शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By वेबदुनिया|

कमी उंचीच्या स्त्रियांसाठी...

कमी उंचीच्या स्त्रियांनी प्लेन वस्त्रे धारण करावीत. सलवार कमीज, जींस-टॉप किंवा साडी चालू शकेल. प्रिंटेड कपडे घालायचे तर बारीक प्रिंटचे कपडे घालावे. शिफॉन किंवा जॉर्जेटचे कपडे घालणे चांगले. त्यामुळे शरीर सुदृढ दिसते उंच वाढलेली वाटते. 

फुगवटा निर्माण होणारे कपडे टाळावेत. त्यामुळे उंची कमी दिसते व जाडी वाढल्यासारखी वाटते. कपड्यांची निवड करताना नेहमी मुलायम व शरीराला गुंडाळलेले वस्त्र घालावे. पूर्ण परिधान एकाच रंगाचा असायला पाहिजे. मग ते साडी-ब्लाऊज असो किंवा सलवार कमीज किंवा स्कर्ट टॉप. लक्षात ठेवा दोन्ही एकाच रंगाचे व शेडचे असायला पाहिजे. चप्पल व पर्सचा रंगसुद्धा मॅच करणारा असला तर फारच उत्तम.

तुम्ही साडी नेसत नसाल तर फिटिंगचे सूट व इतर ड्रेसची निवड करायला पाहिजे. सूट व ब्लाऊजचा गळा अंडाकार किंवा व्ही शेपचा असायला पाहिजे.

मोठ्या बॉर्डरची साडी, कमीज किंवा कुर्ता घालणे टाळायला पाहिजे कारण त्याने उंची कमी दिसते. साडी नेसताना एक लक्षात ठेवायला पाहिजे की ती कधीही कमरेच्या खाली नेसू नये. कारण त्याने वरचा भाग लांब व खालचा भाग लहान दिसून शरीर बेढब दिसतं. म्हणून साडी नेहमी कमरेवर नेसायला पाहिजे.

बाहेर जाताना नेहमी उंच टाचांचे जोडे, चपला घातले पाहिजे. आजकाल बाजारात उंच टाचांचे आरामदायक जोडे, चपला उपलब्ध आहेत. हेअर स्टाइलमुळे सुद्धा उंची वाढल्यासारखी दिसते. लहान उंचीच्या मुलींनी बॅक कॉंबिंग करून केसांना थोडे वर बांधून केशसज्जा केली पाहिजे. अंबाडा मानेवर न बांधता वर बांधायला पाहिजे त्याने उंची वाढल्यासारखी दिसते.