शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जानेवारी 2015 (17:50 IST)

मला अजूनही आठवतं..

कितीतरी गोष्टी आपल अंर्तमनाला घट्ट चिकटलेल्या असतात. या लपेटलेल्या आठवणी मनाला घडवत असतात. मनाचे कोपरे गच्च भरलेले असतात. कधी ओसंडून वाहायला लागतात आणि खरंच वाटतं मला अजूनही आठवतात त्या कितीतरी रम्य घटना. छोटय़ा छोटय़ाच गोष्टी पण मनाची संवेदना जागृत करणार्‍या. 
 
मला अजूनही आठवतात आमचच्या शाळेतील बाई. किती प्रेमळ व कडकही. त्यांचा कधी धाक तर कधी प्रेमळ सहवास आठवला तरी खूप छान वाटतं. बाहेर शिक्षक दिसले की आडोशाला लपणं आणि तेवढय़ात कुणीतरी मुद्दाम आपल्याला नावाने जोरात हाक मारणं. त्याक्षणी केवढा राग आलेला होता पण आता हसू येतं. 
 
अजूनही आठवतं, बागेत घेतलेला म्हणजेच मैत्रिणींनी दिलेला तो उंचच उंच झोका. ती पोटात भरलेली भीतीची हवा आणि हृदयाची वाढलेली धडधड. त्यातच जिवाच्या आकांताने मारलेली ‘थांबा’ अशी हाक. आजही तो झोका मनात देखील अनुभवता येईल. 
 
अजूनही लख्ख आठवतं ‘श्याम ची आई’ या पुस्तकाची केलेली पाराणं. एकटं बसून वाचताना ते मूक पण हमसून हमसून रडणं आणि आईबद्दल एकदम मनाचं आभाळ दाटून येणं. ते पुस्तक संपलं आणि केवढं पोरकेपण जाणवलं आणि कितीतरी वेळ उगाचच आईभोवती घुटमळत राहिले. जणू मीच श्यामच्या भूमिकेत शिरले असं वाटायचं. 
 
अजूनही लख्ख आठवतं, जोरदार पडलेला पाऊस. शाळेतून घरी परततांना आम्हाला त्याने गाठलेलं. दप्तर वाचविणचा केविलवाणा आटापिटा. 
 
पाण्यातून वाहून गेलेल्या चप्पल. चिंब भिजलेल्या अंगाने दारात पाय टाकला अन् वाट पाहाणारी आई समोरच उभी असलेली पाहून त्यावेळी किती गोड वाटलं. मला ओल्या पुस्तकांची काळजी तर आईला ओल्या केसांची काळजी अन् नंतर आईच्या पदराआड लपून पडणारा पाऊस नहाळताना अनुभवलेलं भरगच्च बालपण. 
 
अजूनही आठवलं, वर्गातील कडक शिस्तीचे असलेल्या सरांचा तास आणि नेमकं मैत्रिणीला लागलेली उचकी. तिची उचकी आणि दाबलेलं हसू दोन्हीचा स्फोट अन् सरांनी दिलेली छोटीशी प्रेमळ शिक्षा. 
 
अजूनही आठवतं, पहिलं शाळेत दिलेलं भाषण, अडखळत अडखळत. तरीही मिळालेली शाबासकी. मनापासून म्हटलेली प्रार्थना, मैत्रिणींचा खेळताना आलेला राग. कडक इस्त्री केलेल्या शाळेचा गणवेश आणि त्यावर घडी पडू ने म्हणून केलेला प्रयत्न. 
 
अजूनही खूप खूप गोष्टी आठवतात. मन हळुवार होतं. आज तेच व असलेली मुलं-मुली आजूबाजूला हुंदडताना दिसतात. माझं माझ्या मित्र-मैत्रिणीचं रूप त्यांच्यात मी शोधायचा प्रयत्न करते पण नाही. खूप उदास वाटतं. आज काही मुलांच्या बाबतीत चिंता वाटते जी फेसबुक शेअर करणारी पण पूर्णत: एकटी पडलेली मुलंच दिसतात. एकमेकांना मारणारी मुले, कुणाचा आदर नाही भावनांची कदर नाही इतकं गर्दीचं भकास वाळवंट माझभोवती नाचतं. यामध्ये ते सुंदर झरे, मला आठवणारे, फुटणार कसे? उद्या यांना आठवेल तरी का पण ती आठवण येण्यासाठीची संवेदनशीलताच नष्ट होते की काय? अकाली प्रौढत्व अन् वयापेक्षा मोठी होणारी ही मुले पाहिली की मला अजूनही आठवतं, ते सुंदर जपलेलं संस्कारित लहानसं मन. 
 
संपूर्ण अंगावरून हळुवार फिरणार्‍या त्या सर्व रम्य आठवणी. 
 
स्वाती कराळे