मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By वेबदुनिया|

नवा सूर्य आणू चला यार हो

न जाणे न येणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती
 
असे सांगत 'युगामागुनि चालली रे युगे' पृथ्वी पुढे चाललीच आहे. स्वतःभोवती फिरता फिरता त्या 'तेजोनिधी' भोवतीही फिरत प्रेमाची याचना करते आहे. प्रेमगीत गुणगुणते आहे. कित्येक वर्षे हे चक्र चालले आहे. यापुढेही कित्येक वर्षे चालत रहाणार आहे. रोज नवा दिवस उगवतो नि मावळतो. दिवस सरतात, महिने सरतात नि वर्षेही सरतात. कॅलेंडरची पाने मागे टाकली जातात. नवी कॅलेंडरे येतात नि जातात. निसर्गाला आकड्यांच्या कोंदणात बसवून हे सारे चालले आहे. आताही 2014 हे वर्ष सरले आहे. नि उद्या सकाळी नवे 2015 हे वर्ष उगवेल. 
 
खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी
 
या घडीला हा अनुभव लाखो लोक घेत असतील. पण प्रत्येक वेळी 
 
प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी
 
ही अवस्था झाल्याशिवाय रहात नाही. मग तो समुद्रकिनारा जपानचा असो, गोव्याचा असो. की अमेरिकेचा. आता नवा सूर्य उद्या उगवेल. पण जे चालले आहे, त्यात बदल होईल? तिमिराकडून तेजाकडे जाण्याचा हा केवळ प्रतीकात्मक प्रवास रहायला नको. 'जे जे उदात्त मंगल' ते ते आयुष्यात यायला हवे. अन्यथा, एक दिवस उलटला या पलीकडे 'उद्या'ला काही अर्थ उरणार नाही. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, रोगराई, गरीबी हे आणि या सारखे अनेक रोग निघून जायला हवेत. निसर्गाचा चमत्कार इतकाच या सूर्यास्ताचा अर्थ असायला नको. उद्याच्या सूर्यादयाबरोबर एक नवी आशा सकारात्मक अनुभवाबरोबर जागायला हवी. तरच आजच्या सूर्यास्ताला काही अर्थ आहे. प्रत्येक दिवस नवा असेल तर आकड्यात बांधलेले हे प्रत्येक नवे वर्षही अनुभवाने नवेच असायला हवे. आणि हा अनुभवही मंगलमय हवा. हे सगळे लगेच घडेल असे नाही. पण त्या मांगल्याची आसही मनामनांत जागायला हवी. तरच नैसर्गिक बदलाच्या साथीने अपेक्षित सामाजिक बदलही घडेल. नवा सूर्योदय ही आशा घेऊनच व्हावा अशी अपेक्षा आहे. 
 
सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना 
तिमिरांतुनी तेजाकडे, प्रभु, आमुच्या ने जीवना' 
 
पण या प्रार्थनेची रूपांतर आशेत करण्यातही तो कुचकामी ठरत असेल तर? तर मात्र, 
 
'सूर्य केव्हाच अंधारला यार हो
या, नवा सूर्य आणू चला यार हो' 
 
असे म्हणायला आणि त्याबरहुकूम कृती करायला आम्हीही मोकळे आहोत. आणि हो, 
 
जीवन जेथे वाहे 
ओघळुनी अग्निमधे
जाइल मम जीवन हे 
 
अगतिक त्या रक्षेतुन !
शोधुनिया संजिवन 
 
फुलतिल त्या भूमीवर 
हिरवे नव दुर्वांकुर !
 
ही आमची धारणा नि पंरपरा आहे. हे प्रकाशदात्या, तूही हे जाणतोस, नाही?