गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

पाकिस्तानाने सैनिकांना का मारले ?

काश्मीरमध्ये पुन्हा एकदा हल्ला झाला. तिथले दहशतवादी हल्ले आता सवयीचा भाग होऊ पाहत असताना, पाकिस्ताननेही शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. कट्टप्पाने बाहुबलीला का मारले, याचे उत्तर शोधण्यात देशभरातील जनता व्यस्त असताना, तिकडे पाकिस्तानच्या रॉकेट हल्ल्यात दोन जवान मारले गेले. तीन गंभीर जखमी झाले. जम्मू - काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये सोमवारी सकाळी साडे आठ वाजल्यापासून गोळीबार सुरु झाला. भारतीय सैन्य दले या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असताना मधूनच रॉकेट आणि मोर्टारचा मारा झाला. या आकस्मिक हल्ल्यात एक लष्कराचा आणि एक बीएसफचा असे दोन जवान शाहिद झाले. क्रूरतेचा कळस म्हणजे या दोन्ही शहिदांच्या मृतदेहांची विटंबना करण्यात आली आहे. 
 
सोमवारी पाकच्या लष्कर प्रमुखांचा नियंत्रण रेषेच्या परिसरात दौरा झाला. 'काश्मीरच्या संघर्षाला आमचे संपूर्ण पाठबळ असेल' असे जाहीरपणे सांगताना त्यांची जीभ एकदाही अडखळली नाही. भारताची ५६ इंची छाती आणि त्यांचे विरोधक या दोघांचीही त्यांना पर्वा वाटली नाही. जनतेचा तर विचार करण्याचीसुद्धा गरज नाही. चॅनलवर चर्चा करून पेटवले जातील, तेवढेच विषय आमच्यासाठी महत्वाचे असतात. तिथली चर्चा विरली की आम्हीही थंड. कुठल्याच गोष्टीचा पाठपुरावा करण्याची आम्हाला गरज वाटत नाही, त्यामुळे आमचा दबाब गटही नाही. या परिस्थितीची अचूक जाणीव असल्याने आमचेच नेते आम्हाला वाटेला लावत असतात. एखादा अडचणीचा विषय असेल तर मीडियाच्या पातळीवर त्याला बगल देऊन अथवा फाटे फोडून मोकळे होतात. देशांतर्गतच ही परिस्थिती असेल तर बाहेरच्यांनी आम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही. आम्ही आपापसातच भांडण्यात एवढे व्यस्त की बाहेरचे हल्ले आमच्या खिजगणितही नाही. झालाच तर त्यांचा एकमेकांविरोधात उपयोग. नुसती चिखलफेक बाकी काही नाही. म्हणूनच तर कुणीही येऊन आम्हाला खिजवून जातं, आम्ही निषेधाचे तेच ते खलिते धाडण्यापलीकडे काही करू शकत नाही. 
 
भारतीय लोकशाहीच आज विचित्रावस्थेत जाऊन पोहोचलीय. सत्तेत असलेल्यांची सत्तेची भूक संपत नाही. त्यांना दिल्ली ताब्यात हवी आणि गल्लीही. जमल्यास घराघरांवर झेंडे लावण्याचे त्यांचे मनसुबे, आणि त्यासाठीच्या लटपटी. नको त्या गोष्टींवर रोज नवी धोरणे, नवे निर्णय. गाय परम पावन आहे हे मान्य. देशी वंश टिकला पाहिजे हेही १०१ टक्के खरे. पण त्याचबरोबर सीमेवरचा सैनिकही तगला पाहिजे, यावर कुणीच का बोलत नाही? कधी म्हणतात नोटबंदीनंतर दहशतवादाला आळा बसला. कधी सर्जिकल स्ट्राईकनंतर अतिरेकी हल्ले कमी झाल्याची आकडेवारी. तरीही नित्यनेमाने सीमेवरचा सैनिक तिरंग्यात लपेटून परत का येतोय? याचे स्पष्टीकरण मिळत नाही. 
 
सत्ताधाऱ्यांची ही स्थिती असताना, विरोधकही भलतेच पिसाटलेत. देशांतर्गत सत्ता, देशापेक्षा मोठी नाही याचाही त्यांना विसर पडलाय. मणिशंकर अय्यर सारख्या 'महान' भूमिपुत्रांनी देशातील मोदी राज संपविण्यासाठी पाकिस्तानच्या मदतीची मागणी केली होती. मदतीची अशी याचना करताना, इथे भारतात लोकशाही आहे याचाच त्यांना विसर पडला होता. लष्कराच्या बळावर आक्रमण करून सत्तांतर करणं शक्य नाही, हेच ते विसरले होते. त्यामुळे त्यांच्या आवाहनाला तसा काही अर्थ नसला तरी, असल्या वाचाळ बडबडींमुळे शत्रुपक्षाचे मनोबल वाढत जाते. 'बघा तिथलेच लोक आमच्याकडे मदत मागण्यासाठी येताहेत, तिथे खरोखरच अन्याय चालू आहेत - त्यांच्या विरोधात लढायलाच हवं' असा ब्रेन वॉश करणं सोपं जाते. 
 
अनेकदा तर असा ब्रेन वॉश व्हायला मदत म्हणूनच इकडेच तथाकथित नेते आणि विचारवंत बरळत असतात की काय? असे वाटण्याजोगी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. वाचाळवीर दिग्विजय सिंहाचं यासाठी उदाहरण देता येईल. जगभरातील लोक आयसिसच्या वाढत्या जाळ्यात गुरफटत जात असताना, या सद्गृहस्थांनी आयसिसमधील मुस्लिम तरुणांच्या भरतीसाठी तेलंगणा पोलिसांना जबाबदार घोषित केलंय. तेलंगणा पोलिसांनी इस्लामिक स्टेटची बनावट वेबसाईट बनवली असून या माध्यमातून मुस्लिम युवकांना कट्टरपंथी बनविण्यात येत आहे, त्यांना आयसिस मॉड्यूल बनविण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत, असा दिग्विजय सिंह यांचा आरोप आहे. इतका गंभीर आरोप करताना त्याचा पुरावा जोडण्याचे कष्ट त्यांनी घेतलेले नाहीत. कुठल्यातरी प्रकरणावरून भलताच काहीतरी निष्कर्ष काढायचा आणि टिवटिवाट करून चर्चेत राहायचं इतकं सगळं सोप्प झालंय. पण यामुळे आपण जनतेत संभ्रम निर्माण करतोय. सुरक्षा दलांचे खच्चीकरण करतोय याचीही त्यांना जाणीव नाही. 
 
सत्य जनतेसमोर येण्याची कुठलीच उरलेली सोय नाही. सैन्य दलातील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करणारा - निकृष्ट जेवणाचा व्हिडीओ वायरल करणारा बीएसफ जवान तेज बहादूर खरा, की त्याला बडतर्फ करणारे अधिकारी योग्य काहीच कळत नाही. कोण दोषी? कोण जबाबदार? याचा निवडा होत नाही. पाकिस्तान आणि त्यांचे पोषित अतिरेकी आपल्या सैन्यावर एवढे भारी  कसे पडतात? इतक्या सहज इथे खूनखराबा करणं त्यांना कसं जमतं याचं उत्तर मिळत नाही.  
 
उन्मेष गुजराथी