शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By
Last Modified: सोमवार, 29 जून 2015 (13:52 IST)

‘किल्ला’ नात्यांच्या तटबंदीचा : चित्रपट परीक्षण

किल्ला.. या सिनेमानं ‘बर्लिन फिल्म फेस्टिवल’मध्ये मराठीचा झेंडा रोवलाच पण त्याचबरोबर राष्ट्रीय पुरस्कारांवरही आपले वर्चस्व दाखवून दिलंय. किल्ला ही कहाणी आहे चिनू ऊर्फ चिन्मय काळे या लहान मुलाची.. त्याच्या आईच्या नोकरीतील कायम बदलीमुळे चिनूला प्रत्येक नव्या जागेशी, तिथल्या नव्या लोकांशी अँडजस्ट व्हायला वेळ लागतो.. अशाच प्रकारे एकदा नोकरीत बदलामुळे चिनू आणि त्याची आई पुण्याहून कोकणात येतात. एका नव्या जागी आल्यामुळे चिनूला खूप एकटं एकटं वाटतं.. त्याला ती जागा खूप परकी वाटते.. ज्यामुळे त्याचं एकाकीपण वाढतं. मग अशातच शाळेतल्या काही नव्या मित्रांसोबत त्याची ओळख होते. ते एकमेकांचे घट्ट मित्र होतात.

किल्ला ही कथा आहे एका आई आणि तिच्या मुलाची.. त्यांचातल्या गोड नात्याची.. शाळेची आणि मित्रांच्या आठवणींची.. यात अभिनेत्री अमृता सुभाषनं चिनूच्या आईची व्यक्तिरेखा साकारली आहे. एका सिंगल मदरची भूमिका तिनं बजावली आहे. आपल्यातल्या प्रामाणिकपणामुळे तिची कायम वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत असते तर चिन्मय काळे जी व्यक्तिरेखा साकारलीय अभिनेता अर्चित देवधर यानं.. या सगळ्या गोष्टी खूप छान आणि वेगळ्या पद्धतीनं दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी रंगवल्या आहेत. अविनाश अरुण या नवोदित दिग्दर्शकानं या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. एक अगदी साधी सिंपल कथानक अतिशय सुंदर आणि क्रिएटीव्हली मांडण्याचा प्रयत्न अविनाशने केलाय. कोकणाच्या निसर्गाला खूपच सुंदर पद्धतीनं प्रेझेंट करण्यात आलंय. एक आई आणि मुलगा यांच्याभोवती फिरणारे हे कथानक खूप रंजक आणि कलात्मक दृष्टिकोनातून साधण्याचा प्रयत्न केलाय.

या सिनेमातला एक महत्त्वाचा अंग म्हणजे याची सिनेमेटोग्राफी.. एक दिगदर्शक म्हणून अविनाशनं स्वत:ला सिद्ध केलंय यात शंकाच नाही पण याचबरोबर एक सिनेमाटोग्राफर म्हणूनही त्यानं जे काम केलंय त्यासाठी त्याला पैकीच्या पैकी मार्क.. ज्या पद्धतीनं कोकणातलं ते निसर्ग चित्रीत करण्यात आलंय, असं वाटतं की आपण निसर्गावरील फोटोचा एक अल्बम पाहातोय की काय.. या सगळ्या गोष्टी खूपच कलात्मक आणि रिफ्रेशिंग वाटतात. अभिनेत्री अमृता सुभाषनंदेखील नेहमीप्रमाणे तिचा बेस्ट परफॉर्मन्स दिलाय. कोणत्याही मेकअपशिवाय अगदी साध्या लूकमध्ये ती आपल्याला दिसते. तिच्या त्या रिअँलिस्टिक लूकप्रमाणेच तिनं अत्यंत रिअँलिस्टिक अभिनयही या सिनेमात केलाय.