शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 मार्च 2018 (10:51 IST)

'बबन'ने साजरी केली चिखलाची अनोखी 'धुळवड'

धुळवड म्हणजे रंगाचा खेळ, रंगाची उधळण करणा-या या उत्सवाचा नुकताच 'बबन' सिनेमातील संपूर्ण टीमने एका वेगळ्याच प्रकारे आनंद लुटला. होळीच्या मुहूर्तावर अहमदनगर येथील म्हसे गावात पार पडलेल्या या उत्सवामध्ये चिखलाची अनोखी 'धुळवड' साजरी करण्यात आली.
 
विशेष म्हणजे, आतापर्यंत साजरा करण्यात आलेल्या इको फ्रेंडली रंगपंचमीतल्या या अनोख्या धूळवडीचा स्थानिक नागरिकांनीदेखील मनसोक्त आनंद लुटला.  द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तुत आणि चित्राक्ष फिल्म्स निर्मित या सिनेमाचे राष्ट्रीयपुरस्कार प्राप्त 'ख्वाडा'फेम दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाच्या मोशन आणि टीझर पोस्टरवर देखील दोन प्रेमीयुगुल चिखलाने माखले असल्याचे दिसून येते. याचाच संदर्भ घेत अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील म्हसे गावात अनेक प्रेमी जोडप्यांना घेऊन चिखलातील अनोखी धुळवड साजरी करण्यात आली. याबद्दल बोलताना सिनेमाचे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे सांगतात की, 'महाराष्ट्र हा कृषिप्रधान राज्य असून, शेतकऱ्याला येथे महत्वाचे स्थान आहे.शिवाय प्रत्येक शेतकऱ्याची नाळ आपल्या मातीशी जुळलेली असते. गावच्या मातीच्या रंगाची आणि सुगंधाची तोड इतर कोणत्याही रंगात नसल्यामुळे, आपल्या मातीशी एकरूप होण्यासाठी अशी इतरांहून वेगळी 'धुळवड' साजरी करण्याचे आम्ही ठरवले'. कुतूहलाची गोष्ट म्हणजे, चिखलात रंगपंचमी खेळण्याची म्हसे गावक-यांची ही प्रथा असून, आसपासचे गाव विविध रंगात न्हात असताना, इथे गावरान मातीच्या चिखलात ग्रामस्थ स्वतःला झोकून देतात, अशी माहिती समोर आली आहे.
धुळवडीच्या या अनोख्या पद्धतीबरोबरच पारंपारिक 'होळी' दहनाचा कार्यक्रमदेखील येथे पार पडला. म्हसे ग्रामस्थांचा सहभाग लाभलेल्या या 'होळी' उत्सवामध्ये लेझीमचा तालदेखील स्थानिकांनी धरला.  
 
'बबन' हा सिनेमा २३ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून, भाऊरावांनी या सिनेमाचे लेखनदेखील केले आहे. 'ख्वाडा' अभिनेता भाऊसाहेब शिंदेची यात प्रमुख भूमिका असून  गायत्री जाधव ही नवोदित अभिनेत्री 'बबन' मध्ये झळकणार आहे. विठ्ठलराव कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, मोनाली संदीप  फंड आणि भाऊसाहेब शिंदे या चौकडीने सिनेमाच्या निर्मात्याची धुरा सांभाळली असून, हा सिनेमा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची परिपूर्ण मेजवानी ठरणार आहे.