शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 12 एप्रिल 2016 (16:51 IST)

लवकरच उलगडणार 'लाल इश्क' चे गुपित

बॉलीवूडमध्ये आपल्या विशेष शैलीसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेला पहिला मराठी चित्रपट 'लाल इश्क़' ला प्रदर्शनापूर्वीच मोठी प्रसिद्धी मिळत आहे. शिवाय या चित्रपटाच्या हटके नावामुळे या सिनेमाच्या कथानकावरून देखील अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. त्यामुळे अधिक काळ न दवडता आतापर्यंत गुलदस्त्यात असलेल्या या सिनेमाचा पहिला नजराणा लोकांसमोर नुकताच पेश करण्यात आला आहे. मरीन लाईन्स येथील कार्निवल मेट्रो सिनेमा येथे 'लाल इश्क' या सिनेमाचा सिनेकलाकारांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पोस्टर लॉच करण्यात आला. स्वप्ना वाघमारे- जोशी दिग्दर्शित या सिनेमाच्या पोस्टरवर दोन जीवांच्या उत्कठप्रेमाची प्रतिकृती पाहायला मिळते. धवल रंगाच्या बॅकग्राउंडवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेता स्वप्नील जोशी आणि हिंदी अभिनेत्री अंजना सुखानी यांचे काळे वस्त्र परिधान केलेले भव्य छायाचित्र या पोस्टरवर रेखाटले असून हा पोस्टर पाहताचक्षणी नजरेत भरतो. शिवाय या पोस्टरवर दिसणारे रक्त प्रेमाचा अट्टहास आणि संघर्ष सिद्ध करतो, मात्र त्याचक्षणी पोस्टरवरील 'गुपित आहे साक्षीला' हे उपशिर्षक प्रेक्षकांना संभ्रमात देखील टाकते. 
 
हा चित्रपट एकंदरीत रोमान्स आणि थ्रिलवर आधारित असल्याची जाणीव हा पोस्टर पाहताना होतो. विशेष म्हणजे, या चित्रपटासाठी स्वप्नीलने आपल्या लूकवर केलेली मेहनत देखील यातून दिसून येते. तसेच अभिनेत्री अंजना सुखानीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो. आतापर्यंत हिंदी सिनेमात नशीब अजमावणारी अंजना 'लाल इश्क' च्या माध्यमातून मराठीत पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.  
स्वप्नील-अंजना जोडीसोबत स्नेहा चव्हाण, जयंत वाडकर, प्रिय बेर्डे, पियुष रानडे, यशश्री मसुरकर, मिलिंद गवळी, उदय नेने, कमलेश सावंत,समिधा गुरु, फर्जील पेरडीवाला हे कलाकार देखील आपापल्या प्रमुख भूमिकेत दिसतील. भन्साळी प्रोडक्शनच्या या दर्जेदार सिनेमाची हिंदीतील प्रसिद्ध वेशभूषाकार शबिना खान यांनी सहनिर्मिती केली आहे. तसेच या सिनेमाची पटकथा व संवाद शिरीष लाटकर यांचे असून अमितराज, निलेश मोहरीड या दोघांनी मिळून या सिनेमाला संगीत दिले आहे. लाल इश्क़ हा मराठी सिनेमांमधला सर्वात उत्सुकता वाढवणारा चित्रपट ठरेल. येत्या २७ मे रोजी 'लाल इश्क़'च गुपित जगजाहीर होणार आहे.