बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. मराठी सिनेमा
  4. »
  5. मराठी कलावंत
Written By वेबदुनिया|

जोगवाची भूमिका त्रासदायक- उपेंद्र लिमये

PR
उपेंद्र लिमये म्हटले की डोळ्यांसमोर उभा राहतो, तो दणकट शरीरयष्टीचा, रांगड्या आवाजातील 'अँग्री यंग मॅन'. पण 'जोगवा'च्या निमित्ताने एका वेगळ्या भूमिकेतील उपेंद्र प्रेक्षकांसमोर आला आहे. त्याच्या भूमिकेचे कौतुक अनेक महोत्सवांमध्ये झाले आहे. शिवाय अनेक मानाचे पुरस्कारदेखील प्राप्त झाले आहेत. 'जोगवा'मधील ही भूमिका नेमकी काय आहे? ती साकारताना काय काय कष्ट घ्यावे लागले आणि नेमके या भूमिकेतील वेगळेपण काय? हे जाणून घेण्यासाठी त्याच्याशी मारलेल्या या गप्पा....

'जोगवा'ची भूमिका कशी काय मिळाली?
- 'जोगवा'मध्ये मी 'ताय्यपा' नावाच्या एका जोगत्याची भूमिका करीत आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक राजीव पाटील हा माझा खूप चांगला मित्र आहे. आमची मैत्री ही अगदी अलिकडची नसून खूप जुनी आहे. थोडक्यात सांगायचं तर प्रायोगिक रंगमंचाच्या वावरापासूनची. राजीवच्या पहिल्या चित्रपटापासून म्हणजे 'सावरखेड'पासून आम्ही एकत्र काम करतोय. विशेष म्हणजे त्याच्या चित्रपटांमधून नेहमीच मला वेगवेगळे रोल करायला मिळतात. या चित्रपटामधील 'ताय्यपा'ची भूमिका खरोखरीच आव्हानात्मक स्वरूपाची आहे. एक अभिनेता म्हणून तुमच्या अभिनयाचा तिथं खर्‍या अर्थाने कस लागतो. ही भूमिका मी उत्तम प्रकारे साकारू शकेन, असा विश्वास राजीवला वाटला आणि मला ही भूमिका मिळाली.

प्रथमच नायकाच्या तेही एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत काम करायला मिळाले म्हणून नेमके काय वाटते?
- इथे मला एक छोटीशी दुरुस्ती करावीशी वाटते की, मुख्य नायक म्हणून हा माझा तिसरा चित्रपट आहे. या आधी 'तुझ्यामाझ्या संसाराला' व 'उरूस' या चित्रपटांत मी मुख्य नायकाच्या भूमिकेत होतो. पण हे दोन्ही चित्रपट हव्या त्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकले नाहीत. पण 'जोगवा'च्या निमित्ताने खरोखरीच चांगली किंबहुना 'एक सर्वोत्कृष्ट स्वरूपाची' भूमिका करायला मिळाली याचा खूप आनंद आहे.

या भूमिकेसाठी कशी तयारी केली?
- मुळातच 'जोगवा'चा विषय गंभीर आहे. या भूमिकेचा स्वीकार केला, त्यावेळी पूर्ण लक्ष मी या भूमिकेवर केंद्रित केले होते. गेले दीड वर्ष मी एकही मराठी मालिका घेतली नाही. एकीकडे ताय्यपाला समजून घेण्यासाठी वाचन, चर्चा असा अभ्यास सुरू होता, तर दुसरीकडे केस वाढविणं, साडी नेसणं त्यामध्ये सहजपणे वावरणं अशा अनेक गोष्टींचा सराव सुरू होता. इतकेच नाही तर या संदर्भात मी अनेक जोगत्यांशी देखील बोललो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, जोगत्यांचं आयुष्य म्हणजे 'विदारक यातना' आहे. पुण्या-मुंबई सारख्या चांगल्या ठिकाणी सुखासीन आयुष्य आपण जगत असतो; पण अगदी आपल्या शे-दीडशे किलोमीटरवर असलेल्या ग्रामीण भागातील अर्धा समाज अंधश्रद्धेला बळी पडलेल्या परंपरेपायी एक उद्‍ध्वस्त, हताश आयुष्य जगतोय ही खरोखरीच चिंतेची बाब आहे. एक कलाकार म्हणून या अनुभवांतून मला खूप काही शिकायला मिळालं. जेणेकरून भूमिकेत शिरणं माझ्यासाठी सहज, स्वाभाविक गेलं. पण एक माणूस म्हणून या सार्‍या गोष्टींकडे पाहताना खूपच त्रास झाला, एवढं मात्र नक्की!

PR
'ताय्यपा' च्या छटा जपताना पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही भावनांनी विचार करायचा होता. ह्या भावना व्यक्त करताना तुमचा दृष्टीकोण कसा होता?
- इथे एक पुरुष किंवा स्त्री या दृष्टिकोनातून बघण्यापेक्षा एका जोगत्याच्या नजरेतून या भूमिकेकडे पाहणं अधिक योग्य ठरेल. एक पुरुष म्हणून ताय्यपा लहानचा मोठा झालेला आहे. तो कारखान्यातदेखील काम करतोय. पण त्याच्यावर अशी काही परिस्थिती येते की त्याला 'जोगता' बनविलं जातं. यावेळेला संवादातून भावना व्यक्त होण्यापेक्षा, मला त्या डोळ्यांमधून अधिक प्रभावीपणे दाखवायच्या होत्या. थोडक्यात 'बिटवीन लाईन्स' जे काम असते, ते मला इथे साकारायचे होते.आणि मला वाटते माझे हे साकारणे सहज, स्वाभाविकपणे जमले ते मुक्ता बर्वेच्या अभिनयामुळे. यामध्ये माझ्या इतकाच तिचोखील तितकाच वाटा आहे. खरं तर मुक्ता ही एक प्रभावी अभिनेत्री आहे. त्यामुळेच अभिनय करताना आमची भट्टी खूप छान जमली.

'जोगवा'मध्ये काम करताना 'दिग्दर्शक' म्हणून राजीव पाटील यांच्यात काही वेगळेपणा जाणवला का?
- मी तर असे म्हणेन की, एक दिग्दर्शक म्हणून तो दिवसेंदिवस अधिकच प्रगल्भ बनत चालला आहे. त्याची चित्रपट माध्यमावर जबरस्त पकड आहे. इतकेच नाही तर त्याची स्वतःची अशी खास शैली आहे आणि त्याच्या प्रत्येक कामामध्ये त्याचा स्वतःचा असा खूप अभ्यास असतो. त्यामुळे 'जोगवा' साकारताना फक्त तोच नाही तर पूर्ण टीम 'जोगवामय' झालेली असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.

या भूमिकेला राष्ट्रपती पुरस्कार मिळावा अशी काही अपेक्षा आहे का?
या भूमिकेसाठी आतापर्यंत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पाच पुरस्कार मिळालेले आहे. पुरस्कार मिळणं ही त्या कलाकारासाठी खूप छान पावती असते. या भूमिकेनं मला पुरस्कार, समाधान असं सर्वकाही भरभरून दिले आहे. त्यातूनही जर महत्त्वाचा पुरस्कार मिळाला तर आनंद होईलच. पण माझ्या मते तरी पुरस्कारांपेक्षा भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहचणं जास्त गरजेचं आहे.

अशाच भूमिका वाट्याला येण्याची भीती वाटत नाही का?
- मुळीच नाही. अशी भीती 'स्टार'ला असते, नटाला नाही. आतापर्यंतच्या माझ्या हिंदी मराठीतील भूमिका पाहिल्या तर एक गोष्ट सहज लक्षात येईल की, प्रत्येक भूमिकेमध्ये वैविध्य आहे. जेव्हा मी 'जोगवा'चा प्रस्ताव स्वीकारला, तेव्हा मला माझ्या कित्येक कलाकार मित्रांनी याबाबतीत मी खूप मोठी रिस्क घेतोय, असे सांगितले होते. एखादी चांगली भूमिका येईपर्यंत स्वस्थ बसून राहण्यापेक्षा आलेली भूमिका कशी उत्तमरित्या साकारता येईल, असाच माझा प्रयत्न असतो.

महोत्सवांतील खास खेळांमधून तुझ्या या भूमिकेला कसा प्रतिसाद मिळाला आहे?
- या चित्रपटाला महोत्सवांमधून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय हे मी देखील ऐकून होतो, त्यामुळे पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये मी माझ्या काही मित्रांबरोबर प्रेक्षकांमध्ये बसून हा खेळ पाहिला. तेव्हा चित्रपट संपल्यानंतर एक साठ वर्षाचे गृहस्थ माझ्याजवळ आले नि म्हणाले, ''मी तुमच्यापेक्षा वयाने मोठा आहे, पण ही भूमिका तुम्ही अक्षरशः जिवंत केली नि ते माझ्या पाया पडले.'' तर दुसरीकडे काही कॉलेजियन्सचा ग्रुप माझ्या भूमिकेची तारीफ करताना एकदम भारावून गेला होता. त्यामुळे क्लासेस इतका मासेसलाही 'जोगवा' अपील झालेला पाहायला मिळाला.