शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

या रेस्टॉरंटमध्ये माकड आहे वेटर

टोकियो : मानव तंत्रज्ञान क्षेत्रात किती पुढे गेला आहे याच्या बातम्या आपण नेहमीच वाचत असतो. तंत्रज्ञानामुळे माणसाऐवजी आता अनेक ठिकाणी कामासाठी रोबोट आणले गेले आहे. त्याचबरोबर फॅक्टरी आणि हॉस्पिटलमध्येही आता रोबोट आणले गेले आहेत. माणसाला पर्याय म्हणून रोबोट हा मानला जात आहे. पण याला अपवाद ठरला आहे एक रेस्टॉरंट मालक. या मालकाने माणसाला पर्याय म्हणून चक्क माकडाचा उपयोग केला आहे. आपल्या हॉटेलमध्ये त्याने वेटर म्हणून माणसांऐवजी चक्क माकडांना कामाला ठेवले आहे.
हे अनोखे रेस्टॉरंट टोकियोमध्ये असून काबुकी असे या रेस्टॉरंटचे नाव आहे. ग्राहक वाढीसाठी मालकाच्या या कल्पनेचा खूपच उपयोग झाला असून माणसे येथे अन्नपदार्थांच्या खासियतीऐवजी माकडांसाठीच रांगा लावत आहेत. आत आलेल्या ग्राहकाचे स्वागत करणे, त्यांना मेन्यू कार्ड देणे, खाद्यपदाथांची ऑर्डर घेणे आणि खाद्य व पेये ग्राहकांना सर्व्ह करणे अशी सर्व कामे ही माकडे वेटरप्रमाणेच युनिफॉर्म घालून करतात.
 
याबाबत रेस्टॉरंट मालक सांगतो की त्याची पाळीव माकडे जेव्हा त्याच्या प्रत्येक कृतीची नक्कल करताना त्याने पाहिली तेव्हाच रेस्टॉरंटमध्ये त्यांना वेटर म्हणून ठेवायची कल्पना त्याला सुचली. २००८ सालापासून येट चेन, फुकू चेन ही दोन माकडे येथे वेटर आहेत. ग्राहक रेस्टॉरंटमध्ये आला की त्यांचे काम सुरू होते.
 
ग्राहकाचे एकजण स्वागत करतो, दुसरा त्याला बसायला खुर्ची देतो, हात पुसायला नॅपकीन देतो. मेन्यू कार्ड दिले की खाद्यपदार्थांची ऑर्डर एकजण घेतो, दुसरा ते सर्व्ह करतो. जपानमध्ये प्राण्यांकडून दोन तासापेक्षा अधिक काळ काम करवून घेण्यास कायद्याने बंदी असल्यामुळे या रेस्टॉरंट मालकाने माकडांचा ताफाच बाळगला आहे.