शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

चाळीस वर्षांच्या संघर्षानंतर तेलंगाणाची निर्मिती

PR
PR
तेलंगाणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर हे राज्य आता देशाचे २९ वे राज्य होईल. तेलंगाना हे स्वतंत्र राज्य बनण्यासाठी येथील लोकांना जवळजवळ ४० वर्ष संघर्ष करावा लागला आहे. तेलंगाणा म्हणजे 'तेलगु लोकांची भूमी'.

१५ नोव्हेंबर २००० रोजी बिहारहून वेगळा झालेल्या झारखंड आणि ९ नोव्हेंबर २००० रोजी उत्तर प्रदेशापासून वेगळा झालेल्या उत्तराखंड आणि त्याच वर्षांत १ नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशपासून वेगळा झालेला छत्तीसगढला स्वतंत्र राज्याचा दर्जाचा प्राप्त झाल्यानंतर ९ वर्षानंतर तेलंगाणाला वेगळे राज्य बनवण्याचा प्रस्ताव आला.

आंध्र प्रदेशात एकूण २३ जिल्हे आहेत. त्यात राज्याची राजधानी हैद्राबादचाही समावेश आहे. त्याव्यतिरिक्त आंध्र प्रदेशच्या समुद्रकिनार्‍यालगतचे ९ जिल्हे, रायलसीमामध्ये चार जिल्हे आणि तेलंगाणामध्ये १० जिल्हयाचा समावेश आहे. २००१ मध्ये स्थापन झालेल्या तेलंगाणा राष्ट्र समितीने (टीआरएस) आपल्या स्थापनेच्या वेळेपासूनच तेलंगाणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळण्यासाठी संघर्ष केला. तेलंगाणा क्षेत्रात आंध्र प्रदेश विधानसभेच्या एकूण २९४ जागांपैकी ११९ जागा आहेत. अशाचप्रकारे लोकसभेच्या एकूण ४२ जागेपैकी १७ जागा आहेत.

तेलंगाणा क्षेत्रात हैद्राबाद, अदिलाबाद, निजामाबाद, करीमनगर, मेडक, वारंगल, रंगरेड्डी, नलगोंडा, खम्मम आणि मेहबूबनगर यांचा समावेश आहे. स्वतंत्र राज्याच्या मागणीचा स्वर पहिल्यांदा १९६९ मध्ये ऐकू आला होता. परंतु, त्यावेळी काँग्रेसने भाषेच्या आधारावर स्वतंत्र राज्याच्या स्थापनेचा कडाडून विरोध केला होता. उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेसच्या या भूमिकेशी मतभेद होऊन काँग्रेस नेते एम. चेन्ना रेड्डी यांनी पक्ष सोडून १९६९ मध्ये तेलंगाणा प्रजा समितीची स्थापना केली होती. स्वतंत्र राज्यासाठी केलेल्या आंदोलनाने १९७१ मध्ये उग्र रुप धारण केले होते. परंतु, याला प्रत्युत्तर म्हणून १९७२-७३ मध्ये 'जय आंध्रा' आंदोलन छेडले होते.

त्याच्याही थोडं मागे जायचं तर तेलंगाणा पूर्वीच्या हैद्राबाद राज्याचा हिस्सा होते. हैद्राबाद राज्याला १९४८ मध्ये भारतीय संघराज्यात सामील केल्यानंतरही तेलंगाणा १९५६ पर्यंत वेगळे राज्य बनून राहिले. त्यानंतर त्याला आंध्र प्रदेशात सामील करण्यात आले. मद्रास प्रातांपासून वेगळे करुन आंध्र प्रदेशची स्थापना झाली होती. आंध्र प्रदेश देशाचे पहिले असे राज्य होते, ज्याची स्थापना भाषेच्या आधारावर करण्यात आली.

तेलंगाणामध्ये १० जिल्हे आहेत - ग्रेटर हैद्राबाद, रंगा रेड्डी, मेडक, नालगोंडा, महबूबनगर, वारंगळ, करीमनगर, निजामाबाद, अदिलाबाद आणि खम्मम.

तेलंगाणाची सीमा आंध्र, रायलसीमा (वर्तमान आंध्र प्रदेशचा हिस्सा), कर्नाटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगढच्या सीमेशी लागून आहे. ११४,८०० वर्ग किलोमीटर इतके तेलंगाणाचे क्षेत्रफळ असून येथील लोकसंख्या जवळजवळ ३.५ कोटी आहे. येथील प्रमुख भाषा तेलुगु आणि उर्दू आहे. तेलंगाना क्षेत्र उंचावर स्थित आहे. गोदावरी आणि कृष्णा या येथील दोन मुख्य ना आहेत. ग्रेटर हैदराबाद हे माहिती तंत्रज्ञानाचे प्रमुख केद्र असल्यामुळे हे नवीन राज्याची राजधानी बनण्याची शक्यता आहे.
दरम्यान, तेलंगाणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिल्याच्या केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध करताना मोठया संख्येने खासदारांनी आपले राजीनामे दिल्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये राजनैतिक संकट निर्माण झाले आहे. बातमी मिळेपर्यंत आंध्र प्रदेश विधानसभेतील काँग्रेसच्या ५२ आणि टीडीपीच्या १२ आमदारांनी तसेच विजयवाडयाचे कॉंग्रेस खासदार एल.राजगोपाल यांनी राजीनामा दिला आहे.

केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम्‌ यांनी आंध्रच्या विभाजनाची घोषणा केल्यानंतर आज अखेर के. चंद्रशेखर राव यांनी आपले उपोषण सोडले.

स्वतंत्र तेलंगाणाला केंद्र सरकारने हिरवा कंदिल दाखवल्यानंतर आता महाराष्ट्रात वेगळया विदर्भाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. विलास मुत्तेमवार आणि दत्ता मेघे यांनी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा पुन्हा उचलून धरत स्वतंत्र विदर्भाची मागणी केली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही खासदारही काँग्रेसचेच आहेत.