गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By WD|
Last Modified: मुंबई , शनिवार, 19 एप्रिल 2014 (14:08 IST)

बीसीसीआयची २० एप्रिलला तातडीची बैठक

संलग्न संघटनांकडून सातत्याने येत असलेल्या दबावामुळे अखेर बीसीसीआयला झुकावे लागले असून २० एप्रिलला कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने श्रीनिवासन यांना पुन्हा बीसीसीआयमध्ये परतण्यास दिलेला नकार आणि त्यांच्यासह १३ जणांची स्पॉटफिक्सिंग अहवालात असलेली नावे या पाश्र्वभूमीवर संलग्न संघटनांकडून अशा बैठकीसाठी मागणी केली गेली. 
 
बीसीसीआयचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी दुबईहून सांगितले की, बीसीसीआय कार्यकारिणीची तातडीची बैठक २० एप्रिलला बोलावण्यात आली आहे. श्रीनिवासन यांना जोपर्यंत स्पॉटफिक्सिंग प्रकरणात क्लिन चीट मिळत नाही तोपर्यंत त्यांना बीसीसीआयमध्ये परतणे शक्य नाही, असे सुप्रीम कोर्टाने बुधवारी स्पष्ट केल्यानंतर सहा संलग्न संघटनांनी तातडीची कार्यकारिणी बैठक हवी अशी मागणी केली. या बैठकीत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल चर्चा हवी असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे सचिव के. के. शर्मा यांनी बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष शिवलाल यादव यांना पत्र लिहून सुप्रीम कोर्टात बोर्डाची बाजू मांडणा-या वकिलांना कोण आदेश देत आहे, याची माहिती नसल्याचे म्हटले होते.शर्मा यांनी म्हटले होते की,बोर्डाच्या वतीने कुणाच्या आदेशावरून वकील बाजू मांडत आहेत. बोर्डाच्या बैठकीत यासंदर्भात कधीही चर्चा झाली नव्हती किंवा यासाठी बोर्डाची बैठकही कधी बोलावण्यात आली नव्हती. बोर्डाकडून जी भूमिका घेण्यात येत आहे, त्यामुळे बोर्डाची प्रतिमा डागाळू नये एवढी आमची भूमिका आहे. म्हणूनच एक तातडीची बैठक बोलावण्यात यावी. २० एप्रिलला बोर्डाच्या मुंबईतील मुख्यालयात ही बैठक बोलावली जावी, कारण २२ एप्रिलला सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची पुढील सुनावणी आहे. या वकिलांनी बोर्डाच्या आदेशानुसार काम करायला हवे, कुणा एका व्यक्तीच्या सांगण्यावरून नव्हे.राजस्थान क्रिकेट असोसिएशनप्रमाणे अन्य संघटनांनीही अशाच स्वरूपाचे पत्र बीसीसीआयला लिहिले आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव निरंजन शहा यांनी अशा स्वरूपाचे पत्र पाच ते सहा संघटनांनी लिहिल्याचे म्हटले आहे.बीसीसीआयची जी बैठक २० तारखेला होणार आहे, त्या बैठकीत बीसीसीआयच्या वेबसाईटनुसार कार्यकारिणीतील पुढील सदस्य उपस्थित राहतील - सुनील गावस्कर (हंगामी अध्यक्ष), संजय पटेल (सचिव), अनुराग ठाकूर (संयुक्त सचिव), अनिरुद्ध चौधरी (खजिनदार), एस.पी. बन्सल (उपाध्यक्ष उत्तर विभाग), शिवलाल यादव (उपाध्यक्ष दक्षिण), चित्राक मित्रा (उपाध्यक्ष पूर्व), रवी सावंत (उपाध्यक्ष पश्चिम), राजीव शुक्ला (उपाध्यक्ष मध्य), दिल्ली, तामिळनाडू, बंगाल, मुंबई, उत्तर प्रदेश, हरयाणा, गोवा, नॅशनल क्रिकेट क्लब (पूर्व), क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (पश्चिम), रेल्वे स्पोर्टस प्रमोशन बोर्ड, कर्नाटक, पंजाब, गुजरात, विदर्भ व हैदराबाद. 
काही अनुत्तरित प्रश्न 
-बीसीसीआयच्या वकिलांना कोणाच्या सूचना 
-श्रीनिवासन यांच्या हकालपट्टीमागे कोण? 
-विशेष सर्वसाधारण सभा न घेण्यामागील कारण 
-दक्षिण विभाग विरुद्ध अन्य विभाग असे चित्र दिसणार का?