शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

महानेता

- महेश जोशी

NDND
ठाकरे घराणे आणि आक्रमकता यांचा जुना संबंध आहे. परखडपणा, स्पष्टवक्तेपणा आणि दोन घेऊन तर दोन देईन सुद्धा हा आक्रमकपणा हे या घराण्याचे वैशिष्ट्य. केशवराव उर्फ प्रबोधनकार ठाकरे हे या परंपरेतील एक. सहाजिकच २३ जानेवारी १९२४ रोजी जन्माला आलेल्या बाळ केशव ठाकरे या त्यांच्या चिरंजीवात हा आक्रमकपणा उतरला नसता तरच नवल. बाळ केशव अर्थात आजचे बाळासाहेब ठाकरे.

आक्रमकपणा, परखडपणा याबरोबरच ठाकरे कुटुंबाला कलेचेही देणे मिळाले होते. म्हणूनच मोठे बंधू बाळासाहेब व्यंगचित्रकलेच्या प्रांतात मुशाफिरी करत असताना धाकटे श्रीकांत संगीताच्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवत होते. तोच वारसा आता छायाचित्रकलेच्या बाबतीत उद्धवकडे आणि व्यंगचित्राच्या बाबतीत राजकडे आला आहे.

बाळासाहेंबांनी आपल्या करीयरची सुरवात व्यंगचित्रकार म्हणूनच केली होती. १९५० च्या दशकात त्यांनी मुंबईत फ्री प्रेस जनरल या वृत्तपत्रात कार्टुनिस्ट म्हणून काम सुरू केले. समाजातील ज्वलंत प्रश्नांवर टीका करणारी त्यांची व्यंगचित्रे न्ययॉर्क टाईम्स या वृत्तपत्राच्या रविवारच्या आवृत्तीतही प्रकाशित झाले. या सोबतच जपानच्या असाई शिंबून या वृत्तपत्राचे कोपरेही बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांनी सजले. लंडनच्या 'मेसर्स कॅसल्स ऍन्ड कंपनी' या जगप्रसिध्द प्रकाशकातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकात बाळासाहेबांच्या व्यंगचित्राचा समावेश करण्यात आला. हा बहुमान मिळवणारे ते एकमेव भारतीय कलाकार ठरले.

बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांवर वॉल्ट डिसने आणि डेविड लो यांचा प्रभाव कायम राहिला. एकदा टाईम्सच्या आर. के. लक्ष्मण यांनी असे म्हटले होते, की बाळासाहेब व्यंगचित्रकार म्हणून कायम राहिले असते तर कदाचित ते माझ्याही पेक्षा मोठे ठरले असते, यातच बाळासाहेबांची महत्ता आली. पण आक्रमकपणा आणि कुणाचे ऐकून घेणार नाही, हा स्थायीभाव असलेल्या बाळासाहेबांचे आणि फ्री प्रेस व्यवस्थापनाचे वाजले. इंदिरांजींच्या एका व्यंगचित्रावरून बाळासाहेबांनी ठाम भूमिका घेतली आणि फ्री प्रेस सोडले. त्याचवेळी साठच्या दशकात मुंबईतील मराठी माणूस संकटात सापडला होता.

गिरण्या बंद पडू लागल्या, कामगारांच्या अडचणी वाढू लागल्या, भांडवलशाहीने रौद्र रूप घेतले. या परिस्थितीत सर्व सामान्य गिरणी कामगार भरडला जाऊ लागला. या संकटाचा सामना करण्यासाठी १९ जून १९६६ रोजी बाळासाहेबांनी समविचारी सहकार्यांना सोबत घेऊन शिवसेनेची स्थापना केली. गिरणी कामगार आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी गेल्या पाच दशकांपासून शिवसेनेचा लढा सुरू आहे. नंतर त्यात हिंदुत्वाचा मुद्दा समाविष्ट झाला. शिवसेनेच्या धगधगत्या विचारांना वाचा फोडण्यासाठी बाळासाहेबांनी २३ जानेवारी १९८९ रोजी 'सामना' या दैनिकाची सुरूवात केली. बाळासाहेबांचे एखाद्या विषयांवरील मत जाणून घेण्यासाठी सामना विश्वासू माध्यम बनले.

गेल्या चार दशकांपासून शिवसेनाप्रमुख मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनले आहे. शिवसैनिकांसाठी बाळासाहेब दैवत आहे. बाळासाहेबांचा शब्द म्हणजे प्रमाण समजला जातो. त्यांचे विचार म्हणजे मुलूख मैदानी तोफच. सडेतोडपणा आणि स्पष्ट वक्तेपणा म्हणजे काय ही बाळासाहेबांच्या शब्दांतून जाणवते. एखाद्या विषयांवर व्यक्त केलेले मत म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असते. कितीही संकटे आली तरी शिवसेनाप्रमुख आपले मत बदलत नाही. यामुळेच ते अनेकदा अडचणीत सापडले. मात्र दरवेळी ते आपल्या मतांवर ठाम राहिले.

७० च्या दशकांत त्यांनी महाराष्ट्रातील परप्रांतीयांविरूद्ध मोहिम उघडली. या मोहिमेचा सर्वाधिक प्रभाव मुंबईत राहिला. गुजरात गुजराती माणसाचा, तमिळनाडू तमिळी माणसांचा तर महाराष्ट्र मराठी माणसांचाच असे मत त्यांनी व्यक्त केले. यामुळे महाराष्ट्रातील दक्षिण भारतीय शिवसेनेच्या टप्प्यात आले. पुढे दाक्षिणात्य जाऊन उत्तर भारतीय शिवसेनेच्या निशाण्यावर आले. या वरून बाळासाहेब कायम वादाच्या भोवर्‍यात सापडले. २००२ साली शिवसेनाप्रमुखांनी इस्लामी दहशतवादाचा सामना करण्यासाठी आत्मघातकी पथके तयार करण्याचे आवाहन केले मात्र यावरून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आठवणीतील बाळासाहेब


PRPR
ऍडॉल्फ हिटलर याच्यावर कौतूक सुमने उधळल्याने शिवसेनाप्रमुख पुन्हा अडचणीत आले. २९ जानेवारी २००७ रोजी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हिटलरचे कौतुक केले. हिटलरचे कार्य वाईट होते मात्र तो कलेचा पुजारी होता. देशाचे नेतृत्त्व करण्याची क्षमता त्याच्यात होती. माझ्यातही हिटलरप्रमाणेच काही चांगले आणि वाईट गुण आहे असे शिवसेनाप्रमुखांनी या मुलाखतीत म्हटले होते.

बाळासाहेब आणि वाद हे सतत सोबतच चालत आले आहे. बाबरी मशीद पाडणारे शिवसैनिक असतील तर त्यांचा प्रचंड अभिमान आहे. असे सांगणारा दुसरा कोणताच हिंदुत्त्ववादी नेता नसावा. भारतीय संस्कृतीवर पाश्चात्य संस्कृती होत असणारे आक्रमणही त्यांना सहन होत नाही म्हणूनच व्हॅलेंटाईन डे ला त्यांचा प्रखर विरोध असतो. अशा एक ना अनेक मुद्यांवरून ते नेहमीच चर्चेत राहतात. या विचारांमुळेच शिवसेना वाढत गेली. शिवसेनाप्रमुखांसाठी जीव वाढून टाकणार्‍यांची संख्याही वाढत गेली.

शिवसेनेच्या वतीने दरवर्षी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेतला जातो. शिवसेना प्रमुखांचे तेजस्वी विचार ऐकण्यासाठी येथे लाखोच्या संख्येने गर्दी होते. एक नेता, एक व्यासपीठ आणि एक पक्ष अशा स्वरूपाचा हा मेळावा चार दशकांपासून सुरू आहे. याबद्दल शिवसेनाप्रमुखांचे नाव गिनिज बुकातही नोंदवले गेले. कितीही अडचणी आल्या तरी या मेळाव्यात खंड पडला नाही. फक्त एकदाच पावसामुळे मुंबई जलमय झाली त्यावेळी हा मेळावा होऊ शकला नाही.

अलीकडे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यावरील टीकेमुळे बाळासाहेब चर्चेत आले. संसदेवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी अफजल गुरू याला न्यायालयाने फाशी सुनावली आहे मात्र त्याने दयेचा अर्ज डॉ. कलाम यांच्याकडे सादर केला होता त्यावर कोणताच निर्णय न झाल्याने बाळासाहेब भडकले. शिवसेनेने आणि बाळासाहेबांनी अनेक धक्के पचवले. अगदी अलीकडच्या बाबतीत बोलायचे झाले तर माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि शिवसेनेला उत्तर भारतीयांचा पाठिंबा मिळवून देणारे संजय निरूपम पक्षातून बाहेर पडले. दोघांनी काँग्रेसचा हात धरला. या धक्क्यातून सावरत नाहीत तोच १८ डिसेंबर ०५ रोजी राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. याप्रसंगी बाळासाहेब काहीसे भावूक झाले. या चिमण्यांनो परत फिरा अशी आर्त हाक देऊन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बाळासाहेबांचे सुपूत्र उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने शिवसेनेवर घराणेशाहीचा आरोप झाला. यावरही बाळासाहेब यांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागला. महाबळेश्वर येथे झालेल्या एका बैठकीत उद्धव ठाकरे यांना हे पद बहाल करण्यात आले. वास्तविक पाहता शिवसेनाप्रमुख या बैठकीलाही हजर नव्हते. मात्र नंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेतृत्त्वाची चमक दाखवली आणि बोलणार्‍यांची तोंडे गप्प केली. अशा अनेक प्रसंगातून पुढे जात शिवसेना बळकट झाली. बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासही बळकट होत गेला. ई टिव्हीने घेतलेल्या सर्वेक्षणात महानेता म्हणून बाळासाहेबांचीच निवड झाली. त्यांची लोकप्रियता आजमावण्यासाठी एवढा दाखला पुरेसा आहे.

Gajanan GhuryeGG
आता ठाकरे घराण्याची पुढची पिढी आता समोर येत आहे. बाळासाहेब या पिढीबद्दल प्रचंड आशावादी आहेत. गेल्या आठवडात उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचा हिंदी गीतांचा एक अल्बम बाजारात आला. त्याचे प्रकाशन करतांना पुढे जा, मोठा हो, तुझ्याकडे उभे आयुष्य बाकी आहे. अशा शब्दांत बाळासाहेबांनी आशीर्वाद दिले. सदैव दुसर्‍यांना मोठा करणारा हा दृष्टा नेता आहे. ८२ व्या वाढदिवसांनिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा..!