बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वेबदुनिया|

नाथन लियोनच्या धक्क्यांनी भारत बॅकफूटवर

PR
चेतेश्वर पुजारा व मुरली विजय यांनी वेगवान शतकी भागिदारी दिल्यानंतर सारख्या अंतराने विकेट्स पडून २६६ धावांवर ८ फलंदाज तंबूत परतल्याने भारतीय गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. आजचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने ४ धावांची आघाडी घेतली असून आर आश्विन व भुवनेश्वर कुमार खेळपट्टीवर होते.

नाथन लियोनने पुजारास (५२) धावांवर त्रिफळाचीत करून भारतास पहिला धक्का दिला. यानंतर विरोट कोहलीस (१) धावेवर यष्टिचित करून एकतरफी सामन्यात जोश निर्माण केला. मुरली विजयने (५७) केल्या मात्र कसोटी पदार्पण करणारा रहाणे विशेष प्रभाव पाडू शकला नाही. सचिनने ३२ धावा जोडल्या. धोनी २४ धावा करून बाद झाला. रविंद्र जडेजाने ४३ महत्त्वपूर्ण धावा जोडल्या. आश्विनने १० धावा केल्या. नाथन लियोन भारतासाठी कर्दनकाळ ठरला असून ५ खंदे मोहरे टिपले आहे.

ऑस्ट्रेलियाचा पहिला डांव २६२ धावांत संपृष्टात आल्यानंतर भारताने वेगवान शतकी सलामी दिली. मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराने आत्मविश्वासाने डावांची सुरूवात केली. पीटर सीडल, मिशेल जॉन्सन व जेम्स पॅटीन्सन या ऑस्ट्रेलियन वेगवान त्रिकूटाचा चांगला समाचार घेत प्रति षट्क ४.५ धावसंख्येच्या सरासरीने धावा जमवल्या होत्या.

मात्र आता भारतीय अपेक्षांवर पाणी फिरल्याचे चित्र असून ऑस्ट्रेलियन संघास दौर्‍यातील पहिला विजय साकार करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अखेर त्यांना आशेचा किरण गवसला आणि त्यांनी कसलीही चूक न करता त्यास दोन्ही हातांनी कवेत घेतले, असेच म्हणावे लागेल.

या पार्श्वभूमीवर भारतीय संघास सामना वाचवण्यासाठी कडवा संघर्ष करावा लागणार हे निश्चित आहे. भारतास चौथ्या डावांत फलंदाजी करावी लागणार असल्याचे टीम इंडियासमोर मोठे आव्हान आहे. येथून भारतास सामन्यात परतायचे झाल्यास ऑस्ट्रेलियास दुसर्‍या डावांत त्वरित बाद करून चौथ्या डावांत कडवी झुंज द्यावी लागेल.