बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 15 फेब्रुवारी 2017 (12:54 IST)

'फुगे' ने उंचावला प्रसिद्धीचा टक्का

मराठी चित्रपटांनी आपले पंख आता विस्फारले आहेत. सामाजिक आणि वैचारिक चित्रपटांमध्ये अडकून न राहता हलक्याफुलक्या विनोदीपटातून रसिकांचे ते मनोरंजन् करताना दिसत आहे, आतापर्यत गंभीर, ऐतिहासिक तसेच एखादे चरित्रपट दाखवण्यात हातखंडा असणा-या मराठी इंडस्ट्रीत आता 'फुगे' सारख्या खुसखुशीत आणि फुल टाइम पास असणा-या सिनेमाने चांगलीच बाजी मारली आहे. 
 
स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे ह्या मराठीच्या दोन सुपरस्टार्सन एकत्र आणणाऱ्या 'फुगे' या सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्रात विनोदाचे फुगे उडवले आहेत. खरे पहिले तर, चाकोरीबद्ध असलेली प्रेमाची व्याख्या आधुनिक करण्याचा प्रयत्न या सिनेमातून झालेला दिसून येतो. खास करून बेचलर तरुणाईसाठी हा चित्रपट पर्वणी ठरत आहे, असे असले तरी सिनेमागृहात संपूर्ण कुटुंब हा सिनेमा पाहू शकतात असा हा कम्प्लीट फॅमिली इंटरटेनिंग सिनेमा आहे. प्रेम, मैत्री आणि धम्माल दाखवणाऱ्या  या सिनेमाला 'फुगे' या सिनेमाच्या नावामुळेच अधिक प्रसिद्धी मिळत आहे. 
 
आतापर्यंत वैचारिक आणि गंभीर चित्रपटाचे विषय आणि कथानक मराठी चित्रपटात सादर करण्यात आले होते, मात्र लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांनी गाजवलेला काळ तसेच त्यांच्या चित्रपटांचा साचा आजच्या सिनेमात पाहायला मिळत नाही. 'बनवाबनवी', 'धुमधडाका', 'फेकाफेकी' सारख्या मित्रांच्या धम्माल विनोदी सिनेमांची रेलचेल मागील काही वर्षापासून मंदावली असल्याचे दिसून येते, त्यामुळेच 'फुगे' हा सिनेमा पाहिल्यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षक मैत्रीच्या विश्वात रमतो. इंदर राज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांची निर्मिती असलेला हा सिनेमा दर्जेदार मनोरंजनाची मेजवाणी ठरत आहे. 
 
दोन जिवलग मित्रांच्या नात्याकडे त्यांचे कुटुंबिय संशयाने पाहतात, दोघांपैकी एकाच्या आयुष्यात मुलगी आल्यामुळे त्यांच्या मैत्रीचे पुढे काय होते? असे बरेच काही या सिनेमात पाहायला मिळते. स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित या सिनेमात रॉमान्स बरोबर ब्रॉमान्स देखील पाहायला मिळत असल्यामुळे, प्रेक्षकांना हा ब्रॉमान्स आवडत आहे. तसेच प्रार्थना बेहेरे, नीता शेट्टी या अभिनेत्रींमुळे 'फुगे' सिनेमाला ग्लॅमरदेखील प्राप्त झाले आहे. १० फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने अवघ्या चार दिवसांमध्ये ३ करोड ९६५ रुपयांचा गल्ला कमावला आहे. त्यामुळे हा सिनेमा ख-या अर्थाने प्रसिद्धीचे फुगे उंच उडवण्यात यशस्वी झाला, हे नक्की! 
 
कलेक्शन खालीलप्रमाणे 
शुक्रवार- ८७.५ लाख 
शनिवार- १.१२ करोड 
रविवार- १.३२ करोड 
सोमवार - ६३.५ लाख