शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 ऑक्टोबर 2014 (12:22 IST)

पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा : चित्रपट परीक्षण

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या तापलेल्या वातावरणात राजकीय व्यवस्थेतील दांभिकता, चहाटळपणा, लाळघोटेपणा, स्वार्थीपणा, ढोंगीपणा, हुजरेगिरी आदी बाबींवर उपहासात्मक भाष्य करत विनोदाचे बार उडवत प्रकाश टाकणारा पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा हा चित्रपट आहे.

नारायण वाघ (मकरंद अनासपुरे) आता अपक्ष आमदार झाले आहेत. विश्वास टोपे (सयाजी शिंदे) यांना हा पराभव फारच जिव्हारी लागला आहे. त्यातून हायकमांडची (अलोकनाथ) नजर गावाती जमिनीवर आहे. सीएम मते (विलास उजवणे) यांच्या माध्यामातून नारायण व विश्वास यांचा वापर करत ही जमीन आपल्या भाच्याच्या खाती जमा करण्याचा हायकमांडचा डाव आहे. मात्र नारायणला आता मंत्रिपदाचे वेध लागले आहेत तर विश्वासरावांना आमदारकीचे. त्यातून हे दोघे एकेकांना शह-काटशह देताहेत. त्यात विश्वासराव आमदार होतात व मंत्रिपदाच्या शर्यतीत येतात. मग नारायण अपक्ष असल्याचा फायदा उठवत आदर्श सिटी घोटाळ्यात सीएम, तसेच टोपेसह अडकतो. मध्येच सेरेनाला (मेलेडिना अलेक्झांड्रा) संत बनवून गावात धुमाकूळ घालतो. नारायणचे मंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण होते का? टोपेचे शेवटी काय होते? हे सर्व पडद्यावर अनुभवणे उत्तम.

सयाजी शिंदेंनी टोपेंचा आततायीपणा, निष्ठुरता, तोंडावर पडल्यानंतरची अवस्था आपल्या अभिनयातून उत्तम उभे केले आहे. अलोकनाथ, आशिष विद्यार्थी, डॉ. विलास उजवणे, स्वप्निल राजशेखर, सिद्धेश्वर झाडबुके आदींनी उत्तम साथ दिली आहे. खरी जा आणतो तो मकरंद अनासपुरे. नारायणची व्यक्तिरेखा त्यांनी आपल्या नैसर्गिक अभिनयाने जिवंत केली आहे. नारायणचा बेरकीपणा, मिश्किलता, ढोंगीपणा व आमदारकीचा रूबाब त्यांनी झोकात सादर केला आहे. विशेषत: मकरंद व सयाजी यांचा दारू पिण्याचा प्रसंग अप्रतिम रंगला आहे. त्यातील मकरंदची देहबोली अत्यंत सूचक आहे.