शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By
Last Updated : शनिवार, 17 ऑक्टोबर 2015 (12:56 IST)

राजवाडे अँड सन्स : चित्रपट परीक्षण

लेखक- दिग्दर्शक सचिन कुंडलकर ह्यांचे चित्रपट म्हटले, की त्याचं खुसखुशीत संवादलेखन, आणि विषयाची कलात्मक मांडणी हे वैशिष्टय़ असतं. ‘गंध’, ‘हॅपी जर्नी’ आणि आता ‘राजवाडे अँड सन्स’ दर चित्रपटागणिक त्यांचं हे वैशिष्टय़ अधिकधिक खुलतं गेलेलंच दिसून येतं. ‘गंध’मधली प्रेमकथा असो, ‘हॅपी जर्नी’ मधले भावा-बहिणीचं नातं, की ‘राजवाडे अँड सन्स’ मधला कौटुंबिक जिव्हाळा त्यातली तीव्रता, संवेदनशीलता प्रत्येकवेळी त्या चित्रपटाला वैशिष्टय़पूर्ण बनवत आलीय.
 
‘राजवाडे अँड सन्स’ ही पुण्यात राहणार्‍या सराफाचा व्यापार करणार्‍या एका उच्चभ्रू कुटुंबातल्या तीन पिढय़ांची कथा आहे. आपल्या सराफाच्या व्यापाराने राजवाडेंचं वैभव उभं करणारे रमेश राजवाडे तत्त्वनिष्ठे, ताठर आणि सर्वावर आपलं वर्चस्व गाजवणारे आहेत. त्यांच्या तोंडातून निघालेला शब्द म्हणजे त्यांची आज्ञा असते. 
 
त्यांचा शब्द खाली पडू न देता, त्यांचा मान राखण्याचा प्रयत्न त्यांच्या विद्याधर,लक्ष्मी आणि शुभंकर ह्या तीनही मुलांनी केलाय. मुलांनी आपल्या घराण्याच्या व्यवसायामध्ये यावे, ही रमेश राजवाडेंची इच्छा त्यांनी पाळलीय. पण त्यांची मुलं अनय, श्वेता, अनया आणि विराजस मात्र आपली वेगळी ध्येयं आणि स्वप्नं पाहतायत. आयुष्यातल्या त्याच त्या सरधोपट मार्गाने जाणं, नव्या पिढीला मंजूर नाही. हा चित्रपटाचा गाभा आहे.
 
खरं तर, ही कथा वेगळी नाही. पण मांडणी तुम्हांला खिळवून ठेवते. आपल्याच घरात बोलले जाणारे वाटावे, एवढे साधे संवाद, त्यातून होणारी विनोदनिर्मिती, तर कधी अंतर्मुख करायला लावणारी ही फिल्म आहे. खरं तर 13 व्यक्तिरेखांची ही कथा आहे. अशावेळी एक ना धड भाराभार चिंध्या होण्याची, आणि अशा मल्टिस्टारर चित्रपटांमध्ये काही अभिनेत्यांना वाव न मिळण्याची भीती असते. 
 
मात्र प्रत्येक व्यक्तिरेखेला ह्या चित्रपटात खुलवण्यात आलंय. चित्रपट संपल्यावर कोणती एक व्यक्तिरेखा नाही तर एक अख्ख कुटूंब तुमच्या लक्षात राहतं. चित्रपट कौटूंबिक असला तरीही अनेक टिस्ट आहेत. पहिला टिस्ट अगदी सुरूवात झाल्यावर दहा मिनिटांनंतरच येतो. आणि मग चित्रपट पूर्णवेळ मनोरंजन करत अनेक धक्के देत जातो. हे आश्चर्याचे धक्के आपली चित्रपटातील रूची प्रत्येक मिनिटागणिक वाढवतात. ह्याचे पूर्ण श्रेय दिग्दर्शक सचिन कुंडलकरचे आहे.