शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By
Last Modified: शनिवार, 23 जून 2018 (12:03 IST)

चित्रपट परीक्षण : झिपर्‍या

'झिपर्‍या'बद्दल उत्सुकता होती, कारण तो अरुण साधू यांच्या 'झिपर्‍या' नावाच्या कादंबरीवर आधारित चित्रपट आहे. झिपर्‍या वाचता वाचता, वाचक झिपर्‍या आणि तो ज्या अधोविश्र्वात राहतो, त्याचा एक अपरिहार्य भागच बनून जातो, काहीसा तसाच, पण अपूर्ण अनुभव झिपर्‍या हा सिनेमा देतो. सिनेमाचं नाव 'झिपर्‍या' असलं, तरी सिनेमा होतो अस्लमचा. कारण झिपर्‍यापेक्षाही सिनेमात अस्लमचं पात्र अधिक जोरकसपणे उतरलं आहे आणि सिनेमाची सुरुवात व शेवट पाहताही अस्लमच झिपर्‍यापेक्षा भाव खाऊन जातो.
 
वास्तविक पिंगळ्याभायचा (नचिकेत पूर्णपात्रे) अपघाती मृत्यू झाल्यावर, त्याच्या या मृत्यूला कळत नकळत कारणीभूत ठरलेला झिपर्‍याच (चिन्मय कांबळी) त्याच्या बूटपॉलिश टोळीचा नायक होतो. झिपर्‍या किंवा त्याची टोळी वाईट नसते. उलट कष्टाचे पैसे मिळवण्याकडेच त्यांचा कायम कल असतो. परंतु ते ज्या अधोविश्र्वाचा भाग असतात, ते अधोविश्र्वच असं असतं की इच्छा असो वा नसो, त्याचा भाग असणारा प्रत्येकजण बकाली नि गुन्हेगारीच्या फेर्‍यात गुरफटला जातो. यात त्यांच्या आयुष्याचं लक्तर होण्याचीच शक्यता अधिक असते, जे अस्लमच्या (प्रथमेश परब) आयुष्याचं होतं. झिपर्‍याचं आयुष्य मात्र मार्गी लागतं, ते त्याच्या आयुष्यात आलेल्या कीर्तने मास्तरामुंळे (दीपक करंजीकर). कीर्तने मास्तरांच्या या चांगुलपणामुळे झिपर्‍याचे इतर दोस्त काही शिकतात की नाही माहीत नाही (कारण ते सिनेमात दाखवलेलं नाही), पण झिपर्‍या बहुधा शिकत असावा, असं सिनेमातलं शेवटचं दृश्य पाहून वाटतं. पण झिपर्‍याच्या आयुष्यातला परिवर्तनाचा हा महत्त्वाचा भाग सिनेमात येत नाही. सिनेमातल्या सगळ्याच कलाकारांनी चांगली कामं केलीत. झिपर्‍या आणि त्याचा कंपूही उत्तम. पण भाव खाऊन जातो प्रथमेश परबचा अस्लम आणि अमृता सुभाषची लीली. झिपर्‍याच्या बहिणीच्या भूकिेत अमृता सुभाष यांनी खूपच उत्तम कामगिरी केलीय.