शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By
Last Modified: सोमवार, 27 ऑक्टोबर 2014 (12:57 IST)

प्यारवाली लव्हस्टोरी : चित्रपट परीक्षण

प्रेमावरील कहाण्या सांगताना आणि ऐकताना, पाहतानाही लोक थकत नाहीत. कारण आपल्यापैकी बहुतांश जण प्रेम, हळवेपण, भावनिक गुंतागुंत या भावनांचा आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर अनुभव घेतो. त्यामुळे या भावनांमध्ये काही नाटय़मय प्रसंगांची पेरणी केली तर त्याचा उत्तम चित्रपट होतो.

इंग्रजी, हिंदी तोंडवळा असलेला मराठी चित्रपट प्यारवाली लव्हस्टोरी त्यापैकीच एक आहे. ‘दुनियादारी’च्या प्रचंड यशानंतर संजय जाधव यांनी प्यारवालीमध्ये त्यांच्या दिग्दर्शनाची पकड दाखवून दिली आहे. चटका लावून जाईल अशी प्रेमकहाणी रचण्यात, मांडण्यात त्यांना यश आले आहे. 1992 च्या काळातील हिंदू मुलगा आणि मुस्लीम मुलीची सुंदर प्रेमकथा भरगच्च पात्रांना घेऊन रंगवण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा सशक्त होईल याची पटकथेत काळजी घेण्यात आली आहे. दोन धर्मातील मित्रांचे प्रेम-दुश्मनीही छानपणे रंगवली. आपल्याकडील प्रेक्षकांना हॅपी एंडिंग आवडत असले तरीही नायक-नायिकांचे प्रेमात झालेले मरण चित्रपटाला हीट करते. एक दूजे के लिये, कयामत से कयामत तक या चित्रपटांच्या यशाचे रहस्य प्यारवालीमध्येही लागू झाले आहे. प्रत्येक दृश्यात सत्यता आणण्यासाठी प्रचंड मेहनत टीमने घेतलेली दिसून येते.