शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंदांनी आपल्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात हिंदू संस्कृतीच्या उन्नतीसाठी मोठे कार्य केले. त्यांचे गुरू रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणत, समाधी लाभानंतर द्वैतभूमीवर येणे फक्त अवतारांनाच शक्य असते. ते स्वत:मध्ये ‘मी’पणा राखून ठेवतात. त्यामुळेच त्यांना लोकांना उपदेश करणे शक्य होते. आपल्या आधत्मिक शक्तीच्या जोरावर भारताने सारे विश्व जिंकले पाहिजे, असे विवेकानंद नेहमी म्हणत. त्यादृष्टीने ते युवकांना जागृत करीत असत. आधत्मिकता व निवृत्ती परता ही स्वामीजींची मुख्य दोन वैशिष्टय़े त्यांच्या जीवनाचा व कार्यांचा  अभ्यास करताना दिसून येतात. समाजाला सांस्कृतिक, आधत्मिकदृष्टय़ा शक्तिमान करण्यासाठी धर्म, समाज, तत्त्वज्ञान यासाठी साधी सोपी भाषा स्वामीजींनी वापरली. उपनिषद, वेदामधील तत्त्वज्ञान स्वामीजींनी लोकांना साध्या, सरळ सोप्या भाषेत सांगितले. जेव्हा स्वामीजी पाश्चात्य, पौर्वात्य काव्य, तत्त्वज्ञान, विज्ञान, धर्म इत्यादी विषयांवर आपली मते प्रकट करीत तेव्हा श्रोते त्यांचे विचार तल्लीनतेने ऐकत. विवेकानंदांनी शिकागोच्या धर्मपरिषदेला जाण्याचा निर्धार केला. त्यांच्या अनेक मित्रांनी स्वामीजींच्या या कार्याला मदत केली. रामकृष्ण परमहंस यांनी त्यांच्या या विचाराचे स्वागत केले. स्वामी विवेकानंदांचा पाश्चिमात्य दौरा त्यांच्या स्पष्ट विचाराने गाजला. हिंदू धर्माबद्दल ज्या पाश्चात्य विचारवंतांत्या आणि सर्वसाधारण सामान्य माणसांच्या मनात जे संशय, कुशंका होत्या त्या दूर झाल्या. त्यांनी देश-विदेशात रामकृष्ण मठ, चळवळ वाढविली. आता त्यांचे शिष्य हाच वारसा चालवीत आहेत.