गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 1 जुलै 2015 (10:43 IST)

तीन दिवसात तीन कोटींचा ‘किल्ला’सर

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेले आशयघन चित्रपट समीक्षकांच्या पसंतीस उतरतात मात्र, सामान्य प्रेक्षकांचा त्या चित्रपटांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही आणि हे चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरतात, असा एक समज आपल्याकडे प्रचलित झाला आहे. यामध्ये काही अंशी तथ्य असलं तरी आता मात्र हे चित्र बदलायला सुरुवात झाली आहे आणि याचं उत्तम उदाहरण ठरला आहे ‘किल्ला’हा चित्रपट.
 
शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या किल्लाने सर्वत्र हाऊसफुलचे बोर्ड दिमाखात झळकवत पहिल्या तीन दिवसात कोटींची उड्डाणे घेत तीन कोटी पंचवीस लाख एवढी कमाई केली आहे. चित्रपटात स्टार पॉवर असलेले कलाकार नसताना, मनोरंजनाचा नेहमीचा मसाला नसताना, सशक्त कथा आणि तेवढ्याचा जबरदस्त अभिनयाच्या जोरावर ‘किल्ला’ने हे यश मिळवलंय.
 
पहिल्या आठवड्यात 225 चित्रपटगृहे आणि तीन हजार शोज् द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या ‘किल्ला’च्या शोज् मध्ये प्रेक्षकांच्या मागणीतून वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मुंबई पुण्यासह कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, लातूर, नागपूर मध्येही ‘किल्ला’ला असाच तुफान प्रतिसाद मिळत आहे. मराठी चित्रपट आणि आशयघनता हे एक समीकरणच बनलेलं आहे. 
 
कथेचा सशक्तपणा हे मराठी चित्रपटांचं वैशिष्ट्य आणि ‘किल्ला’ तर दमदार कथेसोबतच प्रेक्षकांना अप्रतिम दृश्यानुभव देतोय. निसर्गरम्य कोकणाला आपल्या सुंदर छायाचित्रणातून अधिक देखणं बनवलंय ते छायालेखक आणि दिग्दर्शक अविनाश अरुणने. लहान मुलांचं भावविश्व अतिशय संयतपणे चितारण्याचं काम त्याने या चित्रपटातून केलं आणि त्या विश्वात प्रेक्षकांनाही अलगदपणे नेलं.