बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By वेबदुनिया|

`कदाचित` नव्हे नक्कीच पहा !

-केदार पाटणकर

जे वाटतं, ते नसू शकतं. जे असतं, ते कधीच कळू शकत नाही. जे दिसतं, त्याचा अर्थ वाटतो त्यापेक्षा निराळा असू शकतो...हा अनुभव प्रत्येकाला केव्हातरी आयुष्यात येतोच येतो. अगदी किरकोळ वाटणा-या या गोष्टीची व्याप्ती एखाद्याच्या मनाच्या तळाशी गेली आणि त्यामुळे मेंदू काम करेनासा झाला तर भवताल कसं विस्कटून जातं याचं प्रत्ययकारी चित्रण म्हणजे 'कदाचित्'...

PRPR
डॉ. गायत्री प्रधान एक यशस्वी न्यूरोसर्जन. ती एक अवघड आपरेशन यशस्वी आपरेशन करते आणि तिचं नाव सर्वतोमुखी होतं. ही बातमी वर्तमानपत्रात वाचून एक जण तिचा माग काढत काढत तिच्या घरापाशी येतो. आपण तिचे वडील असल्याचे सांगत घरात प्रवेश करू पाहतो. घाबरलेली गायत्री नव-याच्या मदतीने त्याला पोलिसांच्या ताब्यात देते. तो आपला बापच आहे, हे गायत्रीला माहीत असतं. पोलिसांमुळे ते तिच्या नव-यालाही समजतं. गायत्रीला वडील घरात नको असतात...

PRPR
आईला त्यांनीच जिन्यावरून ढकलून मारलं आहे, अशी गायत्रीची लहानपणची समजूत. आईला जिन्यावरून कोसळताना तिनं पाहिलेलं असतं. वडिलांनी ढकललं अशी साक्ष तिनं दिल्यामुळे ते तुरूंगात जातात. तिला वडिलांचा सहवास नकोसा असतो. म्हणूनच, सुटून आल्यावर ती त्यांना घरात घ्यायला नकार देते.

गायत्री आणि नवरा त्यांची व्यवस्था दुसरीकडे करतात. वडील घरातून जातात खरे, पण जाण्यापूर्वी गायत्रीला सांगून जातात, की तुझ्या आईला मी ढकललं नाही, तीच जिन्यावरून घसरून पडली. तुला जे दिसलं ते चुकीचं होतं.

न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आपण वडिलांना भोगायला लावली, या भावनेनं गायत्री हादरते. हास्पिटल आणि घरातून तिचं लक्ष उडतं. विमनस्क अवस्थेतल्या गायत्रीवर अखेर उपचार सुरू होतात...

PRPR
नव-याला कळून चुकतं, की तिचे वडील हाच यावर जालीम उपाय आहे. तो त्यांना भेटून सांगतो, की केवळ तुमच्या त्या सांगण्यामुळे गायत्रीची अशी अवस्था झालेली आहे. तुम्ही तिला येऊन सांगा की मी जे बोललो खोटं होतं. तुला जे दिसलं ते बरोबर होतं. मीच तुझ्या आईला ढकललं...
PRPR
वडील तसं करतात आणि गायत्री 'बरी' होते. नवरा आभार मानण्यासाठी ज्यावेळी त्यांना भेटायला जातो, त्यावेळी ते सांगतात, गायत्रीची आई घसरूनही पडली नाही आणि तिला मीही ढकललं नाही...

ते नेमकं काय सांगतात हा अनुभव प्रत्यक्षच घेण्यासारखा, कारण हा पटकथेचा कळस आहे.

खरोखरीच निराळा असा हा चित्रपट आहे. माणसाचे मनोव्यापार कसे खोल, गुंतागुंतीचे असतात, ते जसे स्वतंत्र असतात तसे इतरांवर अवलंबूनही असतात. त्यांचं दर्शन एकाचवेळी स्तिमित आणि अस्वस्थ करणारं असू शकतं. हा चित्रपट असं दर्शन घडवतो. गिरीश जोशींच्या कथेच्या छोट्याशा जिवावर बांधेसूद पटकथा बेतलेली आहे आणि तिला नेमक्या दिग्दर्शनाने प्रेक्षणीय केलेले आहे.

PRPR
पुऱूष कलावंत बरेच असूनही अश्विनी भावेने हा चित्रपट स्वतःच्या खांद्यावर पेलला आहे. ही अभिनेत्री दहा वर्षांच्या खंडांनंतर काम करीत आहे, हे जराही जाणवत नाही. सचिन खेडेकर, तुषार दळवी, डा.शरद भुथाडिया, सुलेखा तळवलकर ही पात्र निवड दर्जेदार आहे. सदाशिव अमरापूरकरांसाठी गायत्रीच्या वडिलांची भूमिका कारकिर्दीत विशेषत्वाने नोंदवून ठेवावी, अशी आहे. निळू फुले अगदी छोट्या भूमिकेत नेहमीप्रमाणे हातखंडा अभिनय करून जातात. 'नकार वागण्याला असू शकतो, अस्तित्वाला नाही...' असे संवाद लक्ष देऊनच ऐकण्यासारखे आहेत. प्रशांत दळवीं अपेक्षा पूर्ण करतात. चित्रपटात गीत न ठेवण्याचा निर्णय हुषारी दाखवणारा. रसभंग अजिबात होत नाही.

एक जराशी त्रुटी आहे. मुलगी मोठी होताना बापाच्या तिच्याशी भेटी झाल्याचे कोठेही सूचित होत नाही. बाप एकदम तिला मोठेपणी केवळ फोटोवरून ओळखतो, हे खटकते.

बुध्दिमान प्रेक्षकाला विचार करायला लावेल असा चित्रपट देऊन चंद्रकांत कुलकर्णींनी आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा `कदाचित` नव्हे, तर नक्कीच खोवला आहे. 'जिगिषा'ची निर्मिती नेहमीप्रमाणे दर्जेदार आहे. निर्माती अश्विनी भावेंनी वेगळी कथा निवडल्याबद्दल त्यांचेही विशेष अभिनंदन करायला हवे.