बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 21 मे 2014 (14:47 IST)

मालकीण व मोलकरीण यांचे नाते

काही झालं तरी मालकीण व मोलकरीण यांची गाठ पडतेच. हे नातं जरा वेगळंच आहे. मोलकरीण संघटनेमुळे मोलकरणींचे पगार वाढलेत. त्यांना त्यांच्या हक्कांबद्दल जाणीव झाली आहे. हे चांगलंच आहे. पण हे सगळं कुठेतरी प्रोफेशनल वाटतं.

या दोघींचं काही वेगळं नातं असू शकतं का? काही झालं तरी कधी मोलकरणीला मदतीची गरज लागू शकते. कधी मालकीणीलाही तिच्या मदतीची गरज लागू शकते. आजच्या काळात तरुण लोक परदेशात किंवा महानगरांमध्ये वास्तव्य करून असतात. वयस्कर लोक, दोघे किंवा एकटा, एकटीही राहात असतात. तेव्हा वेळ सांगून येत नाही. यावेळेस नोकर, मोलकरीण उपयोगी पडू शकते. सगळेच काही परिस्थितीचा फायदा घेत नाहीत.

आजकाल लोकांची समजूत अशी झाली आहे पैसे टाकले की सगळं आपल्याल मिळेल. आपसूकच मिळतं. प्रत्यक्षात पैसा काही सगळंच करत नाही. माणसाचं आपापसातलं नातं हा काही भाग आहे की नाही? हे आपण विचारात घेतच नाही. पैसा मिळाला किंवा दिला की झाले. मग आपला व त्यांचा काय संबंध ठरतो? ही वृत्ती फार दिसते. भावनेचा ओलावा दोन्ही बाजूंनी असला पाहिजे. नुसती भांडी बुडवून किंवा कपडे बदडून वाळत घालून हे होत नाही, हे खरंच आहे. जरा नीट काम  पाहिजेच. माणूस यंत्र म्हणून जगायला शिकतो असं वाटतं. असं मागे होत नव्हतं. मोलकरीण, मालकीण जरा सुखदु:खाच्या गोष्टी बोलायच्या, असं आता कमी होत चाललंय. हे थांबायला पाहिजे. सुखदु:खे वाटली पाहिजेत.

संजीवनी देशपांडे