गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: अबुधाबी , शनिवार, 19 एप्रिल 2014 (13:56 IST)

मॅक्सवेलच्या तडाख्याने चेन्नई संघ पराभूत

किंग्ज पंजाबने कमाल केली.चेन्नईने दिलेले अशक्यप्राय वाटणारे आव्हान पंजाबने लिलया पार केले. चेन्नईचे २०६ धावांचे आव्हान पंजाबने ७ चेंडू शिल्लक ठेऊन ४ गड्यांच्या मोबदल्यात ओलांडले. ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड मिलर पंजाबच्या विजयाचे शिल्पकार ठरले. दोघांनीही तुफानी अर्धशतके ठोकली. मॅक्सवेलने विजयाचा पाया घातला आणि मिलरने त्यावर कळस चढवला. 
 
मॅक्सवेलने केवळ ४३ चेंडूत ९५ धावांची वादळी खेळी करताना १५ चौकार आणि दोन षटकार लगावले. मिलरने ३७ चेंडूत नाबाद ५४ धावा काढताना प्रत्येकी तीन चौकार व षटकार चढवले. चेतेश्वर पुजारा वीरेंद्र सेहवागने १८ चेंडूत ३१ धावांची सलामी दिली. वीरुने १० चेंडूत १९ धावा काढताना चार चौकार ठोकले. नेहराने त्यांची दांडी उडवली. पुजारा १३ धावा काढून बाद झाला. पंजाबची ३१ चेंडूत ३ बाद ५२ अशी स्थिती होती परंतु मॅक्सवेलने खेळाचा रंगच बदलून टाकला. त्याने मिलरसमवेत चौथ्या विकेटसाठी ११५ धावांची तुफानी भागीदारी केली. त्याचे शतक अवघ्या पाच धावांनी हुकले परंतु मिलरने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. कर्णधार बेली १७ वर नाबाद राहिला. पंजाबच्या पावरप्लेमध्ये ६४ धावा निघाल्या. त्यांच्या ५० धावात ३० चेंडूत, १०० धावा ६५ चेंडूत, १५० धावा ८५ चेंडूत तर २०० धावा ११२ चेंडूत निघाल्या. चेन्नई मोहित शर्माला खरपूस मार मिळाला. त्याने १७ चेंडूत ३५, नेगीने ३ षटकांत ३७, स्मिथने २ षटकांत २५ तर जडेजाने ४ षटकांत ४३ धावा दिल्या. अश्विनने ४१ धावांत २ बळी घेतले. 
 
आयपीएल टी २० स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबविरूद्ध धावांचा डोंगर उभा करतांना द्विशतकी मजल मारली. ड्वेन स्मिथ आणि ब्रेंडन मॅक्युलम या सलामी जोडीची तुफानी अर्धशतके आणि शतकी सलामी ही चेन्नईच्या डावाची वैशिष्ठे ठरली. चेन्नईने २० षटकांत ४ बाद २०५ अशी दणदणीत धावसंख्या काढली. 
 
चेन्नईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. स्मिथ-मॅक्युलम जोडीने पावर प्लेमध्येच ७० धावा झोडपून काढल्या. ब्रेंडनने ३० चेंडूत अर्धशतक काढताना प्रत्येकी चार चौकार व षटकार ठोकले. चेन्नईच्या ५० धावा २७ चेंडूत तर १०० धावा ५७ चेंडूत झळकल्या. १४ व्या षटकांत ब्रेंडन बाद झाला तेव्हा त्याने स्मिथ समवेत १२३ धावांची सलामी दिली होती. ४५ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ६७ धावा जोडल्या आणि स्मिथ बाद झाला. त्याने ४३ चेंडूत ६६ धावा काढताना ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले. बालाजीने त्याला बाद केले. त्यानंतर अवानाने रैनाला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने १९ चेंडूत २४ तर कर्णधार धोनीने ११ चेंडूत २६ धावा काढताना ३ चौकार व एक षटकार मारला. पंजाबतर्फे मिचेल जॉन्सन महागडा गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत ४७ धावा दिल्या. बालाजीने ४ षटकांत ४३ धावा देत २ बळी घेतले. मॅक्सवेलने २ षटकांत २३ तर आर. धवनने ३ षटकांत २१ धावा दिल्या. चेन्नईने दीडशेची मजल ९२ चेंडूत तर २०० धावा ११८ चेंडूत काढल्या.