गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 3 जानेवारी 2015 (14:05 IST)

तंत्रज्ञान, मुले आणि पालक

अलीकडच्या काळात मुलांमधील आधुनिक तंत्रज्ञानाबाबतचे वेड वाढल्याचे दिसून येत आहे. आई-वडीलही आपल्या मुलांसोबत लॅपटॉप आणि टॅबलेटवर भरपूर वेळ घालवत असतात. त्यांच्याबरोबर गेम खेळतात आणि त्यातून भरपूर धमालही करतात. काळानुसार चालणे गरजेचे असते. त्यामुळे मुलांसोबत नाते वाढविण्यासाठी किंवा ते घट्ट करण्यासाठी टेक्नॉलॉजी एक चांगले माध्यम बनू शकते; मात्र त्याचा अतिवापर आणि अयोग्य वापर टाळणेही आवश्यक असते, हे विसरता कामा नये.
 
काळानुसार मुलांबरोबरचे नाते बदलायचे असेल तर तुम्ही मुलांसोबत त्यांच्या आवडीचे व्हिडिओ गेम खेळता का? 
 
मुलांसोबत डायनिंग टेबलवर बसून एखाद्या सोशल साईटस्च्या बाबतीत चर्चा करता का? हे प्रश्न पालकांनी स्वत:ला विचारले पाहिजेत. त्याचे उत्तर नाही असे असेल तर आपल्या मुलांसोबतचे नाते थोडे आधुनिक बनवण्याची गरज आहे. पारंपरिक किंवा टिपीकल पालक बनण्यापेक्षा मुलांसोबत थोडेसे आधुनिक होऊन त्यांना त्यांच्या पद्धतीने समजवून घ्यावे आणि त्यांचे संगोपन करावे. कारण मुले बहुतेकवेळा याच कारणांमुळे आपल्या पालकांपासून वेगळी होतात किंवा त्यांच्यात अंतर पडते, असे अलीकडील काळात दिसून आले आहे. याउलट मुलांसोबत नव्या तंत्रज्ञानासंदर्भात गप्पा मारल्या, अनुभव शेअर केले तर दोघांमधील नातेसंबंध सुधारतीलच; पण तंत्रज्ञानाचे दुष्परिणामही टाळता येणे शक्य आहे. 
 
नव्या तंत्रज्ञानाबद्दल जाणून घ्या : पालक म्हणून आपल्या मुलांसोबत उत्तम नाते रुजविण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाबाबत चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. शिवाय त्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असणे गरजेचे आहे. सोशल साईटस्वर त्यांच्यासोबत राहावे. 
 
मुलांनी काही नवीन केले तर त्याबाबत त्यांना आपुलकीने विचारावे, अशा प्रकारे दोघांमध्ये संवाद वाढेल. परदेशात 10 पैकी 7 माता-पिता आपल्या मुलांसोबत सोशल साईटस्वर जोडलेले असतात. भारतात मात्र असे पालक कमी असल्याचे दिसते. भारतातील शहरी भागातील माता-पिता आपल्या मुलांसोबत सोशल साईटस्वर जोडलेले दिसतात. 
 
बर्‍याच घरांमध्ये मुलांना इंटरनेटबाबतचे ज्ञान पालकांपेक्षाही अधिक असते. त्यामुळेच मुले इंटरनेटवर काय करत आहेत, हे आई-वडिलांना समजत नाही. ते फक्त ‘अभ्यास कर, जास्त इंटरनेट वापरू नको,’ असे सल्ले देण्यातच धन्यता मानतात. परंतु तरीही आपली मुले इंटरनेटवर काय बघत आहेत याकडे लक्ष देणे गरजेचे असते. यासाठी पालकांनी इंटरनेटसाक्षर असणे आवश्यक आहे. 
 
अनेक मुले इंटरनेटचा वापर शाळेत दिले गेलेले प्रोजेक्ट बनविण्यासाठी करतात. बौद्धिक पातळी वाढविण्यासाठी किंवा ज्ञान मिळविण्यासाठी इंटरनेटचा वापर होत असेल तर त्याला अटकाव करू नये. मात्र काही मुले संपूर्ण प्रोजेक्ट इंटरनेटवरूनच कॉपी करतात. अनेकदा पालकही आपले काम वाचले म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात; हे चुकीचे आहे. कारण तशीच सवय लागल्यास मुलांमधील सर्जनशीलतेला, कल्पनाशक्तीला, प्रतिभेला चालना मिळत नाही. अशा वेळी मुलांना याबाबत समजावून सांगावे. तसेच त्या प्रोजेक्टच्या कृतीविषयी माहिती घेऊन, व्हिडिओ पाहून स्वत:च्या कल्पनाशक्तीचा वापर करून तो पूर्ण करण्याचा सल्ला द्यावा. याकामी त्यांना मदत करावी. 
 
हल्ली बरीच मुले पाढे पाठ करण्याऐवजी कॅलक्युलेटरचा वापर करतात. अशावेळी त्यांना पाढय़ाचे महत्त्व समजावून सांगावे. बुद्धी आणि मेहनतीने तुम्ही इंटरनेटलासुद्धा हरवू शकता, त्यासाठी मूलभूत गणितसूत्रे, पाढे पाठ असणे आवश्यक असते, ही बाब मुलांना पटवून द्यावी. इंटरनेटमुळे होणारे आणखी एक नुकसान म्हणजे मुलांना एका सर्चमध्ये इतिहासाबाबतही माहिती उपलब्ध होते. त्यामुळे त्यांना या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागत नाहीत. परिणामी त्यांची बुद्धी कमकुवत होऊ लागते. म्हणूनच इंटरनेटसोबतच मूलभूत अभ्यासाच्या पद्धतीपासून मुले दूर होणार नाहीत याची पालकांनी दक्षता घ्यायला हवी. 

- जान्हवी शिरोडकर