शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 ऑक्टोबर 2015 (11:09 IST)

४था ‘माय मुंबई’ लघुपट महोत्सव १६ डिसेंबर पासून

‘युनिव्हर्सल मराठी’ आणि ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ’ यांचा पुढाकार.
 
मुंबई (रुपेश दळवी) - 'युनिव्हर्सल मराठी' सोबत 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ' आणि 'सांस्कृतिक कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य' यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘माय मुंबई’ लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा महोत्सवाचे हे चौथे वर्ष असून मुंबईच्या पु. ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिरात हा महोत्सव १६ ते १८ डिसेंबर या दरम्यान पार पडणार आहे. तीन दिवसीय असलेल्या या महोत्सवात लघुपटांच्या स्क्रीनिंगसोबत वेगवेगळ्या विषयांवर चित्रपटसृष्टीतल्या मान्यवरांचे चर्चासत्र होणार आहे. राष्ट्रीय स्तरावर होणा-या या महोत्सवासाठी शॉर्टफिल्ममेकर्स कडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.
 
या महोत्सवाचा यावर्षी विस्तार वाढविण्यात आला आहे. सामाजिक जनजागृती (सोशल अवेरनेस), आंतरराष्ट्रीय लघुपट (इंटरनॅशनल), अॅनिमेशनपट, मोबाईल शूट फिल्म, जाहिरातपट (अॅडफिल्म) या वर्गवारीसोबत संगीतपट (म्युझिक विडीओ) आणि माहितीपट (डॉक्युमेंटरी) या दोन वर्गवारीची वाढ करण्यात आली आहे.  सामाजिक जनजागृती ह्या वर्गवारीत खुल्या विषयांव्यतिरिक्त ‘सुखांत फ्युनरल मॅनेजमेंट’ ची 'सुखांत' हि विशेष उपवर्गवारी समाविष्ट करण्यात आली आहे. ह्याची माहिती वेबसाईट वर उपलब्ध होईल. अशा या वर्गवारींसाठी विनामूल्य ऑनलाइन प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०१५ ही आहे. 
 
‘शॉर्टफिल्म शोकेस’ या टीव्ही शोच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि मनोरंजनाचे मुल्य जपत या महोत्सवाने राष्ट्रीय पातळीवर मानाचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे देश विदेशातून या महोत्सवाला शॉर्टफिल्ममेकर्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महोत्सवामध्ये चित्रपट सृष्टीतल्या मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक विजय पाटकर, अनंत पणशीकर, नीलकांती पाटेकर यासारख्या दिग्गजांबरोबरच चित्रपट सृष्टीतल्या इतर अनेक मान्यवर तज्ञांकडून लघुपटकारांना मार्गदर्शन मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांना विविध विषयांवर चर्चा आणि प्रश्नोत्तरांची संधी मिळणार आहे. महोत्सवात सहभागी झालेल्या लघुपटांचे परीक्षण या क्षेत्रातील तज्ञांकडून केले जाईल. विजेत्यांना रोख रकमेसहित सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. या महोत्सवासाठी सर्वांनाच विनामुल्य प्रवेश असेल पण त्यासाठी आधीच नावनोंदणी करून घेणे गरजेचे आहे. अशी माहिती युनिव्हर्सल मराठीचे सरचिटणीस अमितराज निर्मल यांनी दिली. अधिक माहितीसाठी ९७६८९३०८५३ / ९८३३०७५७०६ या नंबरवर आणि www.mymumbaishortfilmfestival.com या वेबसाईटवर संपर्क साधावा. फेसबुकवरही https://www.facebook.com/MyMumbaiShortFilmFestival ह्या पेजला तुम्ही भेट देवू शकता.