शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. मराठी कलावंत
Written By वेबदुनिया|

अविनाशी मास्टरपीस....

किरण जोशी

WD
सांगलीत येऊन 'गणूकाका' ची भेट घेताना ह्रदयनाथ मंगेशकर यांना भरभरून येत असे.
संगीत रंगभूमीची मनोभावे पूजा करणारा नाट्यपंढरीचा वारकरी मास्टर अविनाश तथा गणपतराव मोहिते यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले. शंभरीतही चिरतारूण्य अनुभवत असल्याची भावना व्यक्त करणा-या मास्टर अविनाश यांच्या चेह-यावर कायम समाधानाची लकेर असायची. 'जीवनात कधीही खचून जाऊ नका, संगीतच तुम्हाला जगण्याचे बळ देते, अखेरच्या श्वासापर्यंत संगीत सोडणार नाही' अससांगणा-या मा.अविनाश यांनी आपला शब्द खरा केला. शंभरीचे वयोमानातही त्यांच्या चीजा ऐकताना प्रत्येकजण जुन्या काळात हरवून जात असे. मा. दिनानाथ मंगेशकरांच्या पडत्या काळात त्यांनीच हात दिला त्यामुळेच मंगेशकर कुटूंबियांशी त्यांचे घनिष्ठ सबंध. दीनानाथांनंतर ह्रदयनाथ, लतादीदींना त्यांनी आपल्या अंगाखांद्यावर खेळवलं. मंगेशकर कुटूंबियांचा 'गणूतात्या' या नावाने त्यांची नाट्यपंढरी सांगलीत ओळख होती. एकेकाळी आपल्या पहाडी आवाजाने आणि समर्थ अभिनयाने संगीतरंगभू‍मी गाजवणा-या मा. अविनाश यांचे लोकमान्य टिळकांपासून अनेक दिग्गजांनी कौतुक केले होते पण, आयुष्याच्या उतरत्या काळात इतर रंगकर्मींप्रमाणेच त्यांचीही उपेक्षा झाली, याची खंत कायम सलत राहिल.

मा. अविनाश यांचा जन्म 1 जानेवारी १९०९ रोजी सांगली लगतच असणा-या मिरज येथे झाला. संगीत शाकुंतल या नाटकात वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी त्यांनी केलीली ऋषिकुमारची भूमिका इतकी गाजली की भारावलेल्या लोकमान्य टिळकांनी त्यांना सोन्याची अंगढी देऊन गौरव केला. त्यांचा नावलौकिक वाढला तो स्त्री पात्र भूमिकांमुळे. मानापमानमधील भामिनी, ब्रह्मकुमारीमधील अहिल्या, विद्याहरणमधील देवयानी, रामराज्यवियोगमधील सीता, भावबंधनमधील मालती अशा नानाविविध भूमिका करून त्यांनी रसिकांचे मन जिंकले. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून मन भरून जायचे आणि

बळवंत नाटकमंडळीबरोबरच त्यांनी ललित कलादर्श, शाहूनगरवासी व किर्लोस्कर आदी नाट्य संस्थांमधूनही काम केले. त्यांनी अनेक भूमिका केल्या. 'धुव्र’, 'भक्त प्रल्हाद’ अशा पौराणिक नाटकांतूनही त्यांनी काम केले. गोविंद बल्लाळ देवल यांचे 'संगीत शारदा' , 'शाप संभ्रम' 'ब्रम्हकुमारी', 'संन्यस्त खड्ग','उग्र मंगल', ‘सौभद्र', 'विद्याहरण', 'एकच प्याला’ या नाटकांमधून त्यांनी आपल्या स्त्री पात्र भूमिकांची छाप सोडली.

WD
संगीत नाटकाचा कालखंड गाजविणा-या मा. अविनाश यांच्या मराठी चित्रपटातील भूमिकाही ति‍तक्याच ताकदीच्या होत्या. नाटकांवरील आर्थिक बोजा वाढत गेल्यानंतर नाटक कंपन्या अडचणीत आल्या आणि मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ सुरू झाला. गणपतराव मोहिते यांना मास्टर अविनाश म्हणून करून दिली ती आचार्य अत्रे यांनी. गणपतराव मोहिते हे नाव लांबलचक वाडते म्हणून त्यांनी मास्टर अविनाश अशी नवी ओळख करून दिली. अत्रेंच्याच 'पायाची दासी' या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका केली. सुमारे 50 वर्षे संगीत रंगभूमीची अविरतपणे सेवा केल्यानंतर 1975 मध्ये निवृत्ती स्विकारली. पण, आपल्या अनुभवसंपन्न ठेवा नव्या पिढीसमोर ठेवण्यासाठी त्यांची सदैव धडपड सुरू असायची. राज्यनाट्यस्पर्धा असो वा बालनाट्य शिबीर छोट्या-मोठ्या कार्यक्रमात उपस्थिती लावून ते नव्या पिढीसमोर आपला अनुभव व्यक्त करताना त्यांच्या चेह-यावर जे समाधान असायचे ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. संगीत शारदा नाटकाला या नाटकाला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर हरिपूरच्या पारावर जो ऐतिहासिक प्रयोग सादर झाला, त्यामागेही त्यांचीच धडपड होती. पैसा आणि प्रसिध्दीला स्वत:ला कायम दूर ठेवणा-या मा. अविनाश यांनी आपले जीवन ख-या अर्थाने संगीतमय केले. 'संगीत जगायला बळ देते..' हे त्यांचे वाक्य संगीतरसिकांच्या कायम स्मरणात राहिल.....