसाठी एसबीआयची ही योजना लागू होणार आहे. पुरुष कर्जदारांसाठी मर्यादित कालावधीची ही योजना 31 जुलैपर्यंत वैध असेल आणि पुरूष कर्जदारांना 0.20 टक्‍क्‍यासह 8.40 टक्के दराने गृहकर्ज मिळणार आहे.
 
महिला कर्जदारांसाठी 0.20 टक्‍क्‍याची कपात करण्यात आली आहे. तर पगारदार महिला कर्जदारांसाठी पाव टक्‍क्‍याची कपात बॅंकेने जाहीर केली आहे. पाव टक्‍क्‍याची कपात झाल्यामुळे कर्जदाराचे प्रति महिना (ईएमआयवर) 530 रुपयांची बचत होते. नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणावर ठेवी प्राप्त झाल्यानंतर बॅंकांनी ग्राहकांना कर्जदर कपातीचा लाभ हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे.
 
30 लाख रुपयांवरील कर्जाचा दर 0.10 टक्‍क्‍याने कमी करण्यात आला आहे.
सुधारित व्याजदर तात्काळ लागू झाल्याने नवीन गृहकर्ज आणि वाहनकर्ज स्वस्त होईल. त्याशिवाय मासिक हप्ता कमी होणार असून, पाच सहयोगी बॅंकांमधील लाखो कर्जदारांना दिलासा मिळणार आहे. पतधोरणाआधीच एसबीआयने व्याजदर कमी केल्याने इतर बॅंकांकडून व्याजदर आढावा घेऊन एसबीआय’चे अनुकरण केले जाण्याची शक्‍यता आहे.
 
एसबीआयने मुदत ठेवींवरील व्याजदरात अर्ध्या टक्‍क्‍याची कपात केली आहे. एक कोटीपेक्षा कमी रक्कम असलेल्या मध्यम आणि दीर्घकाळातील ठेवींवर नवे व्याजदर लागू होतील, असे बॅंकेने म्हटले आहे.
दोन ते तीन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवर आता 6.25 टक्के व्याज मिळेल. यापूर्वी या ठेवींवर 6.75 टक्के व्याज दिले जात होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी याच मुदतीसाठी 6.75 टक्के व्याज मिळणार आहे. तीन वर्षांपेक्षा अधिक आणि 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 0.25 टक्‍क्‍याची कपात करून तो 6.50 टक्के केला आहे.
 
एक वर्षापासून 455 दिवसांसाठीच्या ठेवींवर बॅंकेकडून 6.90 टक्के व्याज दिले जात आहे. त्याचबरोबर बॅंकेने एक वर्षासाठीच्या एमसीएलआर’वरील व्याजदरात कोणताही बदल केला नसून तो 8 टक्‍क्‍यांवर कायम आहे.