मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated :मुंबई , शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018 (13:21 IST)

बहुचर्चित ६ व्या माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन

अभिनव संकल्पना साकार करण्यासाठी, ती दृश्य स्वरूपात आणण्यासाठी कलात्मक मेहनतीची गरज असते. त्या संकल्पनेला जोड मिळते ते लघुपट निर्मिती ह्या तंत्रमाध्यमातून. लघुपट निर्मिती म्हणजे कित्येक संकल्पना, तंत्र आणि कला यांचा एक परिपाक आहे. जगभरातील अश्याच सृजनशील कलाकृतींना लघुपट माध्यमातून सादर करणाऱ्या लघुपट निर्मात्यांसाठी ‘युनिव्हर्सल मराठी’ आणि ‘रितंभरा विश्व विद्यापीठाच्या मालिनी किशोर संघवी कॉलेज’ यांच्या संयुक्त विद्यमाने 'माय मुंबई इंटरनेशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल' (माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव) या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या फेस्टिवलच्या आयोजनात युनिव्हर्सल मराठी टीमसोबत मालिनी किशोर संघवी कॉलेजातील बीएमएम विभागाचा फिल्म क्लब सक्रिय भूमिका बजावत आहे. महोत्सवाचे हे सहावे वर्ष असून यंदा हा महोत्सव मुंबईच्या जुहू किनाऱ्याजवळील मालिनी किशोर संघवी शांतीप्रभा प्रेक्षागृहात पार पडणार आहे. 
 
तीन दिवसीय असलेल्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लघुपटांचे स्क्रीनिंग, मान्यवरांचे चर्चासत्र, प्रश्नोत्तरे आणि विविध विषयांवरील कार्यशाळाही होणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरांवर होणा-या या महोत्सवासाठी लघुपटकारांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.या महोत्सवासाठी लघुपटांच्या विविध वर्गवारी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सामाजिक जनजागृती शॉर्ट फिल्म (सोशल अवेरनेस), आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म (विदेशी फिल्म), अॅनिमेशनपट, कल्पनारम्य (फिक्शन) फिल्म, जाहिरातपट (अॅडफिल्म), संगीतपट (म्युझिक व्हिडियो) आणि माहितीपट (डॉक्युमेंटरी) अशा या सात वर्गवारीकरिता विनामूल्य ऑनलाईन प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०१८ आहे.
 
समाज प्रबोधन आणि मनोरंजनाचे मूल्य जपणार्‍या या महोत्सवाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे आजवर जगातील ५ उपखंड, ५० हुन अधिक देश आणि ३००० हुन अधिक लघुपटांचा प्रतिसाद महोत्सवात मिळालेला आहे. आजवर विविध देशातील लघुपटकारांनी प्रत्यक्ष फेस्टिवलची मजा लुटली आहे. युनिव्हर्सल मराठीच्या लघुपट चळवळीला लोकल ते ग्लोबल मिळणारा प्रतिसाद हे ह्या फेस्टिवलचे खास वैशिष्ट्य आहे. संकल्पनारचनावादी ठरलेल्या ह्या महोत्सवामध्ये चित्रपट सृष्टीतल्या मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभणार असून लघुपटकारांना विविध विषयांवर चर्चा आणि प्रश्नोत्तरांची संधी मिळणार आहे. या महोत्सवात सहभागी झालेल्या लघुपटांचे परीक्षण या क्षेत्रातील तज्ञांकडून केले जाईल. तीन दिवसीय असलेल्या या महोत्सवात निवडक लघुपटांचे स्क्रीनिंग केले जाईल. प्रत्येक लघुपट वर्गवारीतून प्रत्येकी एक ‘बेस्ट शॉर्टफिल्म’ विजेता आणि सर्वोत्तम कामगिरी करणा-याना वैयक्तिक तांत्रिक अॅवॉर्ड (टेक्निकल अॅवॉर्ड) देऊन गौरविण्यात येईल. लघुपट वर्गवारीतील विजेत्यांना रोख रकमेसहित आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येईल. फेस्टिवलच्या अधिक माहितीसाठी ९७६८९३०८५३ / ९९६९४१२४२६ / ९८१९५३०५६९ या क्रमांकावर तसेच ‘युनिव्हर्सल मराठी’च्या फेसबुकह पेजवर संपर्कसाधता येईल
 
- रुपेश दळवी