Widgets Magazine

'करो या मरो'च्या लढतीत भारताचा सामना न्यूझीलंडशी!

डर्बीस| Last Modified शनिवार, 15 जुलै 2017 (11:52 IST)
सलग चार विजयांमुळे उंचावलेल्या आत्मविश्‍वासाला सलग दोन पराभवांमुळे हादरा बसलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघासमोर महिलांच्या विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील आज (शनिवार) होणाऱ्या अखेरच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडच्या महिला संघाचे कडवे आव्हान आहे. या सामन्यात जिंकणारा संघ उपान्त्य फेरीत दाखल होणार असल्यामुळे दोन्ही संघांसाठी ही उपान्त्यपूर्व लढतच ठरणार आहे.
भारतीय महिला संघ गुणतालिकेत सध्या चौत्या क्रमांकावर असला, तरी त्यांना हे स्थान कायम राखण्यासाठी उद्या विजय मिळविण्याला पर्याय नाही. आजच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्यास भारतीय महिलांचे आव्हान संपुष्टात येणार आहे. भारतीय महिलांनी पहिल्याच सामन्यात बलाढ्य इंग्लंडला पराभूत करून खळबळ उडविली होती. त्यानंतर पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेच्या महिला संघाला पराभूत करून त्यांनी सलग चार विजयांची नोंद करीत उपान्त्य फेरीच्या उंबरठ्यापर्यंत झेप घेतली.
परंतु भारतीय महिलांची आगेकूच तिथेच रोखली गेली. पाचव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून आणि सहाव्या सामन्यात जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला आणि त्यांचे भवितव्य आता उद्या न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीतील विजयावर अवलंबून राहिले आहे. दरम्यान इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी उपान्त्य फेरीतील स्थान निश्‍चित केले असून चौथ्या स्थानासाठीच उद्या चुरस रंगणार आहे.
पहिले चारही सामने जिंकणाऱ्या भारतीय महिलांना संथ खेळपट्टीशी जुळवून घेता आले नसल्यामुळेच त्यांच्यावर ही वेळ आली आहे. पहिल्या दोन सामन्यांतील अर्धशतकांनंतर सलामीवीर स्मृती मंधाना सपशेल अपयशी ठरली आहे. आता किमान मोक्‍याच्या सामन्यात स्मृतीसह दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर आणि सुषमा वर्मा फलंदाजीत चमकदार कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे.

पूनम राऊतला पुन्हा एकदा फॉर्म गवसला असून तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावलेले शतक तिच्या आत्मविश्‍वासात भर घालणार आहे. पूनम आणि एव्हरग्रीन मिताली राज फलंदाजीचा भार पेलण्यासाठी सज्ज आहेत. मितालीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावताना एकदिवसीय क्रिकेटमधील सहा हजार धावा पूर्ण करीत विश्‍वविक्रम उभारला. मितालीने गेल्या नऊपैकी आठ सामन्यांत अर्धशतके झळकावली आहेत. परंतु प्रत्येक सामन्यात तिच्याकडून चमत्काराची अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही.
वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीला तिच्या लौकिकाला साजेश कामगिरी करता आली नाही. शिखा पांडेलाही फारसी चमक दाखविता आलेली नाही. त्यामुळे भारतीय महिलांना दीप्ती शर्मा, एकता बिस्त, हरमनप्रीत आणि पूनम यादव या फिरकी गोलंदाजांवर अवलंबून राहावे लागले. क्षेत्ररक्षण हा भारतीय महिलांचा कच्चा दुवा आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक झेल सोडले आहेत. न्यूझीलंडला गेल्या सामन्यात इंग्लंडकडून पत्कराव्या लागलेल्या पराभवामुळे त्यांच्यावरही दडपण राहील. त्याचा फायदा भारतीय महिलांना उठवावा लागेल.
प्रतिस्पर्धी संघ-
भारतीय महिला संघ- मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम, पूनम राऊत, दीप्ती शर्मा, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, एकता बिश्‍त, सुषमा वर्मा (यष्टीरक्षक), मानसी जोशी, राजेश्‍वरी गायकवाड, पूनम यादव व नुझत परवीन.

न्यूझीलंड महिला संघ- सूझी बेट्‌स (कर्णधार), ऍमी सॅटरथ्वेट, एरिन बर्मिंगहॅम, सोफी डिव्हाईन, मॅडी ग्रीन, होली हडलस्टोन, ली कास्पेरेक, अमेलिया केर, केटी मार्टिन, थॅमसिन न्यूटन. केटी पर्किन्स, ऍना पीटरसन, रॅचेल प्रीस्ट, हॅना रो आणि ली तुहुहु.
सामन्याचे ठिकाण- कौंटी ग्राऊंड, डर्बी. सामन्याची वेळ- दुपारी 3-00 पासून.


यावर अधिक वाचा :