testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

चॅम्पियन्स ट्रॉफी: बांग्लादेशचा पराभव, रविवारी भारत-पाक भिडणार

बर्मिंगहॅम| Last Modified शुक्रवार, 16 जून 2017 (08:35 IST)
जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्‍वर कुमार या वेगवान गोलंदाजांचा प्रभावी मारा आणि केदार जाधवच्या “गोल्डन आर्म’ची त्यांना लाभलेली साथ यामुळे चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपान्त्य लढतीत भारतीय संघाने बांगला देश संघाचा डाव निर्धारित 50 षटकांत 7 बाद 264 धावांवर रोखला. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माने शानदार शतक झळकावले. तसेच कोहली आणि धवनच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशवर शानदार विजय मिळवला. आज भारताने बांगलादेशचा 9 गडी राखून पराभव केला.
विजयी संघासमोर विजेतेपदाच्या निर्णायक लढतीत पाकिस्तानचे आव्हान आहे. पाकिस्तानने इंग्लंडला पराभूत करून याआधीच अंतिम फेरी गाठली आहे. येत्या रविवारी भारत-पाक अंतिम सामना रंगणार आहे.

264 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्माने शिखर धवनच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 87 धावंची भागिदारी रचली. यानंतर धवन बाद झाला. मग रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीने संघाचा धावफलक हालता ठेवला. रोहित शर्माने शतक झळकावले तर विरोटनेही अर्धशतक केले. रोहित आणि विराटने बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. रोहितने नाबाद 123 धावा केल्या तर कोहलीने नाबाद 92 धावा केल्या. तसेच या सामन्यामध्ये विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये कारकिर्दीतील आठ हजार धावांचा टप्पा गाठला. एकतर्फी झालेल्या या सामन्यामध्ये भारताने बांगलादेशचा 9 गडी आणि 59 चेंडू राखून पराभव केला.
सलामीवीर तमिम इक्‍बाल आणि मुश्‍फिकुर रहीम या अनुभवी फलंदाजांच्या जोडीने कडवा प्रतिकार करताना शतकी भागीदारी उभारल्यामुळेच बांगला देशला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. अश्‍विनने सोडलेला झेल आणि हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर तमिम त्रिफळाबाद झाला, तो नो बॉल असल्याचे पंचांनी जाहीर केल्यामुळे तमिम इक्‍बालला दोन बहुमोल जीवदाने मिळाली. परंतु त्याने या जीवदानांचा पुरेपूर फायदा घेत आपल्या संघाचा डाव सावरला. भारताकडून केदार जाधवने केवळ 22 धावांत तमिम इक्‍बाल आणि मुश्‍फिकुर रहीम या दोन अव्वल फलंदाजांना परतवून सर्वोत्तम कामगिरी बजावली. जसप्रीत बुमराहने 39 धावांत 2 बळी, तसेच भुवनेश्‍वर कुमारने 53 धावांत 2 बळी घेत त्याला साथ दिली. रवींद्र जडेजानेही 48 धावांत 1 बळी घेतला. मात्र अश्‍विनला 54 धावांत एकही बळी घेता आला नाही.
केदार जाधवचा “गोल्डन आर्म’

तमिम व मुश्‍फिकुर ही जोडी बांगला देशला मोठी धावसंख्या गाठून देणार हे दिसत असल्यामुळे विराट कोहलीने गोलंदाजीत अनेक बदल केले. परंतु या जोडीने त्यांना दाद दिली नाही. अखेर कोहलीने केदार जाधवच्या हाती चेंडू दिला आणि केदारने तमिम इक्‍बालला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. तमिमने 82 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह 70 धावांची शानदार खेळी केली. पाठोपाठ रवींद्र जडेजाने अनुभवी शकिब अल हसनला (15) बाद करून बांगला देशला आणखी एक हादरा दिला. तसेच केदारने पुढच्याच षटकात मुश्‍फिकुर रहीमला बाद करून भारताला मोठेच यश मिळवून दिले. मुश्‍फिकुरने 85 चेंडूंत 4 चौकारांसह 61 धावांची झुंजार खेळी केली. पाच बाद 184 अशा बिकट अवस्थेतून सहाव्या विकेटसाठी 7.1 षटकांत 39 धावांची भर घालताना महमुदुल्लाह आणि मोसाडेक हुसेन यांनी बांगला देशची आगेकूच कायम राखली. परंतु दुसऱ्या हप्त्यासाठी परतलेल्या बुमराहने मोसाडेकला आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद करून ही जोडी फोडली. मोसाडेकने 15 धावा केल्या. बुमराहने महमुदुल्लाहलाही बाद करून भारताला आणखी एक यश मिळवून दिले. परंतु मशर्रफ मोर्तझाने 25 चेंडूंत 5 चौकारांसह नाबाद 30 धावा फटकावताना टस्किन अहमदच्या साथीत आठव्या विकेटसाठी 5 षटकांत 35 धावांची अखंडित भागीदारी करून बांगला देशला 264 धावांची मजल मारून दिली.


यावर अधिक वाचा :