बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By
Last Modified: शनिवार, 25 जुलै 2015 (15:06 IST)

कॅरी ऑन मराठा : चित्रपट परीक्षण

नंदा आर्टस् आणि वॉरीयर ब्रदर्स मोशन पिक्चर्स यांची निर्मिती असलेला ‘कॅरी ऑन मराठा’ हा सिनेमा ह्या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झालाय. ह्या चित्रपटातून अभिनेते रवींद्र महाजनींचा मुलगा गश्मीर महाजनीने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलंय. तर दिग्दर्शक संजय लोंढे यांचीसुध्दा ही पहिली मराठी फिल्म आहे.

महाराष्ट्र-कर्नाटकामध्ये सीमावादावरून नेहमीच वादळं उठत आली आहेत. अनेकदा दंगेही झालेले आपण गेल्या काही वर्षात पाहिलंय. आणि ह्याच मुद्द्याची पाश्र्वभूमी ‘कॅरी ऑन मराठा’ सिनेमाला लाभलेली आहे. कोल्हापुरातला मार्तड, कर्नाटकातल्या कुसुमला भेटतो. योगायोगाने झालेल ह्या भेटीचं रूपांतर, प्रेमात होते. आणि मग मराठी विरूध्द कन्नडी हा दोघांच्या घरातला द्वेष आपल्यासमोर येतो. ‘कॅरी ऑन मराठा’मुळे चित्रपटसृष्टीत एक देखणा, दमदार, मसल्स आणि सिक्स पॅक एब्स असलेला आणि तरूणींच्या हृदयाची धडकन बनण्याचे गुणधर्म असलेला, एक हँडसम हिरो मराठी चित्रपटसृष्टीला मिळालाय. गश्मीरची संवादफेक, त्याच्या फाइटस्, त्याचा डान्स या सगळ्यावर तरूण-तरूणी फिदा झाले, तर नवल वाटायला नको.

टिपीकल मसाला फिल्मचा विषय चित्रपटाला आहे. पण चित्रपट पाहताना आपण ‘लय भारी’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ यांचे मिश्रण असलेला सिनेमा पाहतोय का, असा भास होतो. लव्हस्टोरीमध्ये, प्रेमकथा व्यवस्थित फुलवली गेली नाही आहे. एक तरूण आणि तरूणी जेव्हा एकमेकांच्या सहवासात एक अख्खा दिवस आणि एक अख्खी रात्र घालवतात, तेव्हा तर प्रेमकथा फुलवण्याचे अनेक क्षण येतात. पण मार्तडचं मराठीपण आणि कुसुमचं कानडीपण त्यांच्या लव्हस्टोरीत एवढं वरचढ दाखवलंय. की त्यामुळे प्रेमातला हळुवारपणा, स्वप्नाळूपणा, हरवूनच गेलाय.

प्रेमकथेत नायकाचं रांगडेपण आणि नायिकेची निरागसता दाखवणं अपेक्षित असतं. नायकाचा रांगडेपणा दिसलाय, मात्र नायिकेची निरागसता फुलवता आलीच नाही आहे. चित्रपटाचा पूर्वार्ध खरं तर फक्त लव्हस्टोरीवर आहे. मात्र नायिका अर्धवेळ कन्नडमध्ये बोलण्यात आणि त्याचा अर्थ नायकाला समजावून सांगण्यातच पूर्वार्ध संपतो.

सिनेमाचं संगीत मात्र श्रवणीय आहे. शैल-प्रीतेश यांनी सिनेमाचं संगीत दिलंय. मार्तड मल्हार, सोबाने सोयनिरे, जगळगंत ही गाणी श्रवणीय आहेत. गुरु ठाकूर, अश्विनी शेंडे, मंगेश कांगणे, हृदया शिवा यांनी लिहिलेली गाणी आणि श्रेया घोषाल, आदर्श शिंदे, वैशाली भेसने-माडे, शैल हाडा, ऊर्मिला धनगर यांनी त्या गाण्यांना आपल्या स्वरांचा साज चढवल्याने बहार आलीय.