मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जुलै 2015 (11:10 IST)

मधुमेहाच्या औषधांच्या किमतीत होऊ शकते कपात

मधुमेह रुग्णांची संख्या देशभरात मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे साहजिकच मधुमेहावरील औषधांची मागणीही त्याचप्रमाणात वाढत आहे. औषधांच्या किमती जास्त असल्या तरी ती घेणे क्रमप्राप्त असल्याने ग्राहकांकडे ती खरेदी करण्याशिवाय पर्याय नाही. 
 
मात्र, आता या महागड्या औषधांच्या किमती कमी होण्याची दाट शक्यता आहे. त्यासोबतच, जंतुसंसर्ग, वेदनाशामक तसेच पचन विकाराशी संबंधित औषधांच्या किमतीतही घट होणार आहे. 
 
औषधांचे दर नियंत्रित करणार्‍या राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (एनपीपीए) दर नियंत्रित करण्याविषयीचे निर्देश जारी केले आहेत. सिप्रोफ्लोक्सेसिन हाइड्रोक्लोराईड, सेफोटेक्सिम, पॅरासिटामॉल, डॉमपेरिडोन, आणि ऐमोक्सिलीन+पोटॅशियम क्लॅवूलानेट यासारखी औषधे एनपीपीएने समाविष्ट करून घेतली आहेत. 
 
ही औषधे अबॉट, ग्लॅक्सोस्मिकेलाईन, ल्युपिन, कॅडिला हेल्थकेअर, आईपीसीए आणि सन्स या कंपन्यांच्या माध्यमातून विकली जातात. तज्ज्ञांच्या मते, या औषधांची मागणी सुमारे 1,054 कोटी रुपयांच्या घरात आहे. 
 
एनपीपीएने सुमारे 35 फॉम्यरुलेशन्सचे दर नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. तर 3-4 औषधांच्या दरांवर संशोधन चालू आहे, अशी माहिती रसायन आणि खते मंत्रालयातील औषध विभागातील अधिकार्‍याने दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आवश्यक औषधांचे दर नियंत्रित करण्यासाठी धोरण निश्चित करण्यावर भर देण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या सूचनेनंतर दुसर्‍याच दिवशी एनपीपीएने किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.