गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

भारतीय संघ विराटवर अवलंबून नाही

गेल्या दीड-दोन वर्षांपासून सातत्याने धावा करणारा भारतीय कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म सध्या हरवला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सुरू होत असलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील भारतीय संघाच्या भवितव्याबद्दल अनेकांना चिंता वाटत आहे. मात्र भारतीय संघात अनेक गुणवान खेळाडू असून विराटच्या अपयशाची भरपाई करण्याची क्षमता त्यांच्यात असल्याची ग्वाही भारताचे प्रुडेन्शियल विश्‍वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांनी दिली आहे.
 
दिल्लीतील मॅडम तुसॉ वॅक्‍स म्युझियम येथे कपिल देव यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण आज करण्यात आले, त्या वेळी कपिल देव बोलत होते. विराट कोहलीच्या ढासळत्या फॉर्मचा भारतीय संघाच्या कामगिरीवर किती परिणाम होईल, असे विचारले असता ते म्हणाले की, ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला कसोटीपूर्वीही हाच प्रश्‍न विचारण्यात येत होता. प्रत्यक्षात काय घडले हे आपण पाहिलेच. विराट अपयशी ठरला तर काय होईल असे विचारून आपण संघातील अन्य खेळाडूंवर अन्याय करीत आहोत.
 
दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाल्यास विराट हा खूप मोठा खेळाडू आहे. त्यालाही आपल्या अपयशाची जाणीव आहे आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी त्याचाही प्रयत्न चालू असेलच. कधी आणि कसे खेळायचे हे त्याला बरोबर माहीत आहे, असे सांगून कपिल देव म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपासून भारतीय संघाची कामगिरी चांगलीच होत आहे. त्यांच्यात चॅम्पियन्स करंडक जिंकण्याची क्षमता निश्‍चितच आहे. परंतु स्पर्धेदरम्यान कागदावरील नियोजन मैदानावर प्रत्यक्षात उतरविण्यात त्यांना कितपत यश मिळते, यावर बरेच काही अवलंबून आहे.
 
कोणत्यीाह एका गोलंदाजावर संघ अवलंबून नसतो, असे सांगून कपिल देव म्हणाले की, एका गोलंदाजाने कितीही चांगली कामगिरी केली तरी तो एकटा जिंकत नसून संपूर्ण संघ विजयी होत असतो. सर्व खेळाडूंनी एकत्रितपणे सांघिक कामगिरी करण्याकडे लक्ष दिल्यास जिंकण्याची शक्‍यता वाढते. माझ्या मते आजचे युवा खेळाडू आमच्यापेक्षा अधिक व्यावसायिक आहेत. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी केलेल्या संघनिवडीवर टीका करणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी युवा खेळाडू निवडले असते, तर अनुभवींना का वगळले असे तुम्ही विचारले असते. माझे मत वेगळे असू शकेल. परंतु त्यामुळे संघनिवडीवर टीका करणे योग्य नाही, असे त्यांनी नमूद केले.