शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By अभिनय कुलकर्णी|

पंडितजी, भारतरत्न आणि राज ठाकरे

PTIPTI
जनभावना चाळवतील असे मुद्दे काढून ते योग्य वेळी मांडण्याचे राज ठाकरे यांचे कसब वादातीत आहे. लोकांना कोणते मुद्दे अपील होतील आणि ते नेमके कधी उचलावेत हे त्यांना जेवढे कळते तेवढे सध्याच्या एकाही राजकीय नेत्याला वळत नाही. म्हणूनच पंडित भीमसेन जोशींच्या भारतरत्न पुरस्कार प्रदानाचा नवा मुद्दा त्यांनी आपल्या मराठीच्या मुद्यात मिसळवून सध्या हवा निर्माण केली आहे. म्हटलं तर या मुद्यात काही नाही आणि म्हटलं तर बरंच काही आहेही.

पंडित भीमसेन जोशींना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार मिळाल्याने तमाम मराठी मने आनंदली. भलेही जोशी मुळचे कन्नडिगा असले आणि या दोन्ही राज्यांत सीमाप्रश्नावरून वाद असला तरीही जोशींविषयी दोन्ही प्रांतीयांच्या भावना निःसंशय लोभाचीच आहे. (तसे तर पंडितजी पूर्ण देशाचेच आहेत.) पंडितजींचे वयही बरेच झाल्याने त्यांनी हा पुरस्कार समारंभ अगदी साधेपणाने व्हावा अशी इच्छा प्रकट केली होती. त्यानुसार त्यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहसचिव व महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील या दोन सरकारी प्रतिनिधींच्या उपस्थितीत पंडितजींना हा पुरस्कार देण्यात आला. यात फारसे आक्षेपार्ह काही नाही. पण राज ठाकरेंनी हा मुद्दा राजकारणाच्या पटावर अतिशय बेरकीपणाने आणला आहे.

पंडितजींचे एकूण स्थान पाहता आणि या पुरस्काराची उंची पाहता तो राष्ट्रपतींसारख्या किंवा त्या पातळीवरच्या व्यक्तीनेच द्यायला हवा होता, हे वाटणे काही गैर नाही. राष्ट्रपतीही वारंवार मुंबईत आणि महाराष्ट्रात येत असतात, पण त्यांना हा पुरस्कार देण्यासाठी पुण्याला यायला जमले नाही, हे कारणही पटणारे नाही. प्रोटोकॉलच्या भानगडीत पंडितजींना त्याचा त्रासच झाला असता हे मान्य केले तरीही राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून राज्यपालांच्या हस्ते हा पुरस्कार देणे योग्य ठरले असते, हा राज यांचा मुद्याही नाकारण्यासारखा नाही. देशाचा सर्वोच्च पुरस्कार देत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तरी हजर रहायला पाहिजे होते, या मुद्यातही दम आहे.

पंडितजींना समारंभ नको होता. साधेपणाने हा पुरस्कार स्वीकारायचा होता, हे मान्य केले तरी किमान राज्यपालांच्या पातळीवरच्या व्यक्तीने हा पुरस्कार दिला असता तरीही हा साधेपणा जपता आला असता. देशाचा सर्वोच्च पुरस्कार एखाद्या गृहसचिवाच्या हस्ते दिला जातो, ही बाबही पटणारी नाही.

राज यांनी या मुद्याचा चेंडू अतिशय नेमकेपणाने लोकांच्यात फेकला आहे. पंडितजींच्या कक्षा सोयीस्कररित्या महाराष्ट्रापुरत्या मर्यादीत करत त्यांनी या पुरस्कार प्रदान करण्यातून महाराष्ट्राचा अपमान झाल्याची बोंब पुन्हा एकदा ठोकली आहे. अशा छोट्या छोट्या मुद्यातून दिल्लीश्वरांचा महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टीकोन ते लोकांसमोर पु्न्हा पुन्हा मांडत आहेत. लोकांचाही त्याला बर्‍यापैकी प्रतिसाद मिळतो आहे. पण ज्या मतांच्या हेतूने राज हे मुद्दे पुढे करत आहेत, त्यावर याचा किती परिणाम होईल, हे आगामी निवडणुकीतच कळू शकेल.

आपले मत खाली दिलेल्या चौकटीत आवर्जून व्यक्त करा.