शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By
Last Modified: शनिवार, 14 नोव्हेंबर 2015 (09:12 IST)

मुंबई पुणे मुंबई -2 : चित्रपट परीक्षण

पाच वर्षापूर्वी आलेला ‘मुंबई-पुणे-मुंबई’ त्यातल्या स्वप्निल-मुक्ता ह्या फ्रेश रोमँटिक जोडीच्या पुणे विरूध्द मुंबईच्या विनोदांनी तरुणाईला वेड लावले. त्या चित्रपटाच्या यशानंतर आता पाच वर्षानी सिक्वेल आला आहे. पूर्वी फक्त दोनच पात्रं असलेला हा चित्रपट आता जवळ जवळ 12-15 व्यक्तिरेखांसह आला आहे. चित्रपटाच्या प्रोमोत दिसणारे ‘मुंबई विरूध्द पुणे’ वरचे जोक सध्या बरेच मनोरंजन करत आहेत. पण हा चित्रपट म्हणजे मुंबई विरूध्द पुणे हा सामना नाही. ते फक्त मिठासारखे ह्या चित्रपटात वापरण्यात आल्यामुळे प्रोमोवरून चित्रपट कसा आहे, ते ठरवले, तर तुमचा भ्रमनिरास होईल. ह्या भावूक चित्रपटाला मुंबई-पुणे ह्या शहरांवर होत असलेल्या विनोदाची फक्त किनार आहे. मात्र पूर्ण चित्रपट हा गौरीचा इमोशनल प्रवास आहे. लग्न ठरल्यावर ते लग्न होईपर्यंत त्या जोडप्याच्या भावनाविश्वात किती बदल घडतात. रोमान्सच्या शिवाय आयुष्यात भरले जाणारे इतर अनेक रंग त्यांना आपलं आयुष्य आता पूर्णपणे बदलून जाणार ह्याची जाणीव देत असतात. आणि मग फक्त दोन शहरांमधलंच नाही तर नात्यांमधलंही अंतर कधी कमी कधी जास्त वाटू लागतं. खरं तर, लग्नाळू जोडप्यामधले भावबंध सूरज बड.जात्याच्या विवाहमध्ये दाखवले आहेत. पण तरीही ह्या दोन्ही चित्रपटांच्या सादरीकरणात भरपूर अंतर आहे. लग्न करत असताना वाटणारं कन्फ्युजन, आपण निवडत असलेला जोडीदार आपल्यासोबत आयुष्य काढेल ना, आपली निवड नक्की योग्य आहे ना, अशा अनेक गोष्टी त्यावेळी मनात चालत असतात. अनेकांची त्या विचाराने झोप उडते, हाता-पायाला घाम फुटतो, आणि नेमकी हीच स्थिती सतीश राजवाडेनी आपल्या चित्रपटात चांगली फुलवून दाखवली आहे. चित्रपट जास्त गौरीच्या अँन्गलने आहे, ते चांगलेच आहे. कारण तो जर गौतमच्या अँन्गलने असता, तर कदाचित गौतम निगेटीव्ह वाटू लागला असता. आणि गौरीच्या मनातली नेमकी उलाढाल लेखिकेने योग्य समतोल राखत दाखवलीय. कदाचित एक स्त्री लेखिकाच स्त्रीच्या मनातली उलाढाल परिणामकारकतेने लिहू शकते. त्यामुळेच चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचताना प्रॅक्टिकल वाटतो.

विजय केंकरे, मंगल केंकरे, सविता प्रभुणे, प्रशांत दामले, श्रुती मराठे, आसावरी जोशी, अंगद म्हसकर, सुहास जोशी ह्यांच्यामुळे चित्रपट मनोरंजक होतो. चित्रपटातल्या घडामोडी ह्या वेगवान असल्याने जरी हा चित्रपट भावूक असला तरीही, कंटाळवाणा वाटत नाही.