शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 3 सप्टेंबर 2014 (11:36 IST)

जल एटीएमने भागली गावकर्‍याची तहान

राजस्थान हा वाळवंटी प्रदेश आहे. या भागात कायमस्वरूपी पाण्याची टंचाई असते. मात्र, या राजस्थानमध्ये सध्या जीवन अमृत प्रकल्पाने मोठय़ा आशा जागवल्या आहेत. आपण पैसे काढण्यासाठी एटीएम वापरतो. आता राजस्थानमध्ये पाण्यासाठी एटीएमचा वापर केला जात आहे. 20 लिटर पाणी अवघ्या 5 रुपयांत मिळत आहे. विशेष म्हणजे हे पाणी 24 बाय 7 या तत्त्वावर उपलब्ध आहे. केर्न्‍स इंडिया या खासगी कंपनीने हा प्रकल्प राबवला आहे. यासाठी लागणारे मशीन व पाणी शुध्द करणारी आरओ यंत्रणा कंपनीने दिली. भाखरपूर, कावस, गौडा, जोगसार, अकदादा आणि भाटू गावातील 22 हजार जणांना याचा फायदा होत आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागानेही या प्रकल्पासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशाच्या भौगोलिक क्षेत्रफळात राजस्थानचा वाटा 10.4 टक्के आहे. तर देशातील 5.5 टक्के  लोकसंख्या या राज्यात राहते. तर देशातील 1.15 पाणी या राज्यात आहे. अत्यंत दुष्काळग्रस्त भाग म्हणून राजस्थान ओळखला जातो.
 
या राज्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. जैसलमेर येथे 100 मिमी तर झालावर येथे 800 मिमी पाऊस वर्षाला पडतो. 
 
सध्या 17 गावांमध्ये 22 आरओ मशिन्स बसवल्या आहेत. त्यातून 22 हजार गावकर्‍यांना दरदिवशी पाणी पुरवले जाते. या प्रकल्पामुळे गावकर्‍यांना शुध्द, स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणार आहे.
 
या प्रकल्पाअंतर्गत ग्राहकांना 150 रुपयांची गुंतवणूक करावी लागते. त्यांना त्या बदल्यात एक कार्ड मिळते. त्यानंतर 20 रुपये भरून ते कार्ड रिचार्ज करावे लागते. या पैशातूनच आरओ प्रकल्पाचा खर्च, ऑपरेटरचे वेतन, वीज, देखभाल खर्च भागवला जातो. या प्रकल्पामुळे जलजन्य आजारांचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच पाण्यातील फ्लोराइडचे प्रमाण कमी झाल्याने सांधेदुखीचा त्रासही कमी होत आहे, असे गावकर्‍यांनी सांगितले.