शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. फॅशन
Written By वेबदुनिया|

बंद करा ही देण्या-घेण्याची प्रथा

ND
अनेकदा लग्न समारंभ वा कौटुंबिक कार्यक्रमात भेट म्हणून कपडे वा कापड दिले जाते. वर्षानुवर्षे ही प्रथा पाळली जाते आहे. या कपड्यांचे पुढे काय होते? जेमतेम पाच टक्के लोक हे कपडे घालत असावेत. बाकीचे कपडे हे इतरांना 'फिरवण्यात' जातात, हे अमान्य करण्यात काहीच हशील नाही. फिरवाफिरवीसाठीच द्यायचे असतील तर मग भेट म्हणून कपडे देण्याचा अट्टाहास का केला जातो?

कपडे किंवा कापड ही वैयक्तिक बाब आहे. याचा संबंध प्रत्येकाच्या आवडीनिवडीशी असतो. त्यामुळेच लग्नात दिलेल्या साड्यांवरून मानापनाचे प्रसंग रंगतात. साडीचा रंग आवडला नाही, पोत आवडला नाही किंवा त्याची क्वालिटी चांगली नव्हती यावरून रूसवे फुगवे होतात. शंभर साड्या विकत घेऊनही त्यातल्या एकीच्या बाबतीत जरी असे घडले तरी संपूर्ण कार्यक्रमात तेच ठळक उठून दिसते. यजमानांच्या डोक्याला ताप होतो तो वेगळाच. शिवाय कुणाला साडी दिली गेली आणि कुणाला नाही दिली गेली यावरूनही बरेच रामायण घडते. यजमान लोकांसाठी एवढे सगळे कष्ट घेत असूनही शेवटी त्यांना कुणाच्या तरी संतापाचे, रागाचे धनी व्हावे लागते.

ND
बरं ज्या महिलेने आपल्या साडीबाबत तक्रार केलेली असते, ती स्वतः ती साडी घालेल याची कुठलीही खात्री नसते. फक्त चारचौघीत तिला साडी दिली गेल्याने तिच्यासाठी तो प्रतिष्ठेचा प्रश्न बनतो. पण त्याचा नाहक त्रास अनेकांच्या डोक्याला होतो. यजमानांच्या तर होतोच, पण लग्न महिलेच्या सासरकडचे असेल तर तिच्या पतीला हे सगळे ऐकून घ्यावे लागते. विशेष म्हणजे पुरूषांच्या बाबतीत या बाबतीत राग-लोभाचे प्रसंग फारसे घडताना दिसत नाहीत. (अर्थात, त्यांच्या रागलोभाची कारणे वेगळी असतात.) पण बायका मात्र हा विषय फार लावून उगाचच कलह निर्माण करतात.

या कपड्यांचे पुढे काही होत नाही. याचे त्याला, त्याचे याला असे करून फिरवाफिरवी तेवढी केली जाते. अनेकदा तर ज्या मुळ व्यक्तीने कापड दिले आहे, तिलाच ते परत दिले जाण्याचे प्रकारही घडले आहेत. एका कार्यक्रमात तर घरी आलेल्या एका परिचित महिलेला देण्यासाठी साडीच आणली गेली नव्हती. पण त्या महिलेने मात्र यजमानीण बाईंसाठी आठवणीने साडी आणली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर यजमानीण बाईंनी परिचित महिलेला साडी दिली, पण ती त्या बाईंनीच दिलेली. म्हणजे स्वतःच दिलेली साडी भेटीदाखल स्वतःलाच मिळण्याचा 'अभिनव' प्रकार तिला 'याची देही याची डोळा' पहायला मिळाला.

हा सगळा मनस्पाताचा प्रकार टाळण्यासाठी आता कपडे, साडी देणे घेणे या प्रकाराचाच पुनर्विचार करायला हवा. कपडेलत्ते प्रकारात आपण प्रत्येकाचा समाधान करू शकत नाही. त्यामुळे हा प्रकारच बंद करून टाकायला हवा. लग्नासारख्या कार्यक्रमात उपस्थिती महत्त्वाची असते. तिथे उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद देणे महत्त्वाचे की आपल्यालाच एखादी भेट मिळाल्याबद्दल किंवा न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त करणे महत्त्वाचे. आपल्या वैवाहिक आयुष्याचा प्रारंभबिंदू कुण्या नातेवाईकाला समाधान न देणार्‍या कपड्याने झाल्याचा विषाद त्या जोडप्याला वाटणार नाही काय?