शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 डिसेंबर 2015 (15:19 IST)

'राक्षस' सिनेमाची कथा सातासमुद्रा पार

दर्जेदार सकस आणि मनोरंजनाने परिपूर्ण सिनेमे तयार करण्यात हातखंड असलेल्या नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शन हाउस निर्मित 'राक्षस' हा आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला २३ नोव्हेंबर पासून सुरवात झाली आहे. राक्षस सिनेमाच्या निमित्ताने मराठी चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता शरद केळकर यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

खलनायकाची भूमिका करूनही महाराष्ट्राचा फेव्हरेट झालेला संग्राम म्हणजेच शरद या 'राक्षस' सिनेमात सकारात्मक भूमिकेत आहे. सिनेमाचा जॉनर काहीसा फॅमिली थ्रिलर आहे. त्यात एंटरटेनमेंट सोबत सस्पेन्स, थ्रिलर आणि इमोशन ड्रामा असलेला फॅमिली एंटरटेनिंग सिनेमा पाहायला मिळेल. त्यामुळे येत्या वर्षातील हा अप्रतिम सिनेमा ठरेल. सिनेमाची कथा कौटुंबिक भावनिक दर्शन घडवणारी आहे. बालकलाकार ऋजुता देशपांडे साकारत असलेली मुन्नी ही व्यक्तिरेखा सिनेमात महत्वाची भूमिका बजावते. 'शाळा', 'फॅंड्री', 'सिद्धांत' या सिनेमाच्या यशानंतर निलेश नवलखा आणि विवेक कजारिया यांची निर्मिती असलेले 'चौर्य', 'राक्षस' आणि 'एक नंबर' हे सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन ज्ञानेश झोटिंग यांचं असणार आहे. नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या सिनेमांचे विशेष म्हणजे आज पर्यंत ९ सिनेमांपैकी ७ दिग्दर्शकांना पदार्पणातील सिनेमा करायची संधी नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शन हाउसने दिली आहे. 'शाळा'चे सुजय डहाके, सिद्धांतचे विवेक वाघ,  'फॅंड्री'चे नागराज मंजुळे हि नावे प्रामुख्याने घेता येईल. 'राक्षस' हा सिनेमा शूट होण्याआधीच सिनेमाची कथा जगातील प्रसिद्ध आणि नामांकित दृश्यम संडन्स रायटर्स लॅबमध्ये निवड झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर राक्षसची चर्चा आधीपासून आहे. येत्या काही दिवसात तो आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजेल याबद्दल संपूर्ण  खात्री नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल प्रॉडक्शनला आहे.