शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

आता तिसर्‍या आघाडीचे 'नारायणास्त्र?'

किरण जोशी

Gajanan GhuryeGG
मुख्यमंत्रिपदाच्या लढाईत कॉंग्रेसच्या फडातील मुत्सद्यांनी नारायण राणेंसारख्या मैदानी नेत्याला 'चीत' केल्याने महाराष्ट्रातील आलम राजकारणात नुस्ता धुरळा उडाला आहे. कॉंग्रेसने तातडीने कारवाई करत राणेंना निलंबित केले तरी त्यामुळे राजकारणातील गुंतागुंत मात्र वाढणार आहे. राजकीय रणांगणावर एकाकी पडलेल्या राणेंच्या राजकीय भवितव्याबाबत यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 48 समर्थक आमदारांच्या बळावर सरकार पाडण्याची धमकी त्यांनी दिली असली तरी तसे करणार नाही, हेही त्यांनी सांगून टाकले आहे. त्याचवेळी शिवसेना आणि कॉंग्रेसची दारे त्यांच्यासाठी बंद झाली आहेत. इतर सर्वच पक्षांनी आपल्याला 'ऑफर' दिली असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी हा 'जळता' निखारा कोण ठेवून घेईल हा प्रश्न आहेच. त्याचवेळी दोनदा स्वतःलाच 'चटके' बसल्यानंतर कोणत्या तरी पक्षात जाऊन त्यांच्या भरवशावर आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा राजकीय खुळेपणा ते करतील असे वाटत नाही.

सहाजिकच स्वतंत्र पक्ष काढून अशा पक्षांची आघाडी बनविणे हाच त्यांच्यापुढचा पर्याय असल्याचे दिसते. कॉंग्रेसमध्ये आपले काही चालणार नाही हे आधीच ओळखलेल्या राणेंनी यापूर्वीच आपला स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची तयारी सुरू केली होती. त्यासाठीच त्यांनी 'स्वाभीमान' या संघटनेची स्थापनाही केली होती. या संघटनेच्या ताकदीचेच पक्षात रूपांतर करण्याचा त्यांचा इरादा असावा. तो यावेळी पूर्ण करण्याची वेळ आली आहे. त्यांच्यासारख्याच एकाकी पडलेल्या 'नेत्यांना' घेऊन युती व आघाडीला पर्याय म्हणून तिसरी आघाडी काढण्याचा त्यांचा विचार होऊ शकतो. या आघाडीत राज ठाकरे आणि राज्यातील इतर काही स्वयंभू नेतेही एकत्र येऊ शकतात. तिसरी आघाडी काढण्याबाबतच्या हालचाली यापूर्वी अनेकवेळा झाल्या होत्या. पण, त्यात फुटकळ पक्ष असल्याने तिचा प्रभाव कधी जाणवला नाही. यावेळी मात्र प्रादेशिक नेत्यांच्या एकवटलेल्या ताकदीने या आघाडीचा परिणाम नक्कीच जाणवू शकतो.

राज ठाकरे राजकारणात स्वतंत्र पक्ष घेऊन उतरले असले तरी या पक्षाला राज्यव्यापी विस्तार नाही. मुंबई, पुणे, नाशिक औरंगाबाद या शहरी भागात त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पण राज्यात सत्तेवर यायचे असेल किंवा दबावगट निर्माण करायचा असेल तर पुरेसे आमदार हातात हवे. त्यासाठी राज यांना अशी एखादी आघाडी फायदेशीर ठरू शकते. पण मग त्यांना घेऊन झालेल्या आघाडीचे नेतृत्व कोणाकडे असेल हा प्रश्न आहे. राणेंची मुख्यमंत्रिपदाची आकांक्षा लपून राहिलेली नाही आणि राज बाळासाहेबांच्या नेतृत्वात तयार झाले असल्याने आपल्यामागे लोकांना घेऊन चालायची त्यांना सवय आहे. अशा परिस्थितीत कोणी कोणाचे ऐकायचे यावरून आघाडीतच 'बिघाडी' होण्याची शक्यता अधिक.

बहूजन समाज पक्षालाही राज्यभरात बेस निर्माण करण्यासाठी अशा एखाद्या मजबूत 'खांद्याची' गरज आहेच. पण या आघाडीत 'मनसे' असेल तर 'बसप' या आघाडीत येण्याची शक्यता नाही. कारण उत्तर भारतीय 'बसप' आणि महाराष्ट्रवादी 'मनसे' एकत्र येणार कसे? पण 'मनसे' या आघाडीत नसेल तर 'बसप'ला त्यांच्या नेतृत्वाखाली यायला काही अडचण असेल असे वाटत नाही. तीच कथा समाजवादी पक्षाची आहे. तोही याच अटीवर पक्षात येऊ शकतो.

याशिवाय राज्यातील इतर प्रादेशिक पक्ष व अपक्षही ही या आघाडीत येऊ शकतात. विनय कोरेंचा जनसुराज्य हा कोल्हापूर जिल्ह्यात असलेला पक्षही त्यापैकीच एक. कोरेंनी गेल्या निवडणुकीत ही कमाल करून आपल्या हिमतीवर काही आमदार निवडून आणले व स्वतः मंत्रीही बनले.

शेतकरी कामगार पक्षही राजकारणात उपेक्षित ठरला आहे. रायगड जिल्ह्याव्यतिरिक्त त्याचे अस्तित्व फारसे नाही. त्यामुळे राज्यव्यापी दबावगट बनविण्यासाठी हा पक्ष राणेंच्या नेतृत्वाखालील आघाडीत दाखल झाल्यास आश्चर्य वाटायला नको. पण श्रीवर्धन निवडणुकीत राणेंना विरोध करण्यासाठी शिवसेना व शेकाप एकत्र आले होते. त्यामुळे राणे विरोध बाजूला ठेवून शेकाप त्यांच्याशी जुळवून घेईल काय हा प्रश्न आहे. शेकापचे सांगलीतील आमदार शरद पाटील हे देखील आघाडीच्या प्रतिक्षेत आहेत.

कम्युनिस्ट पक्षालाही या आघाडीत येण्यास काहीच हरकत नाही. राज्याच्या राजकारणात काही परंपरागत मतदारसंघ तेवढे राखून असणारा हा पक्षही मर्यादित झाला आहे. त्यामुळे एकत्र येऊन ताकद दाखवायला तो राणेंबरोबर आला तरी आश्चर्य वाटायला नको. शिवाय केंद्रातही हा पक्ष आता कडवा कॉंग्रेसविरोधी बनलाच आहे. त्यामुळे राज्यातही राणेंच्या कॉंग्रेसविरोधात त्यांनी सूर मिळवायला हरकत नाही.

विदर्भात कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुख हेही कॉंग्रेसविरोधात गेले आहेत. कॉंग्रेसचे उमेदवार सुबोध मोहिते यांच्याविरोधात ते बंडखोरी करून पोटनिवडणुकीत उतरलेही होते. कॉंग्रेसविरोध या मुद्यावर ते राणेंना साथ देऊ शकतात. अमरावतीतून फुटलेले भाजपचे बंडखोर हरिभाऊ राठोड हेही राणेंना साथ देऊ शकतात. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी त्यांनी कॉंग्रेसच्या बाजूने मतदान केले होते. पण त्यामागे कॉंग्रेसची अणू करारविषयक भूमिकेपेक्षा वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला झालेला अडसरच जास्त होता. अशावेळी धनगर समजाला घेऊन तेही राणेंबरोबर येऊ शकतात.

राज्यात स्वतःच्या ताकदीवर निवडून येणारे अनेक 'स्वयंभू' अपक्ष आमदारही आहेत. सुरेशदादा जैन, राजू शेट्टी हे त्यापैकीच.त्यांच्यासारखे अनेक आमदारही निवडणुकीपूर्वी त्यांच्याबरोबर येऊन आघाडीत सामील होऊ शकतात.

तिसरी आघाडी राज्यात स्वतंत्रपणे सत्तेवर येऊ शकते असे नाही. परंतु, राज्यात सत्तेची समीकरणे घडविण्यात व बिघडवण्यातही ही आघाडी मोठी भूमिका बजावू शकते. सध्या राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्याविरोधात शिवसेना-भाजप युती आहे. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तिसरा अँगल निर्माण झाला आहे. या सगळ्यांविरोधात राणेंच्या नेतृत्वाखालील तिसरी आघाडी महत्त्वाची ठरू शकते. सत्तेची बेरीज-वजाबाकी करताना तिसर्‍या आघाडीचा पाठिंबा आयत्यावेळी महत्त्वाचा ठरू शकतो. अशावेळी तीस ते चाळीस आमदार जरी राणेंकडे असतील तरीही ते त्यांना हवे ते पदरात पाडून घेऊ शकतात. पण राणे यातील नेमके काय करतील हे सध्यातरी सांगणे अवघड आहे.