गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 19 ऑगस्ट 2014 (14:24 IST)

देशाची मान शरमेने झुकली

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये महेंद्रसिंग धोनी आणि इतर भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे भारताची मान शरमेने झुकली आहे, अशी टीका माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केली आहे. ज्या खेळाडूंना कसोटी क्रिकेट खेळण्यात रस नाही, त्यांनी कसोटी संघातून बाहेर पडले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी खेळाडूंना दिला आहे. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिकेत भारताने ३-१ अशी गमावल्याने चहुबाजूंनी भारतीय संघावर टीका होत आहे. ओल्ड ट्रॅफर्डपाठोपाठ भारतीय संघाने ओव्हलमध्ये अत्यंत खराब कामगिरी केल्याने पाचव्या कसोटी सामन्यातही भारताला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. भारताच्या या खराब कामगिरीबाबत बोलताना सुनील गावस्कर यांनी एका कार्यक्रमात भारतीय संघाला कठोर शब्दांत फटकारले. जर तुम्हाला देशासाठी कसोटी सामने खेळायची इच्छा नसेल तर संघातून बाहेर पडा, फक्त मर्यादित ओव्हरचे सामने खेळा. खराब कामगिरी करून तुम्ही देशाची मान झुकवली आहे, हे योग्य नाही अशा कठोर शब्दांत त्यांनी धोनी आणि टीमवर टीका केली. या कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी इंग्लंडच्या संघाचे कौतुकही केली. या कसोटी मालिकेत इंग्लंड संघाची कामगिरी प्रत्येक बाबतीत सरस होती. मात्र असे असले तरीही त्यांनी या विजयाने हुरळून जाता कामा नये, कारण यापुढे त्यांचीही कसोटी असेल असेही गावस्कर यावेळी म्हणाले. 
 
धोनीसह टीम इंडियाला आर्थिक दंड 
इंग्लंड कसोटी मालिकेत सपाटून मार खाल्ल्यामुळे भारतीय संघावर टीकेची झोड उडवली आहे. अशातच संघासाठी अजून एक वाईट बातमी समोर आली आहे. स्लो ओव्हर रेटमुळे कर्णधार धोनीवर सामन्याच्या मानधनापैकी ६० टक्के तर उर्वरित संघावर ३० टक्के दंड आकारण्यात आला आहे. वर्षभरामध्ये जर पुन्हा एकदा धोनीने षटकांची गती मंद ठेवल्यास धोनीवर एका सामन्याचा प्रतिबंधसुध्दा लावण्यात येऊ शकतो.