गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 4 मार्च 2015 (15:35 IST)

ऋणानुबंध

दमयंती आल्या आल्या हताश होऊन मला विचारीत होती, ‘हे कसले ऋणानुबंध आहेत गं तिचे माझे?’ मी शांतपणे विचारले ‘कुणाचे? कशासंबंधी बोलतेस तू?’ ‘अगं सुनेचा फोन आला. दोघांची भांडणे झालीत. ती म्हणते, आई तुमच्या मुलाला समजवा. माझ्या पायानं लक्ष्मी आली. म्हणूनच भरभराट झाली तुमची. मलाच हिशेब विचारतो तुमचा मुलगा. मला 50 रुपये द्या. मी पंढरपूरच्या आश्रमात जाऊन राहाते’, हे ऐकून मला हसू आलं, ‘अगं, 9 लाख रुपये माहेरी देणारी, भावाला गाडी घेऊन देणारी, भावाच्या पोरीचं इंजिनिअरिंगचं शिक्षण करणारी, हिच्याजवळ 50 रुपये नाहीत का? जिला आश्रमात राहायचं ती असं सांगून जात नाही. इथं इतकी चैनीला सोकावलेली तुझी सून माहेरीदेखील राहायची नाही. आहे काय माहेरी? दीड खोलीची जागा. हा पांढरा हत्ती 8 दिवस देखील पोसायची ताकद नाही त्यांची. ही नुसती धमकीची भाषा आहे. घाबरू नकोस?’ ‘अगं, ते मलाही माहीत आहे. आल्या दिवसापासून ओळखते तिला. पण मला प्रभाकरची काळजी वाटते गं. एवढा खोर्‍यानं पैसा मिळवतो पण काडीचं सुख नाही त्याला. एवढय़ा सगळ सुखसोयी आहेत, गाडी, बंगला, दागदागिने, वर्षातून दोनदा फॉरिनच ट्रीप, दर आठवडय़ाला स्वंपाकाला सुटी, नाश्तपासून बाहेरचं मागावाचं. लग्नानंतर 10 वर्षे मूल झालं नाही त्याचं तिला काहीच वाटत नव्हतं. उलट मूल झाल्यावर त्याचा त्रासच वाटायचा तिला. त्याला सांभाळायला रात्रीची एक बाई व दिवसाची एक बाई. बाळ रडायला लागलं तर मोलकरणीवर खेकसाची. मोलकरणी पण म्हणायच, इतक्या वर्षानी मूल झालं पण बाईला काही नाही त्याचं. जरा त्रास सोसत नाही हिला. बाई आहे की कोण?’
 
‘आता तर मुलाला शिकाला होस्टेलवर ठेवलं पुण्याला. घरात सगळ्या कामाला बाई. परत वॉचमनची बायको दिवसभर तैनातीला आहेच. तरी काय दुखतयं हिचं कळत नाही. आम्ही कोणी गेलेलं तर अजिबात खपत नाही. मुलाला म्हटलं, तूच येत जा बाबा कधी मधी भेटायला. तर असं आहे बघ. अगं बाई, मुलाला दु:ख झालं तर आईचं काळीज पण दुखतं गं!’ यावर काय बोलावं तेच सुचेना. मी म्हणाले, ‘असतो एकेकाचा स्वभाव. त्याला  औषध नसतं म्हणतात ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. तू काही काळजी करू नकोस. प्रभाकरला आता त्याची सवय झाली. त्याचे नि तिचेही असे ऋणानुबंध असतील आणि ते तोडताही येत नाहीत. सोसावे लागतात. देव कुठल्या ना कुठल्या रूपात दु:ख देत असतो.’
 
एक सुस्कारा तोडीत दमयंती म्हणाली, ‘खरं आहे बाई. पण माझा एकुलता एक मुलगा आहे गं. एवढा रूपवान, हुशार, बिझनेसमन, पण त्याचं मातेरं केलं हिनं. माहेरचे सोकलेत हिचे पैसे घ्यायला नि चैन करायला.’ चहा, खाणे होऊन दमंती गेली.
 
माझं विचारचक्र चालू झालं. निती आपल्याला खेळवीत असते. कधी कधी अगदी अंत पाहते. जीवनाला माणूस विटून जातो. संपवून टाकावं वाटतं जीवन. पण कुठे तरी आशा तेवत असते, त्यावर माणूस जगत राहतो. अशा श्रीमंतांनी विचार करावा आपल्याला खूप काही दिलं देवानं. दु:ख कमीच आहे. इतरांना किती दु:ख आहे. गरिबांनी म्हणावं, मला देवानं धट्टंकट्टं शरीर दिलं इतर पंगू, रोगी माणसांपेक्षा मी कितीतरी सुखी आहे. तसंच सर्वानीच आपलपेक्षा गरीब, दु:खी माणसांकडे पाहून विचार करावा, मी इतरांपेक्षा खूपच सुखी आहे. माणूस सुखासाठीच तर धडपडत असतो. 
 
ते सुख स्वत:च शोधायचं असतं. त्यालाच तर जीवन म्हणतात. आपल्या पदरी जे आलं त्याचं सुखात कसे रूपांतर करायचे हे शिकलं पाहिजे. यासाठी देवाला दोष न देता स्वत:ला बदलायला शिकलं पाहिजे. नशिबाने दिलेत ते सुखाचे क्षण वेचले पाहिजेत. ते आठवीत जगले पाहिजे. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार बनले पाहिजे.