शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वेबदुनिया|

मायक्रोसॉफ्टलाही राजकारणाचे ग्रहण

PR
सॉफ्टवेअर निर्मितीच्या क्षेत्रातली बलाढ्य कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टमध्ये शहाला काटशह देण्याचे राजकारण जोरात सुरू आहे. कंपनीचे सहसंस्थापक अध्यक्ष बिल गेट्स यांचे अधिकार कमी करावेत किंवा त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मायक्रोसॉफ्टमध्ये गुंतवणूक करणा-या तीन गुंतवणूकदारांनी बिल गेट्स यांची व्यवस्थापन समितीमधून (बोर्ड ऑफ डायरेक्टर) गच्छंती करावी, अशी मागणी केली आहे. या तिन्ही गुंतवणूकदरांची मायक्रोसॉफ्टमधील एकूण गुंतवणूक ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ही गुंतवणूक मायक्रोसॉफ्टचा चेहरा असलेल्या बिल गेट्स यांच्या सुमारे ४.५ टक्के गुंतवणुकीपेक्षा मोठी आहे. बिल गेट्स यांच्या काही धोरणांमुळे आणि खूप उशिरा घेतलेल्या निर्णयांमुळे कंपनीच्या प्रगतीचा वेग मंदावल्याची तक्रार गेट्स विरोधी गट करीत आहे.

मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टिव्ह बाल्मेर यांच्या निर्णयक्षमतेवर गेट्स यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अनेकदा मर्यादा आणली आहे. गेट्स यांच्यामुळे कंपनीला भवितव्याचा विचार करून धाडसी निर्णय घेणे कठीण जात आहे. बिल गेट्स पत्नी मेलिंडाच्या नावाने सुरू केलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या कामाला जास्त वेळ देतात, असेही तक्रारदार गट सांगत आहे. बाल्मेर वर्षभरात सेवामुक्त होतील. नंतर नवा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असावा, यासाठीचा निर्णय घेण्याकरिता एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समितीदेखील गेट्स यांच्या प्रभावामुळे आपले काम चोखपणे करू शकत नाही. कंपनीच्या दीर्घकालीन भविष्यासाठी ही बाब धोक्याची असल्यामुळेच गेट्स यांच्या विरोधात सक्रीय झाल्याचे तक्रारदार गटाचे म्हणणे आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीनेही गेट्स यांच्यावर तीन गुंतवणूकदार नाराज झाल्याचे मान्य केले आहे. मात्र गुंतवणूकदारांच्या तक्रारीची दखल घेऊन बिल गेट्स राजीनामा देणार की नाही, याबाबत कंपनीच्या प्रवक्त्याने काही बोलण्यास नकार दिला.

ऑपरेटिंग सिस्टिम तयार करण्याच्या क्षेत्रात अग्रग्रण्य आणि सॉफ्टवेअरनिर्मितीच्या क्षेत्रात बलाढ्य असलेल्या मायक्रोसॉफ्टने २०१२-१३ या आर्थिक वर्षात २२ दशअब्ज डॉलर्स निव्वळ नफा कमावला होता. बिल गेट्स यांच्याकडे १९८६ मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीचे ४९ टक्के शेअर होते. मात्र शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणावर भांडवल उभे करायला सुरुवात केल्यानंतर गेट्स यांनी टप्प्याटप्प्याने स्वतःकडचे शेअर विकले. ठरविलेल्या कार्यक्रमानुसार ही विक्री अशीच सुरू रासिली तर गेट्स यांच्याकडे २०१८ नंतर कंपनीचा एकही शेअर नसेल पण त्या आधीच गेट्स यांच्यावरून वाद सुरू झाल्यामुळे संपूर्ण सॉफ्टवेअर विश्वाचे लक्ष मायक्रोसॉफ्टकडे लागले आहे.