गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. मंथन
Written By वेबदुनिया|

संकल्प आणि सिद्धी!

येणारे प्रत्येक नवे वर्ष हे 'थर्टी फर्स्ट' नंतर येत असल्याचा अस्मादिकांचा दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे आंग्ल वर्षाची एक तारीख कधी येते असे कुणी विचारल्यास आम्हास आधी 'थर्टी फर्स्ट'ची आठवण होते. (कारण त्यापुढील दिवसाची आठवण आमच्या मेंदूत बहुतांश वेळा 'डोके जड झाल्याने' नसते.) त्यामुळे एक जानेवारी हा दिवस आमच्या आयुष्यात अनेकदा दुपारनंतरच उजाडलेला आम्ही पाहिला. यावरून आमचे असेही मत झाले, आहे की हा दिवस थेट दुपारीच उगवत असावा. या दिवशी सकाळ होतच नसावी, असा आमचा दाट संशय आहे. दुसरे म्हणजे या दिवशी दुपारनंतर डोके जड होत असल्याने पृथ्वीच्या वातावरणातच मूलतः काही बिघाड होत असावा, असा आमचा कयास आहे. याला थर्टी फर्स्ट साजरे करणारी तमाम मंडळी दुजोरा देतील याविषयी मला काहीही शंका वाटत नाहीये. 

सबब, येथे विषय थर्टी फर्स्टचा नसून आंग्ल तारीख एक जानेवारीचा आहे. या दिवसापासून म्हणे आंग्ल वर्षाची सुरवात होते. आणि एक तारीख ही संकल्पाची असते, असे आम्ही ऐकले आहे. संकल्प म्हणजे काही तरी मनाशी योजून ती नित्यनेमाने करण्याची गोष्ट. संकल्पाच्या माध्यमातूनच सिद्धीपर्यंत जाता, येते असे वाक्य आम्ही आमच्या एका गुरूजनांकडून कॉलेजवयात ऐकले होते. त्यावेळी आम्ही आमच्या मनास भावलेल्या सिद्धी नावाच्या मुलीस गटविण्यासाठी संकल्प नावाच्या मुलाचाच आधार घेतला होता. पण दुर्देव, ते कार्य अखेरीस सिद्धीस गेले नाही आणि कुणासही न गटण्याचा तिचा संकल्प आमच्या मुखावर मात्र सिद्धीस गेला. असो.

तर येथे विषय संकल्पाचा आहे. संकल्प हे करायचे असतात. पाळायचे नसतात. असे वाक्यही आम्ही ऐकले आहे. (कारण ते आम्हीच तयार केले आहे.) वस्तुतः संकल्पाच्या राशी तयार होतील एवढे संकल्प अस्मादिकांच्या थोडक्या आयुष्यांत झाले आहेत. अखेरीस आम्ही संकल्प न करण्याचा संकल्प एके वर्षी केला. पण तोही संकल्प काही पाळला गेला नाही. आणि आम्ही संकल्प करण्याचे काही सोडले नाही.

यंदाच्या वर्षी तर आम्ही आमच्यापुरते काही संकल्प करण्याचे योजिले आहे. (कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे.) कृपया निम्नलिखित संकल्पांचे कॉपीराईट आमच्याकडे असून या संकल्पाची नक्कल करण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
हे संकल्प असे -

01) मोबाईल फोनमध्ये मित्राचा नंबर सेव्ह असतानाही, त्याचा फोन आला की कोण? असे म्हणणार नाही.
02  नको असलेल्या व्यक्तीचा फोन आल्यानंतर मी तर ऑफिसमध्ये नाही घरी आहे, असे म्हणणार नाही.
03. बॉसचा फोन आल्यानंतर अंथरूणात असतानाही ऑफिसच्याच वाटेवर आहे, असे म्हणणार नाही.
04. इतरांकडून आलेले नववर्षासह इतर सणांचे एसएमएस जणू आपलीच मालमत्ता म्हणून पुढे सरकवणार (फॉरवर्ड) नाही.
05. महागायक, आयडॉल, व्हॉईस ऑफ इंडिया, संगीताचे विश्वयुद्ध वगैरेत माझ्या प्रांताला उद्देशून मराठीत वगैरे मतांचे आवाहन करणार्‍याला अजिबात एसएमएस पाठविणार नाही. ( महागायक बनणार हे आणि पैसे जाणार आमचे)
06. मोबाईल फोनवरील संभाषण झाल्यानंतर 'ठेवू का?' असे म्हणणार नाही. (खाली ठेवायला त्याला रिसीव्हर थोडीच आहे?)
07. फॉरवर्डेड इ मेलवरील इतरांचे नाव पुसून खाली आपले नाव टाकण्याचा करंटेपणा करणार नाही.
08. एखाद्याच्या ब्लॉगवर वाचलेली चांगली कविता आपली म्हणून खपविणार नाही.
09. पुणेरी पाट्या म्हणून तयार केलेले आणि इतरत्र फिरून त्याचा चोथा झालेले इ-मेल फॉरवर्ड करणार नाही.
10 . अमुक एखाद्या कंपनीतर्फे अमुक एखादी वस्तू गिफ्ट मिळणार आहे, म्हणून हा मेल पुढे दहा जणांना फॉरवर्ड करण्याचा मुर्खपणा करणार नाही.
11. मध्यरात्रीनंतर डोळ्यावर कितीही झोप आली तरी सन, सूर्या या टिव्ही पाहण्याचा व त्यावरील सुंदर गाणी व नृत्ये पाहण्याचा निग्रह नक्की टाळेन. (या संकल्पाला कठोर निश्चयाची गरज आहे.)
12. 'अब आपको कैसे लगता है' असा फालतू प्रश्न विचारणारे एकही न्यूज चॅनेल पाहणार नाही.
13. बॉलीवूडमधल्या कोणत्याही स्टारचे हॉलीवूडमध्ये तयार झालेले टिनपाट चित्रपट पहाणार नाही.

तर यंदाचे वर्षीचे हे अस्मादिकांचे संकल्प आहेत. वास्तविक यापूर्वी दैनंदिनी लिहिणे (२ दिवस), सक्काळी सक्काळी फिरायला जाणे (३ सकाळी), रोज वाचनाला दोन तास देणे ( जेमतेम दोन रात्री), सकाळी लवकर उठणे (१ सकाळ), फिरायला जाताना रोज एक स्तोत्र पाठ करणे ( २ दिवस) तर असे अनेक संकल्प आम्ही केले. कंसातील आकडे संकल्प किती काळ टिकला याचे आहेत. पण म्हणून आम्ही हाय खाल्लेली नाही. रणांगणावर पडलेल्या दत्ताजी शिंदेंसारखे आम्ही 'बचेंगे तो और भी लडेंगे' तसे संकल्प करण्याचा निश्चय टिकवून आहोत. म्हणूनच यंदाही आम्ही संकल्प करण्यास धजावलो आहोत. आमच्या या मनौधैर्याचा कणा खरे तर कुसुमाग्रजांची कविता आहे. म्हणूनच त्यांची क्षमा मागून म्हणावेसे वाटते.

मोडकळीस गेले संकल्प तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून, संकल्प सिद्धीस जावो म्हणा

संकल्पाच्या सिद्धीसाठी काय करावे येथे वाचा.